परीक्षा केंद्रित शिक्षणाचा धोपट मार्ग !

परीक्षा केंद्रित शिक्षणाचा धोपट मार्ग !
–संदीप वाकचौरे
 शाळा म्हणजे काय, असा प्रश्न विचारला तर  त्याचे उत्तर असते जेथे शिक्षण मिळते ते ठिकाण. शाळांना विद्यालय असेही म्हटले जाते.आज ही ठिकाणे खरचं विद्यालय आहेत का ? विनोबा म्हणतात, की विद्यालयाचे तसे दोन अर्थ आहेत. त्यापैकी एक म्हणजे जेथे विद्येचे स्थान आहे असे ठिकाण आणि दुसरा अर्थ आहे जेथे विद्या लुप्त झाली आहे असे ठिकाण. शाळेत प्रवेशित झाल्यावर खरंच विद्या मिळते का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. ज्यांना विद्या प्राप्त होते ते परिवर्तनाची वाट चालण्याची शक्यता अधिक असते. विद्या प्राप्त केल्याने विद्येचे तेज चेहर्‍यावर दिसते. विद्या प्राप्त केल्यानंतरही अविद्या असल्यासारखेच वर्तन करणार असू तर प्राप्त शिक्षणातून जे काही मिळाले आहे ती विद्या नाहीच. विद्या माणसांत स्वाभिमानाची पेरणी करत असते. माणसांमध्ये येऊ पाहणारी लाचारीची वृत्ती संपवते. माणसांमध्ये असलेली ज्ञानाची भूक उंचावते. आत्मविश्वासाची पेरणी करते. प्रत्येकालाच स्वत:मध्ये डोकावण्याची शक्ती प्रदान करते.
आत्मपरीक्षणाची वाट दाखवत असते. सत्याचे मोल मनात निर्माण करते. सत्तेच्या नाही तर सत्याच्या वाटेने चालण्यासाठी मस्तकात शक्ती देते. आज विद्यालयातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात यातील कशा कशाचे दर्शन घडते? शिक्षण घेतल्यानंतर व्यक्तीत परिवर्तन होते का? व्यक्तीमध्ये शिक्षण परिवर्तन करत नाही. जेथून विद्येच्या संदर्भाने अपेक्षा केली जाते त्या  विद्यापीठांची अवस्थादेखील फारशी चांगली आहे असे नाही. विद्यापीठांद्वारे लाखो विद्यार्थी हातात पदवीचे प्रमाणपत्र घेऊन येतात. ते प्रमाणपत्र ना जगण्याची उमेद देते,  ना जगण्यासाठीची शक्ती देते. प्रमाणपत्र हाती घेऊन बाहेर पडल्यानंतर त्या कागदाद्वारे जो  प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर पडलेला दिसायला हवा तो प्रभाव दिसत नाही. आजची विद्यापीठे म्हणजे माहितीचे  पीठ  पाडणारी व्यवस्था बनल्याची टीका सातत्याने केली जाते. त्यामुळे  शिक्षण, शाळा, विद्यालये, विद्यापीठे यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्णत्वाला जाताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षणाचा मूळ हेतूच दुर्लक्षित होतो.
शिक्षण देणारी ठिकाणे म्हणजे ज्ञान निर्मितीचे केंद्र आहेत. तेथून ज्ञान निर्मिती व्हावी. त्या वाटेने जाण्याची मनिषा निर्माण होऊन चालण्याची वृत्ती बनायला हवी. आजची शिक्षण देणारी ठिकाणे  ज्ञान देणारी आहेत की नोकरी देणारी, असा प्रश्न पडतो. शिक्षण घेतल्यावर आपण ज्ञानासाठी घेतले असे म्हणणारे अभावाने व्यवस्थेत दिसतील. शिक्षण का असा प्रश्न केला तर नोकरी उत्तम मिळावी म्हणून अशी समाजमनाची धारणा आहे. शिक्षणाचा संबंध हा नोकरीशी नाही तर तो ज्ञानाशी असतो हे पेरण्यात आपली व्यवस्था अपयशी ठरली आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीची दिशा आणि त्याने ज्ञानाची साधना करावी. त्या ज्ञानातून  स्वतःच्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग सापडावा अशी अपेक्षा असते. वर्तमानात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी उरला नाही. विद्यार्थी ज्ञानार्थी बनण्यासाठीचा मार्ग अनुसरत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानापेक्षा परीक्षेच्या माध्यमातून मार्कांची अधिक ओढ आहे.
