अवलिया शेतकर्‍याचे ‘संदीप कांदा वाण’

अवलिया शेतकर्‍याचे ‘संदीप कांदा वाण’

अवलिया शेतकर्‍याचे ‘संदीप कांदा वाण’

शेतात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांकडून विशिष्ट वाणांना पसंती दिली जाते. यासाठी कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्या संशोधन करुन नवं नवीन वाण बाजारपेठेत उपलब्ध करुन देत असतात. मात्र दौड तालुक्यातील एका तरुण शेतकर्‍याने स्वत:च्यात नावाचे कांद्याचे वाण विकसित केले असून त्यास ‘संदीप कांदा’ असे नाव दिले आहे. कांद्याच्या वाणाला ‘संदीप कांदा’ असे नाव देण्याचे कारण म्हणजे त्या शेतकर्‍याचे नाव आहे संदीप घोले!
बनावट बियाणे ही शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठी डोकंदुखी ठरते. कारण बियाणे खरेदी करतांना कोणते बियाणे ओरिजनल व कोणते बनावट? हे लवकर लक्षात येत नाही. पेरणी झाल्यानंतर जेंव्हा लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. हा धोका टाळण्यासाठी संदीप घोले या शेतकर्‍याने स्वतःच्या नावाची कांद्याची जात विकसित केली आहे. यासाठी त्यांनी आठ वर्षे संशोधन केले आणि संदीप कांदा या वाणाची निर्मिती केली. या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमतादेखील जास्त आहे.

संदीप घोले हे कुणी शास्त्रज्ञ नव्हे, ते एक साधारण शेतकरी आहेत. कांदा बियाण्यात चालू असलेली घालमेल, बियाण्याचा निकृष्ट दर्जा व यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकर्‍यांना कांदा टिकवण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. कांदा लवकर खराब होत होता, तसेच कांद्यावर अनेक प्रकारचे रोग अटॅक करत होते. या सर्व अडचणींचा विचार करून संदीप यांनी तब्बल आठ वर्षे कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यासाठी खर्च केलेत, आणि मग संदीप कांदा ही वाण विकसित केली. त्यांनी विकसित केलेल्या वाणामुळे कांद्याचे उत्पादन हे प्रतिहेक्टरी 8 टनपर्यंत वाढले आहे.

संदीप कांदा फक्त आपल्या राज्यातच प्रचलित आहे असे नाही, तर तब्बल आठ राज्यात या जातीच्या कांद्याची लागवड ही केली जात आहे, आणि त्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी यातून चांगली मोठी कमाई करत आहेत. संदीप कांदा या कांद्याच्या वाणापासून अधिक उत्पादन तर प्राप्त होतेच शिवाय उत्पादन खर्च हा इतर जातींपेक्षा खूपच कमी आहे. संदीप घोले यांनी केलेल्या या अभूतपूर्व कामाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नामक एका संस्थेने घेतली, आणि त्यांच्या या नावीन्यपूर्ण कामगिरीसाठी भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. संदीप कांदा ही कांद्याचे वाण इतर जातीच्या तुलनेत जास्त काळ टिकते, असे सांगितले जाते की, संदीप कांदा हा जवळपास आठ महिने साठवला जाऊ शकतो. त्यामुळे कांद्याचे हे वाण कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी एक वरदान सिद्ध होत आहे. आणि भविष्यात या जातीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे उत्पन्न हे दुपटीने वाढेल.

बारावीनंतर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना बाहेरून शिक्षण पूर्ण केले. संदीप ऊस पट्ट्यातील शेतकरी आहेत. प्रयोगशीलता व प्रयत्नवाद उपयोगात आणत त्यांनी ऊसशेतीत मास्टरी मिळवली. त्याचबरोबर कांदा पिकाची शेतीही सुरुवात केली. मात्र कांद्याची उत्पादकता, गुणवत्ता व टिकवणक्षमता यात समाधानकारक हाती लागत नव्हतं. काही वेळा बियाणे निकृष्ट प्रतीचे असायचे. मग संदीप यांनी या सर्व बाबींच्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला. डबल रिंग (दुबाळका) असलेल्या कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याचं त्यातून लक्षात आलं. मग सुमारे 8 वर्षे कसून काम करून पुना फुरसुंगी जातीतून निवड पद्धतीने कांद्याची नवी जात तयार करण्यात त्यांना यश मिळालं. संदीप यांची सुमारे 12 एकर शेती आहे. त्यात प्रत्येकी चार एकर ऊस व चार एकर कांदा असतो. रोपवाटिका तयार करून लागवड करण्यावर त्यांचा भर असतो.

‘संदीप कांदा’ जातीविषयी…

सिंगल रिंगचा कांदा. फुटत नाही. ओलसरपणा कमी असतो. असा कांदा बियाण्यासाठी योग्य असल्याचं संदीप सांगतात. फुटीचे आणि दुबाळ कांद्याचा उपयोग बियाण्यासाठी केल्यास तो टिकण्यास योग्य नसतो. ओलसरपणा अधिक असतो. त्यामुळे लवकर खराब होतो.

आकर्षक लाल रंग

संदीप रब्बी हंगामात लागवड करतात. 120 दिवसांत पक्व होतो.

उत्पादकता- एकरी 16 ते 20 टन. 22 टनांपर्यंतही उत्पादन घेतल्याचे संदीप सांगतात.

रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे. करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.

कांदा चाळीत सुमारे पाच महिन्यांपर्यंत टिकू शकतो.

गोडसर- तिखट स्वाद

कृषी विद्यपीठात चाचण्या

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संदीप यांच्या कांदा बियाण्याची चाचणी झाली आहे. त्यात संदीप कांदा हेक्टरी 37.5 उत्पादनासह पहिल्या क्रमाकांवर आले होते.

जातीचा प्रसार

आपल्या जातीचे कायदेशीर मालकी हक्क घेण्यासाठी संदीप यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राजगुरुनगर येथील कांदा-लसूण संशोधन संचालनालयाकडे आवश्यक माहिती पाठवली आहे. आपल्या जातीचा प्रसार शंभर शेतकर्‍यांपर्यंत झाल्याचे संदीप सांगतात. गुजरात राज्यातील ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’च्या माध्यमातून त्याचे बियाणे राज्यासह परराज्यांतील शेतकर्‍यांकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले. जातीची उत्पादनक्षमता, टिकवणक्षमता व अन्य बाबींच्या निकषांत संदीप यांची जात अव्वलस्थानी राहत सर्व निकषांत योग्य बसली.

First Published on: January 2, 2022 6:15 AM
Exit mobile version