भावस्वरांचा चंद्रमा…

भावस्वरांचा चंद्रमा…

–डॉ. अशोक लिंबेकर

मानवी मनातील भावविश्वाची संगीतमय, भावनोत्कट, अभिव्यक्ती म्हणजे मराठी भावगीत! मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा सदैव आपल्या आवडत्या गीताने व्यापलेला असतो. हे गीत तिथे एकटे नसते. अनेक आठवणींचे कोश त्यासोबत विणलेले असतात. या आठवणींची किती रूपे म्हणून सांगायची? आपल्या जीवनाच्या अनेक अवस्था या गाण्यांनी व्यापलेल्या. आनंदी आनंद गडेपासून ते संध्या छायापर्यंतचा अद्भुत प्रवास आणि त्यामधील अनेक थांबे या गाण्यांना भेटलेले. मग तिची चोरून झालेली पहिली भेट असो की आता त्या भेटीचा मनाला लागलेलं भेट तुझी माझी स्मरतेमधील चटका. पहिल्या भेटीतील युगाची ओढ असो की त्या भेटीतील तुटलेला अखेरचा धागा. असे अनेक प्रसंग भावगीताने आपल्या कवेत घेऊन त्यांना चांदण्याची शीतलता दिलेली.

भेट हे एक उदाहरण अशा अनेक भवावस्था, शब्दबद्ध करणारी गाणी नेहमीच आपले जगणे सुंदर करत आलेली. इथे तुटलेला जीव असला तरी शब्द सुरांच्या सामर्थ्याने तो आपले जगणे या स्वरांच्या नादात विणतच असतो. संगीताची हीच तर जादू असते. हेच ते चांदण्याचे कोष. जे जीवाची काहिली मिटवून तिला चंद्राची शीतलता नि सौंदर्य बहाल करतात. मग इथे दुःखाचेही गाणे होते, ग्रेसच्या कवितेसारखे. एखादा कवी त्या सांध्यसमयी आपल्या मनाला झालेला हा डंख भय इथले संपत नाही! मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते, असे घनव्याकूळ सुरात गाऊन जातो. हे तर खरे गाण्याचे सामर्थ्य. हा अनुभव समृद्ध करणाराच. पाडगावकरांनी उगीच का म्हटले या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…गाणे नसते तर ही कल्पनासुद्धा किती वैराण वाटते. आपण मराठी असण्याचे एक आनंदाचे विधान म्हणजे अशी असंख्य भावगीते आपल्या अवतीभवती आहेत. म्हणूनच मराठी माणसाचे ते सांस्कृतिक वैभव आहे. ते एक सौंदर्य संचित आहे.

मराठी भावगीत ही आपली एक वेगळी ओळख. या प्रकाराच्या पाऊलखुणा आणि इतिहासही मोठा रंजक. साधारण विसाव्या शतकाच्या प्रारंभी भावगीताची निर्मिती होऊ लागली असली तरी त्याची प्रसादचिन्हे थेट मध्यकाळापर्यंत मागे जातात. ती अकराव्या शतकापर्यंत नेता येतात. कवी जयदेवांची गीतगोविंद ही रचना, संतांचे अभंग, गवळणीमध्ये भावगीतांची बिजे आढळून येतात. ओवी ही तर गेय अभिव्यक्तीचे आद्यरूपच. मध्यकाळातील संत, पंडित आणि शाहीर या त्रिविध प्रवाहांतून ही गीतगंगा प्रवाहित होत आली आहे. वारकरी संतांच्या अनेक अभंगांमध्ये उत्कट भावाभिव्यक्ती आणि आत्मनिष्ठतेचा आविष्कार झाला आहे. उत्कटता, भावनांचा टोकदारपणा, आत्मनिष्ठता ही भावकाव्याची लक्षणे मराठी संतांच्या विराण्यातून आढळून येतात. शाहिरांच्या शृंगार रसप्रधान लावणीतूनही गीत डोकावते. पंडित कवींच्या आख्यान काव्यातून आणि त्यांच्या छंदातून गीताचा अंश आढळतो.

संत ज्ञानेश्वरांचे मोगरा फुलला, पांडुरंग कांती, पैल तो गे काऊ, संत एकनाथांची गवळण, संत तुकारामांचे अभंग यामधून उत्कट भावनांचा आविष्कार झाला आहे. त्यांच्या या सर्व रचना गीतसदृश्य आणि श्रुतीमधुर आहेत. संत तुकारामांनी तर म्हटले आहे गायनाचे रंगी! शक्ती अद्भुत हे अंगी!! किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, असे जेव्हा संत तुकोबा म्हणतात तेव्हा निश्चितच त्यांच्या मनात आपल्या काव्याची गेयता आणि संगीत यांच्याबद्दलचे महत्त्व त्यांच्या मनात असलेले दिसते. त्यामुळेच तुकारामांचे अभंगातून संगीतातील परिभाषा अभिव्यक्त झालेली दिसते. उदाहरणार्थ वृक्षांचे महत्त्व प्रतिपादन करतानाही तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती! या प्रकारचे अनेक संगीतातील शब्द, नाद, ताल, लय, राग, आलाप मात्रा इत्यादींचे दर्शन त्यांच्या काव्यातून घडलेले. वारकरी संतातील संत जनाबाई, नामदेव, संत सोयराबाई यांच्या काव्यातही भावगीताचे असेच दर्शन घडते.

