देख के दुनिया की दिवाली…

देख के दुनिया की दिवाली…

मुकेशदा…
किशोर कुमार महंमद रफी, लता मंगेशकर यांच्या बहराच्या काळातले मुकेशदा..
मुकेशचंद्र झोरावरचंद्र माथूर हे त्याच पूर्ण नाव.
आवाज अनुनासिक… म्हणजे नाकातला, पण स्वच्छ, शुद्ध आणि सुस्पष्ट, गाण्यातला शब्द न शब्द नीट आणि नेमका कानामनात पोहोचवणारा.
काही असो, पण त्या आवाजात ओतप्रोत कारूण्य भरलेलं… त्यामुळे हृदयाला थेट भिडणारा तो आवाज मन भारावून टाकणारा….. कदाचित मन भारून टाकणारा.
असो, तर या दिवाळीच्या सणाला मुकेशदा नावाच्या माणसाची आठवण येण्यामागचं कारण काय !
कुणाला नक्की वाटेल की त्याचं ते गाणं-लाखों तारे, आसमान पे, एक मगर ढुंढे ना मिला, देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला-हेच त्यांची आठवण येण्यामागचं निमित्त असणार!

आता उगाच खोटं कशाला बोलायचं, त्यांची अशी आठवण येण्यामागचं ते कारण आहे… पण लखलखत्या, झगमगत्या दिवाळीची गाणीही तशीच लखलखती, झगमगती असतात, ‘दिपावली मनाने को आयी, मेरे साई के हातों में जादू का पानी’ सारखी… त्यात मुकेशदांच्या ‘लाखों तारे, असमान पे’ सारखं दिवाळीवरचं ऐन दिवाळीत वेगळ्याच दुनियेत नेणारं हटके गाणं हे दिवाळीसारख्या आनंद ओसंडून वाहणार्‍या सणाला धरून नसतंच…

पण तरीही त्या गाण्याची आठवण माझ्यासारख्या एखाद्याला अशा दिवाळीच्या सणासुदीला का यावी?… आणि त्या गाण्याबरोबर ते गोरेगोमटे मुकेशदा असे नजरेसमोर का यावेत?

त्यामागेही तसाच एक कार्यकारणभाव आहे…
त्याआधी थोडंसं प्रास्ताविक सांगावं लागेल…

हवामानाच्या बाबतीतला तो तसा एक वेगळा काळ होता… आतासारख्या ग्लोबल वॉर्मिंगने तेव्हा अख्खं जग पादाक्रांत केलेलं नव्हतं. त्यामुळे पाऊस पावसाच्या वेळी पडायचा आणि आपली व्हॅलिडिटी संपली की बिचारा निघून जायचा. मागोमाग थंडीही आपल्या नेमून दिलेल्या वेळेत यायची आणि महत्त्वाचं म्हणजे ती मुंबईला कुडकुडायला लावायची. दातखिळ बसवायची. फक्त घाम न येणं ही जी आजच्या मुंबईतल्या थंडीची व्याख्या आहे तरी त्या मुंबईतल्या थंडीची नसायची. आणि त्या थंडीतच त्या काळाच्या कॅलेंडरामध्ये दिवाळीच्या तारखा दिसायच्या आणि त्या प्रचंड गारेगार वातावरणात लखलख चंदेरी तेजाची ती न्यारी दिवाळी हजर व्हायची.

कडेकोट थंडीने कवटाळलेली ती दिवाळी आल्हादायक वातावरणातली वाटली तरी ती स्वेटरशिवाय सोसवली जायची नाही….आणि अशाच त्या दिवाळीतल्या थंडीत… किंवा थंडीतल्या दिवाळीत मुकेशदांसारखा एक गायक रात्री आपली गाडी काढायचा. गाडीच्या डिकीत बरीच उबदार ब्लँकेट्स भरायचा आणि त्याची गाडी मरीन ड्राइव्हच्या दिशेने निघायची आणि समुद्रकिनारी येऊन थांबायची….

…नाही थांबली की गाडीच्या काचा खाली करून हा गायक कोणतं दृश्य पहायचा तर समुद्रावरून येणारे अंग गोठावून टाकणारे वारे झेलत निवार्‍याला घर नसणारे काही गोरगरीब, काही भिकारी कट्ट्यावर बसलेत. काही फुटपाथवर पडलेत.

मुकेशदांना ते दृश्य बघवायचं नाही, त्या पराकोटीच्या थंडीत कुडकुडणारे ते जीव बघून त्यांच्या काळजात धस्स व्हायचं. आपल्या अंगावर आपला स्वेटर इतका कडेकोट लपेटूनसुद्धा आपल्याला ही थंडी इतकी नको जीव करते आहे आणि ही माणसं असा प्रचंड बोचर्‍या थंडीत अंगावरच्या साध्यासुध्या कपड्यात कुडकुडत तशीच राहताहेत. थंडीविरुद्ध संरक्षणासाठी काहीही न घेता थंडीशी दोन हात करताहेत याचं त्यांना फार आश्चर्य वाटायचं…

मुकेशदांचा आवाज एका संवेदनशील माणसाचा आवाज होता. त्या संवेदशनील आवाजाइतकंच संवदेशनशील मन त्यांच्याकडे असणं साहजिक होतं. अशी माणसंच दुसर्‍याचं दुःख, दुसर्‍याचं दुखणं, दुसर्‍याच्या यातना, दुसर्‍याच्या मनातल्या चिंता जाणत असतात…. शिवाय एका ठिकाणी दस्तुरखुद्द मुकेशदाच ‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार’ असं गाऊनही गेले होते….

…पण इथल्या मरीन ड्राव्हच्या फुटपाथवरच्या थंडीत तर असल्या उधार दर्दचा बाजारच पसरलेला होता….सरतेशेवटी त्या परकोटीच्या थंडीत मुकेशदा आपल्या गाडीतून उतरले. गाडीच्या डिकीत भरलेली स्वेटर्स त्यांनी बाहेर काढली… आणि हातपाय आखडून बसलेल्या त्या गोरगरिबांना ती स्वेटर्स ते भराभरा वाटू लागले. ती फक्त स्वेटर्स नव्हती तर थंडी नावाच्या कावेबाज गनिमाशी लढण्याची आयुधं होती.

सगळी स्वेटर्स वाटून झाल्यावर मागे वळून मुकेशदांनी पाहिलं तर ती स्वेटर्स एव्हाना सगळ्यांच्या अंगावर होती… आणि त्यांचं कुडकुडणं थोडंफार तरी कमी झालं होतं… त्यांच्या गाण्यात त्यांनी म्हटलेलं किसी का दर्द मिल सके तो ले उधार हे म्हणणं त्यांनी नुसतं साधं ठरवलं नव्हतं तर तो दर्द रोखीने मिटवण्याचा प्रयत्न केला होता….दिवाळीच्या निमित्ताने दर्दभरी गाणी गाणार्‍या मुकेशदांमधल्या जातिवंत, दयावंत माणसाची म्हणूनच आठवण झाली!

First Published on: October 27, 2019 5:03 AM
Exit mobile version