नात्यातील गुंतागुंत की नातेसंबंधांचे तुकडे!

नात्यातील गुंतागुंत की नातेसंबंधांचे तुकडे!

१८ मे रोजी श्रद्धा वालकर या वसईतील तरुणीची आफताब पूनावाला या तिच्या लिव्ह ईन पार्टनरने दिल्लीत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते जंगलात फेकले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या हत्याकांडाने अवघा देश सुन्न झाला. मात्र एवढे भयंकर कृत्य करुनही आफताब अजूनही शरीराने आणि मनाने ठणठणीत आहे. जेलमध्ये तो रोज पोटभर जेवतोय आणि निवांतपणे झोपतोय. आपण केलेल्या पाशवी कृत्याचा त्याला जराही पश्चाताप नसून उलट श्रद्धाचे मुंडके शोधून दाखवा असे खुले आव्हानचं त्याने दिल्ली पोलिसांना केले आहे. तर दुसरीकडे आफताबला केव्हा फासावर लटकवले जाणार याची वाट अख्खा देश बघत आहे. आफताबबरोबर लिव्ह ईनमध्ये राहण्यासाठी घरच्यांना सोडणार्‍या श्रद्धाचा हा भयंकर अंत तिच्याच प्रेमाने केला ही भयंकर शोकांतिकाच आहे. अशा विकृत घटनांपासून प्रेरणा घेतच आज नवीन गुन्हेगार पिढीच जन्माला येऊ लागली आहे की काय असा प्रश्न आता समाजासमोर उभा ठाकला आहे. कारण आता घटनाच तशा घडू लागल्या आहेत.

जोडीदाराबद्दलचा मनात खदखदणारा राग, असंतोष, द्वेष बाहेर काढण्यासाठी संधीची वाट पाहणार्‍यांसाठी श्रद्धा आफताबसारख्या घटना आता अपडेटेट मोडस ऑपरेंडी ठरू लागल्या आहेत. कारण अशा भयंकर पद्धतीने आपल्याच प्रेमाचे तुकडे करण्यात आल्याची ही देशातील पहिली घटना नसून अशा घटनांची साखळीच आता तयार होऊ लागली आहे. अशा प्रकारे घडणार्‍या कोल्ड ब्लडेड घटनांचा क्रम पाहता एका घटनेवरून गुन्हेगारांना त्यातून गुन्हा कसा करायचा याचेच प्रशिक्षण मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आफताबला डेक्सटर या अमेरिकन क्राईम शोमधून प्रेरणा मिळाली. पण त्यानंतर उघडकीस आलेल्या घटना पाहता आफताबच त्यांच्यासाठी डेक्सटर झालाय असे वाटू लागले आहे. कारण आफताबने श्रद्धाची हत्या जरी मे महिन्यात केली असली तरी त्याने केलेला गुन्हा नोव्हेंबरमध्ये मीडियामुळे घराघरात पोहचला आहे. त्यानंतर घडलेल्या घटनांचा क्रम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण त्यांच्यासाठी आफताब हा प्रेरणास्थान ठरल्याचे दिसत आहे.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी दिल्लीतील सरिता या भागात लिव्ह ईनमध्ये राहणार्‍या पार्टनरने आपल्या २५ वर्षीय प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. तिचे दुसर्‍याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याने हे कृत्य केले. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी मध्य प्रदेशमध्येही १३ नोव्हेबरला चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा कुर्‍हाडीने शिरच्छेद केला. नंतर तिचे शिर आणि धड जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी पुरल्याचे समोर आले. सरस्वती पटेल असे मृत महिलेचे नाव आहे.

हरयाणामध्ये १४ नोव्हेंबरला लिव्ह ईनमध्ये राहणार्‍या एकाची त्याच्या महिला पार्टनरच्या एक्स बॉयफ्रेंडने गोळी मारून हत्या केली. नातेसंबंधातल्या त्रिकोणाने हा बळी घेतला. बिहारमधील नालंदामध्येही विवाहित महिलेने पतीबरोबर विवाहित प्रियकराची हत्या केली. नंतर त्याच्या शरीराचे ६ तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या सर्व घटनांचा पोलीस पाठपुरावा करत आहेत.