नंतर आधुनिक काळातील संगीत नाटके यांनीही मराठी भावगीताचा पाया भक्कम केला. त्याला अनुकूल पार्श्वभूमी निर्माण केली. या काळातील अनेक नाट्यसंस्था आणि नाटककार, गायक यांनी जाणीवपूर्वक नाट्यगीते, नाट्यसंगीत निर्माण केले. त्यातून भावसंगीताचा मार्ग खुला झाला. भावे, किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, भास्करबुवा बखले, मास्टर दीनानाथ, केशवराव भोसले, बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, सुंदराबाई इत्यादी प्रतिभावंत कलाकार याच काळात रंगभूमी गाजवत होते. वास्तविक हा काळ जागतिक महायुद्धाच्या छायेतील काळ, परंतु मराठी रंगभूमीवर मात्र या काळात सुवर्णयुग अवतरले होते. याच मराठी रंगभूमीच्या समृद्ध वारशातून चित्रपट संगीत आणि भावगीत जन्मले. विसाव्या शतकात भावगीत नावाचं जे मधुर फळ आलं त्यासाठी मराठी मनाची, कलावंत, कवींची, गायक, संगीतकारांची प्रतिभा अनेक स्थित्यंतरातून गेली.

पेशवाईत उदयाला आलेली लावणी, मुसलमानी, इंग्रजी अमदानीचा सांस्कृतिक प्रभाव, मराठी आधुनिक नाटकांची संगीत रंगभूमीची नांदी, ध्वनी मुद्रणाचं युग, मूक आणि बोलक्या चित्रपटाचं आगमन असे अनेक उदयास्त घडले, असे संगीत अभ्यासक डॉ. शोभा अभ्यंकर यांनी म्हटले आहे. ते यथार्थ आहे. याच काळात मराठी काव्याला नवे परिमाण देणारी घटना घडली, ती म्हणजे सन १९२३ मध्ये झालेली रविकिरण मंडळाची स्थापना. यातील मान्यवर कवींनी मराठी भावगीताला पुढे आणले. याच मंडळातील कवी माधव ज्युलियन यांची प्रेम स्वरूप आई ही कविता गजाननराव वाटवे यांनी गायली. पुढे ना. घ. देशपांडे यांच्या रानावनात गेली बाई शीळ या भावगीताने मराठी भावगीत या प्रकाराची सुरुवात केली आणि भावगीताचे क्षितिज पुढे अनेक कवींनी विस्तारत नेले. याच क्षितिजावर उगवला तो शुक्रतारा, तर कधी पुनवेचा चंद्र!

श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर यासारखे संगीतकार तर अरुण दाते, सुरेश वाडकर, सुधीर फडके, मंगेशकर भावंडे, बोरकर, गदिमा, पाडगावकर, खानोलकर, ग्रेस, भट, शांता शेळके, महानोर, पी. सावळाराम यांसारखे कवी यांचा अपूर्व संगम साठनंतरच्या काळात घडून आला. मराठी भावगीतांना श्रुतीमधुर आणि रसिकमान्य करण्यात या व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे. पुढे भावगीतांचे नवे पर्व उदयास आले. चित्रपट माध्यमालाही साद घातली. त्यातूनही भावगीते नायक, नायिकांच्या ओठावर रुळू लागली आणि सुगम संगीताच्या या नव्या युगाचे संगीतविश्वात जोरदार स्वागत झाले. इतके की मराठी भावगीत मराठी रसिकांच्या पहिल्या पसंतीचे पान ठरले. पुढे याच पानावर मेंदीचा रंग खुलत गेला. भातुकलीने डोळ्यांत पाणी आणले, तर या जन्मावर शतदा प्रेम करायला शिकवले.

प्रेम, विरह, आनंद याबरोबरच मानवी मनातील सर्व भावावस्था शब्दांकित, स्वरांकित करून मराठी माणसाच्या मनात सुगंध सौंदर्याची पेरणी केली. दिवाळीच्या पहाट आंघोळीसारखेच मराठी भावगीत रसिकाच्या मनात कोरले गेले ते कायमचेच. मराठी भावगीतांचा हाच स्वर आजच्या चित्रपट संगीतातूनही ऐकू येतो. लोकसंगीताचा बाज घेऊनही सुगम संगीत किती मधुर करता येते याची साक्ष आजच्या महाराष्ट्र शाहीरमधल्या उमललेल्या गीताने दिली आहेच. अशी कितीतरी मराठी गीते लोकप्रियतेचे शिखर गाठून महाराष्ट्राचा कान सौंदर्य सुरांनी, मखमली आवाजाने, अलवार प्रितीच्या झुळझुळ पाण्याने भरून टाकलेला आहे. मराठी भावगीतांच्या बनात कधी प्रीत बहरली, फुलली, विफलही झाली तरी त्या सर्व मेंदीच्या खुणा गोंदनासारख्या जपत भावगीत अजरामर झाले. इतके की असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला, फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे…असे म्हणत ते कायमचेच रसिक मनात स्थिरावले. त्यामुळेच महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैभव म्हणूनच मराठी भावगीते महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून तेजाने चमकत राहतील यात शंका नाही.

First Published on: June 4, 2023 1:45 AM
Exit mobile version