अंतराळवीर कल्पना चावला

अंतराळवीर कल्पना चावला

कल्पना चावला यांचा आज स्मृतिदिन. भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना ‘गरुडझेप’ मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला. पहिली भारतीय महिला अंतराळवीर. अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रातसुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात, हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी अंतराळयात्री म्हणजे कल्पना चावला.

कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरयाणा राज्यातील करनाल या गावी झाला. बनारसीलाल चावला आणि संज्योती चावला या दाम्पत्याचे चौथे अपत्य. भावंडांमध्ये त्या सर्वात लहान. त्यांचे शालेय शिक्षण १९७६ च्या दरम्यान टागोर स्कूलमध्ये झाले. त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगढ येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात १९८२ साली पदवी आणि टेक्सास विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी (एरोस्पेस इंजिनिअरिंग) या विषयात १९८४ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८८ मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. पदवी मिळविली.

कल्पना यांचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन यांच्याशी झाला होता. त्यानंतर नासाच्या (NASA; १९९३ साली त्यांचे ओव्हरसेट मेथड्स इनकॉर्पोरेशन, लॉस अल्टोस (कॅलिफोर्निया) येथे उपाध्यक्ष आणि संशोधन वैज्ञानिक म्हणून निवड झाली. डिसेंबर १९९४ मध्ये कल्पना यांची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली. अंतराळवीरांच्या १५ व्या गटात त्यांनी स्थान मिळविले. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणार्‍या स्ट्रॉनॉट ऑफिस, एव्हा (EVA, एक्स्ट्रा व्हेईक्युलरक्टिव्हिटी), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाल्या. त्यांच्या कामात रोबॉटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळ यानाला नियंत्रित करणार्‍या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली त्यांची निवड STS-८७ अवकाश यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली.

कल्पना यांनी आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानामधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले. कल्पना चावला यांचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २००३ या १६ दिवसांच्या कालावधीतले. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली. मात्र, या मोहिमेचा अंत दु:खद झाला.

१ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटे आधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पना यांच्यासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होत्या. कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविश्ड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे.

 

 

First Published on: January 31, 2021 9:05 PM
Exit mobile version