शंभू

शंभू

झाली असतील आता पंधरा-सोळा वर्षे. तेव्हा मी नुकताच बी.एस्सी होऊन बी. एडला नंबर लागण्याच्या प्रतिक्षेत होतो. त्यावर्षी बी. एडला नंबर काही लागला नाही. आता करायचं काय? तेवढ्यात एका रात्रशाळेत गणित -विज्ञान शिकवायला शिक्षक पाहिजे असल्याची बातमी वाचली आणि सूचना दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीला गेलो. मुलाखत झाली, पण माझं बी. एड नसल्याने मला ही नोकरी मिळणार नाही असं वाटत असतानाच मुलाखत घेणारे मुख्याध्यापक मला बसा म्हणाले, त्यांनी कोणाशीतरी बोलून मला तुमचं बी. एड. नसलं तरी आम्ही तुम्हाला घेऊ…..मी धन्यवाद देत उठणार इतक्यात, बरं पगार काही मोठा नाही. त्यात तुम्ही अन्टेन. तेव्हा तुम्हाला पाचशेपर्यंत देऊ.

पगाराचा तो भला मोठ्ठा आकडा ऐकून मी अवाकच पडलो. तरी हरकत नाही शाळेतल्या शिकवण्याचा अनुभव घेणं माझ्यादृष्टीने गरजेचं होतं. मी ताबडतोब होकार देऊन दोन दिवसांनी रुजू होण्याच्या अटीवर मी तिथून निघालो. दोन दिवसांनी मी रुजू झालो. आठवीचा वर्ग होता. वर्गात सर्व मुलं, जवळपास समोर चाळीसेक मुलं बसली होती. एकदा निरीक्षण केलं आणि पहिल्या नजरेत कळलं की, ही मुलं आठवीच्या मानाने मोठी आहेत. एका विचित्र नजरेने ती बघत होती. मुख्याध्यापकांनी कोणता तरी बकरा पकडून आणला आहे ही एक भावना त्यांच्या डोळ्यात होती.

आठ दिवस झाले, हजेरी घेताना एक मुलगा-शंभू मागील जवळपास पंधरा दिवस गैरहजर होता, मी मनातल्या मनात आजारी वैगरे असेल म्हणून सोडून दिलं. त्याबद्दल मी मुख्याध्यापकांना सांगितलं. त्यांनी चार दिवस थांबून मग बघूया असं म्हणत माझी रवानगी केली. पुढील चार दिवसदेखील शंभू आला नाही. मी पुन्हा मुख्याध्यापकांना त्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी एक पत्र तयार करून दिलं आणि उद्या शाळेत येण्यापूर्वी तुम्हीच हे पत्र त्या मुलाच्या पालकांना देऊन या. मी शाळेतल्या फाईलमधून त्या शंभूचा पत्ता घेतला. पत्ता थोडा विचित्रच होता, कुठल्यातरी वस्तीचं नाव होत बस्स !..मी दुसर्‍या दिवशी लवकर निघालो आणि त्या वस्तीचा पत्ता विचारत निघालो. लोक पत्ता विचारला की, बोट दाखवत तिकडे जा एवढं सांगत होते. मी तसा जात होतो. गल्ली बोळातून वाट काढत मी तिथे पोहोचलो आणि काय आश्चर्य !

आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची मुळीच कल्पना नसते. इतके दिवस या मोठ्या कॉलनीत अशी एक बकाल वस्ती आहे याची कल्पनादेखील नव्हती. मी त्या गल्लीच्या शेवटाला पोचलो तर पन्नासेक झोपड्या बांधल्या होत्या. तिथे शंभूची चौकशी केली. प्रत्येकजण एकमेकाकडे बघत हा एवढा पांढरपेशा माणूस शंभूची चौकशी कशाला करतोय ? कोणीतरी विचारलंदेखील की, मी साध्यावेशातला पोलीस आहे की काय ? त्यांचा तो गैरसमज दूर होण्यासाठी मी माझी खरी ओळख सांगितली. तेव्हा त्यातील एक मध्यमवयाचा माणूस उठला आणि मला बरोबर घेऊन निघाला आणि एका झोपडीसमोर उभा राहून केश्या ये केश्या, शंभूला भेटाया कोण आलय रं, त्याबरोबर त्या झोपडीतून कोणी एक पन्नाशीतला एक गृहस्थ कमरेला टॉवेल लावत बाहेर आला आणि माझ्याकडे बघत कोण हायसा? त्यावर मी शंभू ज्या शाळेत जातो त्याशाळेत मी शिक्षक आहे असे सांगितले. त्यावर ते गृहस्थ म्हणाले बोला, शंभूकडे काय काम हाय? तेव्हा मी शंभू बरेच दिवस शाळेत येत नसल्याचे सांगितले. त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले तुमी गुर्जी का त्याचं ?

हो मी त्याचा वर्गशिक्षक आहे. माझा वर्गशिक्षक हा उच्चरलेला शब्द बहुतेक त्यांना कळला नसावा. मला त्यांच्या त्या देहबोलीवरून तेवढं कळलं. मी तेवढं सावरण्यासाठी हो, मी गुर्जीच त्याचा. अहो तो शाळेत येत नाही म्हणून मी बघायला आलो त्याला. काय आजारीबिजारी आहे का ?

नाय गुर्जी, मी त्याचा बा. त्यो खाली वीटभट्टीवर कामाला जात्यो, तिकडून यायला उशीर व्हतो. आला की, झोपून जातो. दमायला होतं त्याला. शंभूच्या वडिलांनी मला जी महिती दिली त्यावरून मला एक गोष्ट कळली. ती म्हणजे त्याचे वडील दम्याने आजारी असतात. इतकी वर्षे ते स्वतः वीटभट्टीवर कामाला जात होते. ते आजरी पडले म्हणून आता शंभू वीटभट्टीवर कामाला जात होता. हल्ली घरातला व्यवहार तोच बघतो. मग त्याची आई कुठे आहे ?

ती गेली कंत्राटदाराचा हात पकडून. शंभूच्या वडिलांच्या या उत्तराने मी पुढे काय बोलणार. शंभूचे वडील उठले गुर्जी, थांबा च्या करतू , मी चहा नको म्हणत होतो तरी शंभूच्या वडिलांनी चहा केला. तेवढ्यात दारातून एक तरूण मुलगा आत आला. त्याने आबा ये आबा …शंभूचे वडील बाहेर आले आणि आर शंभू तू आलास. हे बघ तुझे गुर्जी आलं…..हा शंभू होय ! मी त्याच्याकडे बघतच राहिलो. त्याच्या देहपिंडावरून तो किमान अठरा वर्षांचा वाटत होता. मी त्याला उद्यापासून उशीर झाला तरी शाळेत येत जा, असं सांगून मुख्याध्यापकांनी दिलेल्या चिठ्ठीवर त्याच्या वडिलांची सही घेऊन शाळेत यायला निघालो. या एवढ्या झगमगाटी उपनगरात अशी एक वस्ती आहे, तिचा मला शोध लागला.

आता शंभू कधीमधी शाळेत येत होता. मला त्याच्याविषयी विशेष ममत्व वाटत होतं. मी आणि इतर शिक्षक काय शिकवत होतो ते त्याच्या डोक्यात जात नव्हतं. पण हल्ली तो शाळेत येतोय हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. दिवस असे भराभर जात होते. एक दिवस शंभू आला तो झोकांडतच. तो वर्गात आला आणि बाकावर बसला आणि डोकं खाली ठेवून झोपी गेला. मला वाटलं आज काम करून तो दमला असेल. त्याला झोपू द्यावं. तो ढाराढूर झोपला, थोडावेळ शिकवून मी त्याच्या बाकाजवळ गेलो तेव्हा मला कसला तरी दर्प आला. मी शंभूच्या जवळ गेलो तेव्हा मी अंदाज बांधला, शंभूने नक्कीच मद्यपान केलं आहे. पण आता जर त्याला उठवलं तर उगाच तमाशा होईल. माझा वर्ग संपून दुसरे शिक्षक वर्गावर आले, त्यांना मी शंभूबद्दल सांगितलं.