 विद्यार्थी हे विद्येसाठी शिक्षणाच्या प्रक्रियेत येतात का ? तर त्याचे उत्तर अर्थात नाही असेच येण्याची शक्यता अधिक आहे. उलट विद्यार्थी शिक्षणात ज्ञानाची साधना करण्यापेक्षा परीक्षेसाठीची तयारी अधिक करतात. परीक्षेला सामोरे जाणे हीच जीवनाची साधना बनली आहे. आपण शिकण्यावर भर देण्याऐवजी परीक्षेसाठी कशी तयारी करतो हेच महत्वाचे ठरत आहे. आपले सारे शिक्षणच परीक्षा केंद्रित बनले आहे. अभ्यासाने जीवनाची उन्नती होते, माणसांची उंची वाढते, जीवनात प्रभाव निर्माण करता येतो. आज  परीक्षेला मार्क मिळतील तोच मार्ग अनुसरणे पसंत केले जाते. पालकांनाही परीक्षेची वाट चालणे पसंत आहे. मार्कांचा प्रवास कदाचित नोकरीची वाट दाखवेल, पण नोकरी म्हणजे शिक्षण परिणामकारक झाले असे नाही. अभ्यास करताना परीक्षेला कोणते प्रश्न येणार हेच पाहिले जाते. जे प्रश्न परीक्षेला येतील त्याच प्रश्नांचे  घटक शिकवण्यावर व्यवस्था भर देते. त्याच घटकाला महत्व दिले जाते.
परीक्षेपेक्षाही अनेकदा एखादा घटक महत्वाचा असतो. एखादा घटक पूरक वाचनासाठी असतो, मात्र त्याकडे डोळेझाक करणे पसंत केले जाते. संतांचे साहित्य अभ्यासक्रमात आहे. त्या साहित्याचा संबंध परीक्षेच्या मार्कांशी नाही तर जीवन समृध्दीशी असतो. ते साहित्य परीक्षेला नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अभ्यास म्हणून त्याचा विचार करायला हवा असा  विचारही केला जात नाही. अभ्यासक्रमात संत तुकाराम, ज्ञानेश्वर आहेत, त्यांचे अभंग, ओव्या पाठ करण्यापेक्षा ते घटक किती मार्काला आहेत, याचा विचार अधिक केला जातो. संतांचे साहित्य पाच दहा मार्काला आहे. त्यामुळे अभंग, ओव्यांचा अभ्यास करण्यापासून दूर जाणे घडते. संतसाहित्य हे जीवनाला समृध्द करणारे आहे. आपली शिक्षणाची व्यवस्था परीक्षा, मार्क्स  आणि नोकरी  केंद्रित बनत चालल्याने सत्व गमावू पाहते आहे.
  आता परीक्षा दिली आणि चांगले मार्क मिळाले म्हणजे अभ्यास उत्तम झाला असेही घडत नाही. परीक्षेनंतर काही दिवसाने परीक्षेतील एखाद्या प्रश्नांविषयी विचारले तर पुन्हा आठवत नाही.अनेकदा लक्षात ठेवायची गरजच पडत नाही. सारा अभ्यास परीक्षेपुरताच मर्यादित असतो. परीक्षेशिवाय शिक्षण जीवनात उरत नाही..आणि जे उरले आहे त्याला  शिक्षण म्हटले जात नाही. आपल्या जीवनात आज जे काही आपल्याला स्मरते आहे ते शिक्षणात कोठे होते का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. शालेय शिक्षणात जे शिकलो त्याचा काही उपयोग नाही ही धारणा झाल्याने सूक्ष्मतेने अभ्यासाच्या वाटेचा प्रवास करण्याची गरज उरली नाही. अलिकडे शिक्षणात विद्यार्थी उरलेच नाहीत’. समाजही परीक्षा योग्य मार्गाने होण्याची मागणी करत नाही. समाजमनही कॉपी करण्याबाबत गंभीरपणे पाहत नाही. कॉपी केली तरी त्याचे वाईट वाटत नाही.
