श्रीकृष्ण एक वैज्ञानिक चिकित्सा

श्रीकृष्ण एक वैज्ञानिक चिकित्सा

–प्रशांत कळवणकर

श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायका …

महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत आणि त्या प्रत्येकीला श्रीकृष्णापासून दहा अपत्येसुद्धा आहेत. म्हणजे श्रीकृष्णाच्या अपत्यांची संख्या एक लक्ष एकसष्ट हजार ऐंशी (१,६१,०८०) एवढी होय. यामागचा पूर्वइतिहास असा की जरासंधाने १६,००० राजकुमारींना मणिपूर पर्वतावर बंदिस्त करून ठेवले होते. श्रीकृष्णाने ह्या सर्व राजकुमारींची जरासंधाच्या बंदिवासातून मुक्तता केली. त्यानंतर त्या सर्व राजकुमारींनी श्रीकृष्णाला आपला पती मानले. जेव्हा नारदाने प्रत्येक राणीच्या दालनात डोकावून पाहिले तर सर्व दालनात नारदाला श्रीकृष्णाचे राण्यांबरोबर दर्शन झाले.

आता या कथेची विज्ञानवादी दृष्टिकोनातून चिकित्सा करू
पंचमहाभूतांनी घडलेल्या आपल्या शरीराचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे आपली चेतासंस्था. चेतासंस्थेमुळेच आपल्याला आपल्या अस्तित्वाची, चेतनेची जाणीव आहे. अचेतन अथवा स्थूल शरीराचे अस्तित्व चेतनेमुळेच आहे. आपले मनोशारीरिक व्यवहारसुद्धा चेतनेमुळेच चालतात. श्रीकृष्ण हा या चेतनेचेच एक प्रतीक आहे. प्रत्येक रक्तवाहिनी, स्नायू, त्वचा व अन्य अवयवांपर्यंत चेतासंस्थेचे जाळे पसरले आहे. ह्या चेतातंतूमधून जी विद्युत शक्ती प्रवाहित आहे तीच शक्ती म्हणजे साक्षात श्रीकृष्ण जो ह्या शरीराचा चालक किंवा सारथी आहे.

आपला मेंदू हे चेतासंस्थेचे नियंत्रण केंद्र आहे. ह्या मेंदूमधून लंबमज्जेद्वारे आणि विविध चक्रांद्वारे चेतातंतू संपूर्ण शरीरात पोहोचलेले आहेत. ह्या लंबमज्जेमधील जे चेतातंतूंचे प्रमुख चढते आणि उतरते मार्ग आहेत त्यांची संख्या एकशे आठ इतकी आहे, ह्याच श्रीकृष्णाच्या १०८ बायका आहेत.

सोळा हजार राजकन्यांना नरकासुराने मणिपूर पर्वतावर बंदिस्त करून ठेवले होते. शरीर विज्ञान शास्त्रानुसार आपल्या नाभीच्या मागे मणिपूर चक्राचे स्थान आहे आणि हेच मणिपूर चक्र मणिपूर पर्वताचे प्रतीक आहे. इथूनच १६००० नाड्या उगम पावून त्या पूर्ण शरीरात पोचतात.

अन्नातील कार्बोदके, प्रथिने आणि लिपिडे किंवा वसा (स्निग्ध पदार्थ) हे घटक ते सेवन करतेवेळी जटिल संयुगांच्या स्वरूपात असतात. त्यांचे विघटन करून त्यापासून अतिसूक्ष्म रेणू तयार करणे, द्रवस्वरूपातील हे रेणू आतड्याच्या श्लेष्मास्तरातून (सर्वांत आतील बुळबुळीत थरातून) रक्तात मिसळविणे व त्याच स्वरूपात सोळा हजार नाड्यांद्वारे ते निरनिराळ्या कोशिकांप्रत पोहोचविणे या सर्व क्रिया म्हणजेच ‘पचन’ होय. अविद्राव्य जटिल अन्नपदार्थापासून सूक्ष्म व अभिशोषणयोग्य अन्नकण बनविणे म्हणजेच पचन आणि ज्या सोळा हजार नाड्यांद्वारे याचे वहन विविध कोशिकांपर्यंत केले जाते ती प्रत्येक नाडी (एकूण सोळा हजार) म्हणजे श्रीकृष्णाच्या प्रतीकात्मक राण्या व प्रत्येक नाडीसोबत असलेली चेतातंतूद्वारे प्रवाहित चेताशक्ती म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. ह्या नाड्यांना फुटलेले फाटे व त्यासोबतचे चेतातंतू म्हणजेच श्रीकृष्णाचीच प्रतीकात्मक अपत्ये होय.

