गोड मिरचीचा ठसका

गोड मिरचीचा ठसका

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान तसेच पिकांच्या जाती व उत्पादनवाढीसाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. असाच एक भन्नाट प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्रात रासायनिक औषधापेक्षा कमी खर्चात चक्क परदेशी मिरची उत्पादनाचा नवीन एक प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. चक्क मिरचीला होमिओपॅथी औषधाची फवारणी करून नेदरलँडची स्कॉच बोनेट या जातीच्या मिरची उत्पादनाचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तुम्ही घाटावरची मिरची, लवंगी मिरची, बेडगी मिरची असे मिरचीचे अनेक प्रकार पाहिले असतील. महाराष्ट्रात पहिल्यांदाच होमिओपॅथी औषधावर मिरचीचे पीक यशस्वीरित्या उत्पादित केले आहे.

कृषी विज्ञान केंद्रे कायम नवनवीन संशोधन करून शेतीमध्ये नवे पर्व आणण्याच्या प्रयत्नात असतात. असाच एक प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मिरचीची सगळी वाढ होमिओपॅथिक औषधे वापरून करण्यात आली आहे. आजपर्यंत होमिओपॅथी औषधांचा वापर पाहिला तर केवळ वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे. विशेष म्हणजे हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. स्कॉच बोनेट या मिरचीचा वाणाची वैशिष्ठ्ये म्हणजे या मिरचीचा असलेला गोडपणा. ही मिरची चवीला तिखट नसून गोड आहे.

मिरचीच्या पूर्ण वाढीसाठी आणि फवारणीसाठी होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत तीन पटीने कमी आहे. कधी न ऐकलेली होमिओपॅथीचा वापर करून केलेली शेती आता बारामतीत करण्यात येत आहे. एवढेच नाही तर ती यशस्वीदेखील होत आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बारामतीत नेदरलँडची स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथी औषधावर उत्पादित करण्यात आली आहे. बारामती येथील शारदा नगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची लक्ष वेधणारे ठरले आहे. होमिओपॅथी औषधांच्या आधाराने केवळ वीस हजार रुपयांमध्ये मिरचीचे उत्पादन करणे शक्य झाले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मिरचीवरील किड, रोग नियंत्रित करण्यासाठी निव्वळ होमिओपॅथी औषधांचा वापर करण्यात आलाय.

यासंदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष करंजे यांनी सांगितले की, कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. विरेंद्र पाटील यांनी संशोधित केलेल्या होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचे पीक घेण्यात आले आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात पिकवण्यात आलेली विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादित करण्यात आली आहे. तसेच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊसपेक्षा खूप कमी आहे.

या संदर्भात डॉ. विरेंद्र पाटील यांनी सांगितले की, आजपर्यंत होमिओपॅथिक औषधांचा माणसांसावर उपचारासाठी वापर केला जात आहे. होमिओपॅथीचा पिकांसाठी वापर करण्याची संकल्पना पहिल्यांदा पुढे आली. त्यातून बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने मिरचीवर हा प्रयोग करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे होमिओपॅथी औषधांचा वापर करून पिकांवरील कीड रोग नियंत्रित करण्यात यश मिळाले आहे. सध्या वेगवेगळ्या रंगातील लगडलेली मिरची याचा प्रत्यय देत आहे. याच होमिओपॅथी तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांवर होऊ होतो, असंही डॉक्टर पाटील यांनी सांगितलं.

–राकेश बोरा

First Published on: May 29, 2022 5:20 AM
Exit mobile version