आजची बालरंगभूमी आणि नवता!

आजची बालरंगभूमी आणि नवता!

-अरविंद जाधव

सुट्ट्या लागल्या त्यामुळे आज मराठी रंगभूमीवर बोक्या सातबंडे, हसवणारा राक्षस,मिकीमाऊस हरवला, देवाची रंगपेटी, जंगली बाणा, हॅपी बर्थडे डॉरीमॉन भीम, निंज्या-टॉम, गंमत नाट्याचे गुपित, फटाक्यांना घाबरणारे राक्षस, भांडणपूरचे झडकू पिटकू आणि अनेक वर्षं गाजत असणारं अलबत्या-गलबत्या अशी नाटके दिसतात. बालनाट्ये येतात व जातात. निदान रविवारच्या सुट्टीत एकतरी प्रयोग असायला हवा होता, मात्र तसं होत नाही. अनेक बालनाट्यांचे प्रयोग आजच्या बालनाट्यांचा विचार करता फक्त सुट्ट्या लागल्या की, त्यांचं पीक येतं असं म्हणावं लागेल.

वृत्तपत्रातील जाहिरात पाहता ते दिसून येतं. खरंतर सुट्ट्या लागल्या की मुलं नाटक बघायला येतील या उद्देशाने बालनाट्य होतात. बालनाट्य स्पर्धा वगळता आजची बालनाट्यं हवी त्या प्रमाणात होत नाहीत असं म्हणावं लागेल. त्याला अनेक कारणे असतील, परंतु ज्या प्रमाणात बालनाट्य व्हायची ती आता होताना दिसत नाहीत. पूर्वीचा बालनाट्य चळवळीचा जोर ओसरलेला दिसतो. सर्वांना हे पक्क माहीत आहे की, प्रसारमाध्यम तंत्राने मारलेली उसळी यामुळे प्रत्यक्ष रंगभूमीवरील बालनाट्ये पाहण्यापेक्षा मुलांना समर कँम्पकडे पाठवायचं आणि कधी यांची एकदाची सुट्टी संपते तोपर्यंत ते गुंतून राहतील असं काही पाल्यांना वाटतं.

किंवा काहींना असंही वाटतं की, या बालनाट्य शिबिरात जाऊन आपलं मुल चांगला अभिनय करेल. मात्र आजकाल रिल्स बनविण्यात लहान मुलं मग्न दिसतात, तिथं त्यांचा आत्मविश्वास जास्तच दुणावतो. शाळेतल्या नाटूकल्यात, स्नेहसंमेलनात, तो नेहमी भाग घेतो म्हणजे त्याचा कल कलेकडेच आहे असं पालकांना वाटत राहतं, मात्र पुढे तसं होतंच असं नाही. कारण बालकांना जसे वातावरण उपलब्ध होईल तसे ते घडतात. याला अपवाद सातत्य आणि यशातून मिळालेलं बक्षीसही असतं.

सुट्ट्यांमधील बालनाट्य शिबिरांचे शुल्क परवडणारे असतेच असे नाही. आज मोबाईलने मुलांच्या कला शिबिरांची जागा घेतलीय हे वास्तव नाकारू शकत नाही, तासंनतास मुलं मोबाईलमध्ये डोकं खुपसून राहतात, तेवढी ती पुस्तकात डोकं खुपसत असती तर ते बर्‍याच बालनाट्यांचे लेखकही बनू शकले असते. बर्‍याचदा छोट्यांची बालनाट्ये मोठेच लिहितात. बालनाट्य संमेलन किंवा बालकुमार साहित्य संमेलनात असं छोट्यांचं लेखन आपल्याला वाचायला मिळतं. बालनाट्य रंगभूमीवर आलं की, त्याचा पुढं फायदा होते हे रास्त आहे. अनेक बालकलाकार आज मोठे कलाकार आहेत. रिअ‍ॅलिटी शोमधून अनेक बालकलाकार नाटक-सिनेमात वावरताना दिसतात.

शाळांमधील बालनाट्य स्पर्धा, आंतरशालेय किंवा राज्यस्तरीय स्पर्धाही बालकलाकारांना नित्य प्रोत्साहन देत असतात, मात्र तिथेही प्रचंड स्पर्धा आहे. नाकारू शकत नाही. तिथेही माझ्या प्रशिक्षण शिबिरातील, परिचयातला, आत्पेष्ट वगैरे अशा अनेक गोष्टी घडतात. काही अनुभवी अभ्यासू परीक्षकही असतात. त्यांच्या निवडीबाबत शंका येत नाही, मात्र काही हरहुन्नरी परीक्षकही असतातच! एकदा मुलांची निराशा झाली की त्यांना तिथे आवडीने यायला सवड लागतेच. आज तंत्रज्ञानाचा वापर बालनाट्यात मोठ्या प्रमाणात होतो, यामुळे छोटी मंडळी नाटकांकडे आकर्षिली जात आहेत.