बाळकृष्णाला दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवड

सर्व शरीरात पसरलेले चेतातंतूंचे जाळे व त्याद्वारे प्रवाहित विद्युत शक्ती म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. बाळ श्रीकृष्णाला दूध व दुधाचे पदार्थ खूप आवडत. दुधाचे पदार्थ म्हणजे दूध, दही, तूप, लोणी आदी. शास्त्रात दुधाला पूर्णांन्नाची उपमा दिली आहे. पूर्णान्न म्हणजे सर्व गुणांनी परिपूर्ण असे अन्न. दुधात अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात तसेच प्रोटिनची मात्राही असते. म्हणूनच लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत दूध सगळ्यांना महत्त्वाचे असते. मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. गायीच्या दुधामुळे आपल्या मेंदूच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनेदेखील या माहितीस दुजोरा दिला आहे. गायीच्या दुधामध्ये असणारे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड मेंदूसाठी पोषक असते. या पोषणतत्त्वामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी लाभ मिळतात. यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. शिवाय मेंदूशी संबंधित कित्येक आजारांपासून संरक्षण होण्यासही मदत मिळते. यासाठी लहान मुलांच्या आहारात गायीच्या दुधाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

वैज्ञानिकांच्या माहितीनुसार गायीच्या कच्च्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे निरोगी सूक्ष्मजीव असतात, ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते. गाईच्या दुधात ‘ड’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, प्रथिने, झिंक यांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे लहान मुलांची हाडेही मजबूत होतात. दुधामधील केसीन रेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते.

ताक : दुधापासून बनलेले ताक हे त्रिदोष शामक, उष्णता शामक तसेच पाचकही आहे. त्यामुळे आयुर्वेदात ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे.

दही : दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १२ या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधापेक्षा कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे दह्यामध्ये लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरससुद्धा मुबलक प्रमाणात असतात. दह्यामधील प्रोबोयोटीक बॅक्टेरिया आणि अँटीऑक्सिडंटमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. आहारातील दह्याच्या वापरामुळे मेंदूतील सकारात्मकता वाढवणार्‍या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागते. ज्यामुळे चिंता, नकारात्मक विचार व औदासिन्य कमी होऊन मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

लोणी : आयुर्वेदात गायीच्या दुधाला प्रथम प्राधान्य असल्याने गायीच्या दुधापासून बनलेले लोणी हे बल देणारे असते, अग्नीचे दीपन करणारे, वात आणि पित्त शामक, रक्तविकार, खोकलानाशक, मूळव्याध नष्ट करणारे, वृष्य, बुद्धीस हितकारक आहे. नेत्रास हितकारक, बुरशीनाशक आणि प्रतिजैविके गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे, ताप, पोटाचे इन्फेकशन यांसारखे लहानसहान इन्फेक्शनवर मात करण्यासाठी फायदेशीर, कॅन्सरशी सामना करण्यास उपयुक्त, व्हिटॅमिन ई, सेलिनियम हे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

दूध व दुग्धजन्य पदार्थ हे मेंदूस अत्यंत हितकारक आहेत. मेंदू म्हणजे चेतन शक्तीचे केंद्र आणि हीच चेतना शक्ती म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. त्यामुळे बाळकृष्णाला दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची आवड यामधील संबंधाची येथे प्रचिती येते.