रात्रीचे वर्ग संपले, शंभू अजूनही झोपला होता. आता शेवटी मी त्याला उठवलं, कसाबसा शंभू उठला. त्याला डोळ्यावर पाणी मारून यायला सांगितले. तसा शंभू उठला आणि बाथरूममध्ये गेला. शाळेतले सर्व दिवे मालवून विद्यार्थी निघाले, त्या शाळेला कोणी शिपाई नव्हता. वर्ग उघडायला काही विद्यार्थी लवकर येत, काही विद्यार्थी शाळा बंद करून मुख्याध्यापकांकडे किल्ली देऊन निघून जात. मी शाळेच्या गेटपाशी शंभूसाठी थांबलो. तेवढ्यात शंभू आला. मी त्याला म्हणालो, चल मी तुला घरी सोडतो, तर तो म्हणाला, नको सर मी जातो. मी म्हणालो, अशा अवस्थेत घरी जाऊ नकोस, चल माझ्याबरोबर. तो म्हणाला, घरच्यांना सवय आहे याची. सर, वीटभट्टीवर काम करून आंग मोडून येतं. रात्री झोप लागत नाय. मग कधीतरी पियावी लागते.

अरे, या वयात ही व्यसनं बरी नाहीत. हे बघ वीटभट्टीवरचं काम सोडून दे. दुसरी नोकरी बघ.

आमाला कोण नोकरी देणार. आमच्या वस्तीचं नाव बघितलं की, लोक कामावर ठेवायला बघत नाहीत. आमची वस्ती बदनाम आहे.

अरे तू शोध तरी … नक्की नोकरी मिळेल.

सर, आमच्या वस्तीतली मुलं जिथं कुठं नोकरीला जातात तिथं त्यांना हमालीचीच काम देतात. मग पोरांची आंग मोडून येतात. आता रात्री झोप नाय लागली तर सकाळी काम कसं करणार, मग आमी सगळेच घेतो थोडीथोडी…..
शंभूची ही कहाणी एकेपर्यंत शंभूची वस्ती आली. शंभू मला रस्त्यावर सोडून वस्तीकडे जायला निघाला. वस्तीतल्या त्या अंधारात तो गुडुप झाला.

त्यानंतर शाळेत शंभू कधी मद्यपान करून आला नाही. पण शाळेतल्या अभ्यासात काही तो प्रगती दाखवत नव्हता. जेमतेम पासापुरते गुण मिळवत होता. तेही नसे थोडके असं म्हणून मीशांत होतो.

एक दिवस नेहमीप्रमाणे रात्रीचे वर्ग चालू होते. दोन तास झाले आणि शंभू शिक्षकांच्या खोलीत मला शोधत आला. मी काहीतरी टिपणं काढत होतो. सर, मी घरी जाऊ का ?
कशाला ? काय झालं ? बरं नाही का तुला ?
नाही सर, थोडं काम आहे.

काय काम आहे? तसा शंभू गप्प बसला. मी त्याला पुन्हा विचारलं नक्की काय काम आहे. मला वेगळाच संशय आला. हा मुलगा नक्कीच मद्यपान करायला जात असावा. मी त्याला खरं कारण द्यायला सांगितलं, तसं त्याने सांगितलं की, आज पगार झाला आहे, घरातलं धान्य दोन दिवसापूर्वी संपलं. दोन दिवस त्याच्या वडिलांनी आणि त्याने चुरमुरे खाऊन दिवस काढले. आता लवकर गेला तर दुकानं उघडी असतील. दुकानातून धान्य घेऊन गेला तर आज बाबा आणि तो व्यवस्थित जेवतील. मला रहावलं नाही. मी मुख्याध्यापकांना सांगून त्याला घरी पाठवलं. तो घरी जायला निघाला तसा मी शाळेच्या गॅलरीत येऊन उभा राहिलो. शंभू गेटच्या बाहेर पडला आणि त्या झगमगत्या दुनियेत दिसेनासा झाला.