ही घटना ताजी असतानाच आता डिसेंबर ४ तारखेला भागलपूरमधील दिलोरी येथे राहणार्‍या एका विवाहित महिलेवर एकाने भरबाजारात धारदार हत्याराने हल्ला केला. ती खाली पडताच त्याने सपासप वार करत तिचे हात आणि पाय कापले. पण एवढे क्रौर्य करूनही त्या नराधमाचे समाधान न झाल्याने त्याने तिचे वक्ष आणि कानही कापले. ती जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होती. पण गर्दीतील एकही जण पुढे आला नाही. तो मात्र तिची जिवंतपणीच कत्तल करत होता. तिच्या शरीराचे तुकडे करत होता. गर्दी मात्र त्याचा व्हिडीओ काढत होती. नंतर तो पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिचे तुकड्या तुकड्यातील शरीर घेऊन नंतर काहीजण रुग्णालयात गेले. मात्र ती केव्हाच जगातून निघून गेली होती. पण जाण्याआधी तिने पोलिसांना आरोपीचे नाव सांगितले. शकील. जिवंतपणी एखाद्याच्या शरीराचे अशा प्रकारे भयंकरपणे तुकडे करण्याची मानसिकता शकीलमध्ये कुठून आली याचा शोध पोलिसांनी घेतला. तेव्हा त्यातही नातेसंबंधच आढळले.

या घटनेस ४८ तासही उलटत नाहीत तोपर्यंत विशाखापट्टणम येथील मदुरवाडा येथे ५ डिसेंबर रोजी एका घरात ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे कोंबून ठेवण्यात आल्याचे समोर आले. भाडेकरू भाडेच देत नसल्याने वैतागलेला घर मालक घरातील सामान बाहेर फेकण्यासाठी घऱात घुसल्याने ही भयंकर घटना उघडकीस आली. भाडेकरूने पत्नी गर्भवती असल्याचे घरमालकाला जून २०२१ मध्ये सांगितले. त्यानंतर जवळ जवळ वर्षभर त्याने घरभाडेच न देता घर सोडले. पण गुपचुप तो मागच्या दाराने घरात येत असल्याचे घरमालकाला कळले. त्याचा पकडण्यासाठी घरमालकाने घरात प्रवेश केला होता. पण भलतेच समोर आले.

येथेही नातेसबंधाचेच तुकडे करण्यात आले होते. तर दिल्लीत पांडव नगरमध्ये राहणार्‍या पूनम या महिलेने पतीचे पहिले लग्न झाल्याचे समजल्यावर मुलाच्या मदतीने पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे १० तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. मात्र तुकडे सापडल्याने काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघड झाली. मात्र हे प्रकरण श्रद्धाची हत्या झाली त्याच कालावधीतील आहे. याचदरम्यान मुंबईत प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडसर आणणार्‍या पतीला आणि सासूला स्लो पॉयझन देऊन ठार मारणार्‍या काजल शहा आणि तिचा प्रियकर हितेश जैन यांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या सर्व हत्या नातेसबंधातील मतभेद, कटुतेमधून झालेल्या आहेत. या सर्व घटनांनी पोलीसच नाही तर मनोवैज्ञानिकही विचारात पडले आहेत. कारण मानवी विचारांना आवर घालणं तसं कठीण आहे. तसेच सध्याची लाईफस्टाईल हीदेखील बदलणार्‍या मानसिकतेसाठी कारणीभूत ठरत आहेत. नातेसंबंधातील संवेदनाच हरवत चालल्याने समाजच संवेदनाहीन होत चालला आहे. यामुळेच सुरुवातीला एकमेकांसाठी जीव देण्याच्या शपथा घेणारे हे नातेसंबंध कमी अवधीतच एवढ्या टोकाला जाऊ लागले आहेत की, समोरच्याला त्याच्यातून सुटकेसाठी दुसरा मार्गच सापडेनासा झालाय. समजूतदारपणा आणि चर्चेतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागतो. पण तेवढा वेळही जोडीदाराला देण्याची इच्छा नसल्याने प्रत्येकाला यातून जमेल तेवढे लवकर स्वातंत्र्य हवेसे वाटू लागले आहे. यातूनच मग जोडीदाराचा कायमचा खेळ खल्लास करण्याचे धाडस हल्ली बळावू लागलं आहे. आपण केलेल्या कृतीचे परिणाम यातील प्रत्येकजण जाणून आहेत. आज ना उद्या आपण पकडले जाणार हेदेखील त्यांना माहीत आहे. पण त्यालाही सामोरे जायला तयार आहोत, पण नातेसंबंध नको.

