लोकप्रिय शाहीर पठ्ठे बापूराव

लोकप्रिय शाहीर पठ्ठे बापूराव

पठ्ठे बापूराव उर्फ श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर यांचा आज स्मृतिदिन. पट्ठे बापूराव हे प्रसिद्ध शाहीर होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी सांगली जिल्ह्यातील हरणाक्ष रेठरे या गावी झाला. लहानपणापासून बापूराव यांना तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी त्यांना शाळेत घातले. त्याचवेळी त्यांना कविता करण्याचा छंद लागला व त्यांचा गळाही गाता राहिला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. बापूरावांच्या शिक्षकांनी शिफारस करून त्यांचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी बापूरावांना आपल्याकडे बोलावून घेतले. त्यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले.

पुढे त्यांच्या १६ व्या वर्षी राणीसाहेबांनी त्यांना बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. त्याबरोबरच त्यांनी कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. त्यांच्या गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापूराव चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगिरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावांच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली.

श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने ‘कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन’ हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचे फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून त्यांची वाहवा होता होता ‘पठ्ठे बापूराव’ म्हणून ते प्रसिद्धीला आले.

नंतर ते मुंबईत आले. बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना पवळा हिवरगावकर भेटली. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सानिध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन् पवळाबाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर ‘मिठाराणी’चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.

‘पठ्ठे बापूराव आणि पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा’ या नावाने नव्या जोमाने सुरू झाला. पुढे पवळाच्या मृत्यूनंतर
तमाशा बंद पडला. नंतर बापूरावांचे अखेरचे दिवस विपन्नावस्थेत गेले. त्यांच्याच तमाशात काम करणार्‍या ताई परिंचेकर यांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. पुण्यातील बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावांच्या कवनांचे संकलन केले.
अशा या लोकप्रिय शाहिराचे 22 डिसेंबर 1945 रोजी निधन झाले.

First Published on: December 22, 2021 5:00 AM
Exit mobile version