आता शंभू माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागला होता. नियमितपणे शाळेत येत होता. शाळेत येऊन कधी झोपून जायचा, त्याच्या नशिबाने त्याची वीटभट्टीवरची नोकरी सुटत नव्हती. दरम्यान त्या रात्रशाळेत मिळणार्‍या पाचशे रुपयात काय होणार ? याचा विचार करून मी अन्य ठिकाणी हातपाय मारत होतो. शेवटी बी. एडला नंबर लागला. एक दिवस त्या रात्रशाळेला रामराम करून मी बी. एड. केलं आणि एम. एस्सी करून कॉलेजला लागलो. त्या रात्रशाळेचा आणि शंभूचा विसर पडला.
मध्ये त्या शंभूच्या वस्तीकडे जायचा योग आला, तेव्हा त्या वस्तीवर कुठल्यातरी बिल्डरने मोठ्ठा कॉम्प्लेक्स उभारला आहे.

आता शंभू आणि त्याचे बाबा कुठे गेले असतील ? त्यांनीदेखील अशीच कुठली तरी वस्ती शोधून झोपडी बांधली असेल का? या प्रश्नाचं उतर मला दोन वर्षापूर्वी मिळालं. त्यादिवशी भारत बंद होता. सकाळी कॉलेजला गेलो. ठाणा-मुंबईतली शाळा महाविद्यालये लवकर सोडली. मीदेखील घरी यायला निघालो. शाळेतल्या एका सहकार्‍याबरोबर विटाव्यापर्यंत आलो. पुढे घरी जाण्यासाठी वाहन शोधू लागलो. वाटेत कोण गाडीवाला दिसला तर हात दाखवत होतो पण व्यर्थ ! जो तो पळत होता, तेव्हा एका बाईकवाल्याने गाडी थांबवली. मी त्याच्यामागे बसलो आणि दहा मिनिटात घरी आलो, मी त्या बाईकवाल्याचे आभार मानायला थँक्यू म्हणणार इतक्यात काय सर, ओळखलं का ? मी ओळख लावायचा प्रयत्न करत होतो. पण ओळख पटत नव्हती.

सर, मी शंभू. नाईटशाळेतला
अरे शंभू तू ? किती वर्षांनी भेटतोस ?
हो सर, आता आमची वस्ती तोडली.
हो माहीत आहे मला. मी एकदा गेलेलो तिकडे….
सर, तुम्ही शाळा सोडली आणि देवकर सर आले त्यांनी दहावीनंतर आय. टी. आय करायला सांगितलं. आय. टी. आय. केला आणि मग इथे मुकुंदमध्ये चिकटलो..
चल बरं झालं. मार्गाला लागलास, चल घरी चल. मी इथेच राहतो.
नको सर आता मी भांडुपला राहतो. चार वर्षे झाली. आबा गेले. मी बायको आणि मुलगा आहोत, नवीन खोली घेतली आहे…चला सर येतो मी. दंगल व्हायच्या आत निघतो… आता तुमचं घर माहिती झालं. येईन कधीतरी…
मी त्याला निरोप दिला. एक विद्यार्थी मार्गी लागल्याचं समाधान उपभोगताना त्याचा फोन नंबर घ्यायचा राहिला. आता शंभू कधी घरी येईल याची वाट पहायची. तो नक्की येईल … मला असं वाटत? शंभूदेखील माझ्यासारखा जीवन जगण्याच्या गर्दीत हरवला तर नसेल ?

-प्रा. वैभव साटम.

First Published on: July 14, 2019 4:26 AM
Exit mobile version