नौ‘रंगी,’ नौ‘गुणी’ नवरात्र!

नौ‘रंगी,’ नौ‘गुणी’ नवरात्र!

–सायली दिवाकर

ज्याप्रमाणे बाळ नऊ महिने आईच्या उदरात राहते, त्याचप्रमाणे हे नऊ दिवस आपल्यातील ईश्वरी स्वरूपामध्ये मग्न राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीनही प्रकारचे गुण आपल्या चेतनेमध्ये प्रचलित आहेत. या नऊ दिवसांत पहिले तीन दिवस तमोगुणी स्वभावाची, दुसरे तीन दिवस रजोगुणी स्वरूपाची आणि शेवटचे तीन दिवस सत्त्वगुणी प्रकृतीची उपासना आहेत.

म्हणूनच भारतभर नवरात्र उत्सव विविध पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो.‘विजया दशमी’च्या दिवशी दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींचा विजय साजरा करण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन केले जाते, तर पश्चिम भारतात विशेषतः गुजरात राज्यात नवरात्र उत्सव गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. उत्तरेकडील भागात नवरात्रीच्या पर्वावर एकमेकांना भेटी देण्याची प्रथा आहे, तर पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापूजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या प्रदेशात दुर्गादेवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ असते.

देवीच्या स्वरूपाबरोबरच नवरात्रीचे हे नऊ रंग ही तितकेच नवरात्रात महत्त्वाचे असतात. नवरात्रीचा पहिला दिवस देवीच्या शैलपुरी या रूपाचा. शैलपुरी म्हणजे पर्वतकन्या होय. या रूपात ती निसर्गमातेच्या परिपूर्ण रूपात शक्तीचे प्रतीक असते. पिवळा रंग म्हणजे ओजस्विता, आनंद आणि उत्साह. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहानेच होते. म्हणून पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्त्व आहे. त्यानंतर येतो दुसरा दिवस. दुर्गादेवीचे दुसरे रूप ब्रहचारणी या रूपात. येथे दुर्गादेवी अध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली स्त्री आहे. या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते.

म्हणून हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि ऊर्जा यांचे द्योतक आहे. देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा. या रूपात तिच्या मस्तकी राखाडी रंगाची चंद्रकोर आहे. कुष्मांडा हे देवीचे चौथे रूप. या रूपात देवी तिच्या मनमोहक हास्याने, तिच्या देदीप्याने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करते, म्हणूनच नारंगी रंग हा तिचा आनंद आणि ऊर्जा याचे सूचक आहे. स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप, या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार हा एका आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. जेव्हा भक्त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे आणि म्हणूनच त्या दिवशी पांढर्‍या रंगाचे पावित्र्य आहे. देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे.

असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली म्हणून ती अतिशय उग्र रूपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रूपात ती विनाशाची देवी आहे. तिला काली असेदेखील संबोधले जाते. तिची ही शक्तिशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झाली आहे. देवीचे आठवे रूप महागौरी आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग हा आशा आणि ताजेपणाच्या यथार्थतेचे प्रतीक आहे. सिद्धीदात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे देवीची विविध नामे, रंग, रूप सर्वच चित्तवेधक आणि मनोहारी आहे.

पूजा, यज्ञ, होम, उपवास, ध्यान, मौन, गायन, नृत्य आदींनी भरगच्च हे दिवस म्हणजे चैतन्याचे भरते आल्याचा भास निर्माण करतात. समस्त मानवजातीला अज्ञान आणि सगळ्या दुष्ट प्रवृत्तींपासून वाचवणारी तारणहार, रक्षणकर्ता म्हणून या नऊ दिवसांत देवीला जितक्या भाविकतेने पूजले जाते तितक्या भाविकतेने यथाशक्ती उपास करण्याची ही प्रथा आहे, पण फक्त व्रत-वैकल्ये करण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केले जात नाहीत, तर आपले शरीर शुद्ध करण्यासाठी उपवास करायला हवेत याचे भान मात्र कोणालाच नसते.

आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. टाकाऊ विषकण शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच उपास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार आहे हे लक्षात घेऊनच उपास करायला हवेत. तसेच या नऊ दिवसांत केलेल्या ध्यानाचेही विशेष महत्त्व आहे. ध्यान आणि उपवासाने मनामध्ये साचलेली बेचैनी कमी होण्यास मदत होऊन मन शांत आणि स्थिर होऊ लागते. त्याचप्रमाणे ध्यानाला आणि उपासाला मौनाची जोड मिळाल्यास जीवन अधिक समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.

परंतु खेद वाटतो की नवरात्रीचा सण हा केवळ कुळधर्म व कुळाचार म्हणून पार पडला जातो. खरंतर सध्याचे दैनंदिन जीवन इतके रोबोटिक झाले आहे की आपण जिवंत आहोत याची जाणीवदेखील प्रत्येकाला करून द्यावी लागते, पण याच रूढी-परंपरा मनुष्याला आपल्यालाही भावना आहेत, मन आहे आणि आपणही आनंदी आहोत, होऊ शकतो याची जाणीव करून देतात. रोजच्या यांत्रिक धकाधकीच्या आयुष्यात नवचेतना निर्माण करण्याचं काम हे उत्सव करीत असतात.

देवीला शक्ती असेही म्हणतात आणि शक्ती म्हणजेच ऊर्जा. ही ऊर्जा या समस्त ब्रम्हांडाला सतत कार्यरत ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे आणि गुणांचे उच्चारण करून आपण आराधना करतो तेव्हा ते गुण, ती ऊर्जा आपणामध्ये जागृत होऊ लागते आणि गरजेच्या वेळी प्रकट होते. ऊर्जा ही चोहोबाजूंनी वेढलेली असते, पण त्या ऊर्जेला ध्यान, उपास, मौन, पूजा आणि आराधनेच्या प्रक्रियेमुळे जागृत केले जाते. त्यामुळेच परंपरेने उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. तेव्हा या नवरात्र उत्साहाचा भरभरून आनंद घ्यावा.

First Published on: October 15, 2023 3:30 AM
Exit mobile version