पाश्चिमात्य देशात बालरंगभूमी, स्वायत्त रंगभूमी हा विचार तिथे अनेक वर्षांपासून आहे, आपल्याकडे लिटल थिएटर म्हणजे बालरंगभूमी २ ऑगस्ट १९४९ साली सुरू झाली. सुधा करमरकर यांनी ही संस्था सुरू केली. अनेक ज्येष्ठ नाटककारांनी परीकथा, अद्भुत कथा यांची नाट्यरूपांतरे लिहिली. मनोरंजन आणि बालसंस्कार हा हेतू यामागे होता. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, विनोद हडप, आनंद केदार , निळकंठ नांदुरकर या लेखकांनी या संस्थेसाठी नाटके लिहिली. असाच प्रयत्न सुलभा देशपांडे, अरूण काकडे, अरविंद देशपांडे यांनी चंद्रशाला व आविष्कार यांच्या वतीने केला. पुरूषोत्तम दाव्हरेकर यांनीही त्यांच्या रंजन कला मंदिर या संस्थेकडून बालनाट्ये सादर केली.

कांचन सोनटक्के, वंदना विटणकर, नरेंद्र बल्लाळ, सुधाकर प्रभू, लिला भागवत तसेच रामनाथ थरवळ यांनीही बालनाट्ये केली. पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी यांनी मोठ्या ताकदीने बालनाट्येे लिहिली आहेत. या नाटककारांच्या सर्वच बालनाट्यांचा विचार करता येणार नाही, मात्र सध्या त्यांची नाटके पुन:श्च रंगभूमीवर यायला हवीत. प्राणी-पक्ष्यांच्या रूपाने बालनाट्य विषय खुलविले जातात तसे मानवी जीवनातील भावबंध, प्रबोधन विज्ञानविषयक विचार बालनाट्यातून येणं अपेक्षित आहे. आज अशी नाटके होत असली तरी फक्त हसवणे, गंमत घडावी या गोष्टीकडे कल दिसतो.

जुनी बालनाट्ये पुनर्जिवीत व्हायला हवीत. तशी नवीन नाटकं लिहिली जावीत. त्यांच्या लेखनाला सातत्याने संधी मिळावी. शालेय जीवनापासून ज्या नाटकातून कलाकाराची वाटचाल सुरू होते, त्यामुळे आजही त्या मोठ्या कलाकारांनी बालरंग भूमीकडे पाठ फिरवून चालणार नाही. कारण हीच मुलं महाविद्यालयात होत असणार्‍या एकांकिका स्पर्धेत भाग घेतात. व्यावसायिक रंगभूमीवर काम करतात, त्यांनी बालरंगभूमीकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये.

सध्या बालनाट्य प्रेक्षक निर्माण व्हायला हवा. त्याला वेळीच प्रोत्साहन मिळायला हवे. बालनाटकाच्या अभ्यासक अंजली कीर्तने बालनाटकाविषयी म्हणतात- ‘प्रौढांपेक्षा ते कल्पनेच्या जगातही अधिक स्वैरपणे वावरू शकतात. अद्भुत, चित्तथरारक, जलद हालचालींचे वेगवानपणे रंग बदलणारे जादूमय कल्पनाविश्वच त्यांच्या दृष्टीने वास्तव असते. त्यांची स्वप्ने, दिवास्वप्ने इच्छा आकांक्षा या जगात मिसळून गेलेले असतात.

‘खरंय मुलांचं भावविश्व खूप मोठं असतं तेव्हा त्यांचा कलाप्रांत स्वतंत्र आणि नव्याचा शोध घेणारा असला पाहिजे. त्यांची खेळकर वृत्ती, खेळीमेळीने जगण्याच्या प्रेरणा देतात. त्यांचा निरागसपणा मोठ्यांना बरंच काही शिकवून जात असतो. म्हणून त्यांच्या नाटकातील आई-बाबा पूर्वीपेक्षा मोठी माणसंच असल्याने आता बालनाट्याचे वेगळे वैशिष्ठ्य दिसून येते.

बदलत्या पिढीगणिक आजचे बालरंगकर्मी नाविन्याचा विचार जोपासणारे आहेत. पाश्चिमात्यांच्या थिएटरचा प्रभाव त्यांच्यावर पडत आहे. पालकही या बाबातीत सजग आणि जाणकार आहेत. तंत्रज्ञान साक्षरता व त्याची दक्षता याची जाण वाढत आहे. त्याचा प्रमाणित वापर, कौशल्ये, जादू, चमत्कार, प्रकाशयोजना ध्वनी यांची संगती जोडली जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोजनेने आणि जुन्या-नव्या संहितेने आजची बालनाट्ये उद्याची नवता घडवित आहेत.

First Published on: May 5, 2024 3:30 AM
Exit mobile version