अलिकडे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात म्हणून मुले रस्त्यावर उतरताना दिसतात. कॉपीला विरोध केला तर शिक्षकांना मारहाण होते..कॉपी पुरविण्यासाठी पालक आणि समाजातील घटकदेखील सक्रीय असतील तर आपण शिक्षणातून बरेच गमावले आहे असेच म्हणावे लागेल. आपला पाल्य किमान मार्काने पास व्हावा आणि त्यासाठी त्यांनी कोणताही मार्ग अनुसरला तरी त्याचे वाईट वाटत नसेल तर, आपण चूक करत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे विद्यार्थी या शब्दाच्या अर्थाचा असलेला गाभाच गमावणे घडत असेल तर वर्तमानात फक्त परीक्षार्थीच उरले आहेत असेच म्हणावे लागेल. परीक्षा उत्तीर्ण व्हायचे आहे आणि तेही केवळ नोकरीसाठी असाच प्रवास असणार असेल तर  परीक्षार्थी   म्हणण्याऐवजी त्याला  नोकारार्थी  म्हटलेले अधिक योग्य असेल. शिक्षणाचा प्रवास हा विद्यार्थी ते नोकारार्थी होऊ लागला तर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. प्रश्नांची उत्तरे देणारा विद्यार्थी निर्माण केला तर त्यातून फार चांगला समाज निर्माण होईलच असे नाही. आज मार्क चांगले असले तरी विद्यार्थी जीवनात यशस्वी होताना दिसत नाही. जे विद्यार्थी परीक्षेत अपयशी होतात ते जीवनाच्या परीक्षेत पास होऊन यशाच्या शिखरावर गेलेले आहेत. रवींद्रनाथ टागोर, अण्णा भाऊ साठे, अण्णा हजारे, वसंत दादा, सचिन तेंडुलकर अशी कितीतरी नावे आहेत. याचे कारण ही माणसं जीवनभर विद्यार्थी राहिली आणि शिक्षणात सहभागी झालेली माणसं जीवनभर परीक्षार्थी बनली. त्यामुळे परीक्षांचे स्वरूप केवळ सत्र परीक्षा असे न करता समग्र मूल्यमापनाचा विचार केंद्रस्थानी असायला हवा. आपण परीक्षेतून पाठांतरचा विचार अधिक करतो.
त्याला एखादा घटक किती समजला ? त्याचे त्या संदर्भातील आकलन किती आहे? त्या घटकाचा विचार कसा केला जातो आणि त्या संदर्भातील प्राप्त माहितीचे उपयोजन प्रत्यक्ष आपल्या जीवनात किती आणि कसे करतो याचा अधिक विचार करण्याची गरज आहे. परीक्षा आकलन शून्य असतील तर शिक्षणातून चांगला समाज निर्माण होणार नाही. शिक्षण घेताना अभ्यासाची सवय वृध्दींगत करणे. त्या माध्यमातून ज्ञानाचे साधक निर्माण करण्याचे शिवधनुष्य व्यवस्थेला पेलावे लागणार आहे. अन्यथा शिक्षण घेऊनही आपल्याला शिक्षणातून माणूस निर्माण करता येणार नाही. शेवटी गर्दीच्या महाजालातून आपल्याला राष्ट्र निर्माण करता येणार नाही. वर्तमानात शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन केल्याशिवाय समाजात परिवर्तन झालेले अनुभवता येणार नाही. शिक्षण हे ज्ञानासाठी असावे. शिक्षणातील प्रत्येकजण विद्यार्थी असेल. त्यादृष्टीने परीक्षांचादेखील पुनर्विचार करायला हवा. शेवटी परीक्षा केंद्रित व्यवस्थेला धक्का देत आपण मार्गक्रमण करण्याची गरज आहे.
First Published on: September 3, 2023 1:00 AM
Exit mobile version