हाच यातील प्रत्येक घटनेमागचा उद्देश आहे. यातील प्रत्येकाला काहीही करून या नात्याच्या बंधनातून बाहेर पडायचं होतं. त्यासाठी यातील प्रत्येकाने वेळोवेळी साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केलाय हे त्यांच्या केस हिस्टरीवरून दिसून येतंय.
प्रेमाचे, कौतुकाचे, बागडायचे चार दिवस संपल्यानंतर म्हणजेच हनिमून पिरियड संपल्यानंतरच खर्‍या अर्थाने नातेसंबंधास सुरुवात होते. एकमेकांप्रती अपेक्षा वाढू लागतात. यातूनच मग अपेक्षापूर्ती न झाल्यास नातेसंबंधात तणाव निर्माण होतोच. पण त्या अपेक्षा काय आहेत हेदेखील महत्वाचे. आफताबला श्रद्धाने त्याचे सगळे रंगीन चाळे स्वीकारावे अशी अपेक्षा होती. नादी, छंदी असलेल्या आफताबला ड्रग्जचे व्यसन तर होतेच शिवाय तो वासनांधही होता.

यामुळेच श्रद्धामधला इंटरेस्ट संपल्यावर त्याने डेटींग अ‍ॅपवरून वेगवेगळ्या मुलींना थेट घरी आणण्यास सुरुवात केली होती. यावरूनच श्रद्धाबरोबर त्याचा वाद व्हायचा. हे सध्याच्या माहितीतून समोर आले आहे. तर मध्य प्रदेशमधील घटनेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून तिची कुर्‍हाडीनेच खांडोळी केली. ही घटना अशा वेळेस घडली जेव्हा देशात घराघरात श्रद्धाच्या हत्येवर चर्चा सुरू होत्या. किती ही क्रूरता. नालंदामध्ये महिला व पुरूष दोघेही विवाहित होते. पण तिचे पतीबरोबर आणि त्याचे पत्नीबरोबर पटत नसल्याने या आरोपी महिलेची परपुरूषाबरोबर मैत्री आणि प्रेम झाले. पतीला कळल्यावर तिने प्रियकरास भेटण्यास नकार दिला. या रागातून तो थेट तिच्या घरी येऊ लागला. त्यामुळे एकदिवशी महिलेच्या पतीबरोबर त्याचा वाद झाला. त्यातून पतीपत्नीने त्याच्या शरीराच्या सहा खांडोळ्या केल्या. किती भयंकर आहे हे सगळं.

भागलपूरमध्येही शकील आणि महिलेमध्ये मैत्री असल्याचे समोर आले, पण नंतर तिने संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यातूनच त्याने जिवंतपणी तिच्या शरीराचे तुकडे केले. किती पराकोटीचा हा द्वेष आणि क्रूरता. प्रेमात एवढी क्रूरता कधी ऐकलीही नव्हती आणि पाहिलीही नव्हती. पण या सगळ्या घटनांमध्ये एकच साम्य आहे. यातील बहुतेक नाती काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलेली आहेत. यामुळे त्यात एकमेकांप्रती प्रेम, संवेदना सहानुभूती काहीच राहिलं नव्हतं. राहिले ते फक्त मत्सर आणि द्वेष. यातूनच तर डेक्सटरसारखी सैतानं जन्म घेतात. जे कधी आफताब बनून तर कधी शकील बनून प्रेमाचे तुकडे करतात. तर कधी मुलगाच आईबरोबर बापाचे दहा तुकडे करण्यासही मागे पुढे पहात नाही.

अशांना भविष्याची चिंताही नाही कारण या सैतानी वृत्तीला संवेदनाच नाहीत. यामुळे नातेसंबंधांशी यांना देणे घेणेच नाही. त्यामुळे या वृत्तीला न्यायालयाने फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांचा तात्काळ निकाल लावावा. नाहीतर आफताबसारख्या धूर्त आणि चाणाक्ष गुन्हेगाराला पुरावेच नष्ट करण्यासाठी नाही तर दुसर्‍या श्रद्धाचे तुकडे करण्यासाठीही मुबलक वेळ मिळेल. या मिळालेल्या वेळात पोलिसांना कसा गुंगारा द्यायचा याचे तो इतरांना उघड उघड मार्गदर्शनही करेल आणि संवेदना हरवलेल्या नातेसंबंधाचे तुकडे होतच राहतील. फार वेळ न घालवता अशा दुर्मिळातील दुर्मिळ घटनांमध्ये गुन्हेगारांना कडक शासन करायला हवे. नाहीतर ही तुकड्यांची साखळी एका पानावरून दुसर्‍या पानावर सुरूच राहील. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

First Published on: December 11, 2022 5:07 AM
Exit mobile version