श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अंतरंग सांगण्यासाठी येणार्‍या सोळा गवळणी
कलावती आईंच्या एका भजनात लिहिले आहे की, झाला गं श्रीकृष्णाचा जन्म १६ गवळणी सांगावया आल्या गं अंतरंग. ह्या सोळा गवळणी कोणत्या आहेत तर त्या आहेत सुषुम्ना, पिंगला, इडा, सरस्वती, पूषा, वरुणा, हस्तिजिहा, यशस्विनी, अलम्बुसा, कुहु, विश्वोदरी, पयस्विनी, शंखिनी आणि गान्धारा ह्या १४ मुख्य नाड्या आणि अधिक दोन अशा १६ गवळणी. ह्या नाड्यांद्वारेच आपली चेतना शक्ती शारीरिक क्रिया पार पाडते. इडा नाडी शरीराच्या डाव्या भागात वास करते. पिंगला उजव्या भागात, तर सुषुम्ना मध्य भागात स्थित आहे. गांधारी डाव्या नेत्राच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते, तर हस्तीजीव्हा उजव्या, पूषा कर्णभागात, तर आलंबूषा मुखात स्थित आहे. कुहू लिंग प्रदेशात तर शंखीनी गुदस्थानात स्थित आहे. ह्या सर्व नाड्यांपैकी दहा मुख्य नाड्या ह्या वायुवाहक आहेत. त्या ज्या वायूद्वारे काम करतात ते आहेत प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजय. ह्या दश नाड्या हायड्रोलिक यंत्रणेप्रमाणे काम करतात.

गोपिकांची सगुण भक्ती आणि निर्गुणाकडे वाटचाल
गोपिका श्रीकृष्णाबरोबर रासक्रीडा खेळत असताना इतक्या मग्न झालेल्या असतात की त्या स्वभानही विसरतात. जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्यातून अचानक निघून जातो त्यावेळेस त्या इतक्या वेड्यापिशा होतात की निर्जीव वस्तूंनाही विचारू लागतात की कुठे गेला आमचा सखा? कुठे गेला आमचा श्रीहरी? अर्थात त्या श्रीकृष्णाच्या सगुण रूपात इतक्या काही दंग झालेल्या असतात की त्या भानही विसरतात. सरतेशेवटी श्रीकृष्ण आपला मित्र उद्धवाला बोलावतो आणि त्याला ह्या गोपिकांना समजवायला सांगतो. तो सांगतो, हे उद्धवा, ह्या गोपिकांना सांग तुमची ही भक्ती सगुण भक्ती आहे. ती आता पुरे झाली. आता तुमच्यासाठी ब्राम्हज्ञान ग्रहण करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला निर्गुणाकडे वळण्याची गरज आहे. मी मोरपंख लावलेला जो दिसतो ते माझं सगुण रूप आहे, पण मी खरा निर्गुण निराकार आहे.

वरील गोष्टीवरून हेच सिद्ध होतं की व्यासांनी आपले तत्त्वज्ञान हे गोष्टीरूपाने मांडले आहे. श्रीकृष्ण कथेतील एक पात्र आहे आणि त्यांनी महाभारत ह्या कथेतूनच एकप्रकारे हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, श्रीकृष्णाचं खरं रूप निर्गुण निराकार आहे आणि तो देहरूपात दाखवणे हा महाकाव्याला सुबोध व सामान्य माणसाला गोष्टीरूपाने आवड निर्माण करण्यासाठी आहे. त्यामुळेच महाभारत आणि रामायण ह्या कथा आजही माणसे आवडीने वाचतात.

कोणतीही कथा लिहिताना बहुतांश वेळा लेखक तत्कालीन शहरे, गाव, प्रदेश यांचा उल्लेख करतो, ज्याचा वास्तवत: कथेशी संबंध नसतो, परंतु त्यामुळे त्या कथेत अधिक जिवंतपणा येतो. तीच बाब महाभारत लिहिताना व्यास मुनींच्या लिखाणात प्रकर्षाने जाणवते. आध्यात्मिक ज्ञान अथवा ज्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणू हे कथारूपाने हजारो पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचे श्रेय हे वाल्मिकी आणि व्यास मुनी यांना जाते. चिकित्सा आणि कार्यकारणभाव जाणून वाचन केल्यास आपल्याला खर्‍या ज्ञानाची उकल होते.

First Published on: April 2, 2023 2:30 AM
Exit mobile version