शांता

शांता

शांता आमच्या घरात गेली अनेक वर्षे काम करत होती. अतिशय प्रामाणिक आणि मुख्य म्हणजे त्यांना कधी कुठली गोष्ट सांगावी लागली नाही. आपले घर समजून त्यांनी घरकाम केले. जेवणापासून ते साफसफाईपर्यंत सर्व काही त्या निगुतीने करत. सकाळी सहा वाजता त्या आमच्या घरी येत आणि तीन एक तासात सर्व कामे आटपून, आणखी काही घरकामे तसेच आपल्या घरचे काम करण्यासाठी निघत. दिवसभर काम करून ती कधी थकल्यासारखी दिसत नसे. सतत उत्साही. घरून काम करून निघताना माझ्या बायकोला सांगणार, ‘ताई काय असेल तर सांगा. तुम्ही निर्धास्त कामाला जा. हवे तर संध्याकाळी येऊन आणखी काय काम असेल तर करून जाईन. तुमची सुट्टी असली की बाकी तुम्ही सांगाल ती बाकीची छोटी मोठी कामे करेन. तुम्ही ऑफिस सांभाळा, मी तुमचे घर सांभाळते’. बायकोला शांताबाईमुळे कायम हत्तीचे बळ यायचे. एखाद्या पुरुषासारखे शांताबाईंत बळ होते. ते परिस्थितीने आलेले होते…

तळकोकणात कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील शांताला मी पहिल्यांदा बघितले तेव्हा ती मला पी.टी उषासारखी वाटली. ती मोठी धावपटू झाली असती, असे तिला बघताक्षणी वाटले. पुरुषी चेहरा आणि तशीच देहयष्टी. माझ्या बहिणीच्या गावची ती. बहिणीने तिला बरे जगता यावे म्हणून मुंबईत यायला सांगितले. नियतीचा खेळ बघा आयुष्यभर शांताला धावावे लागले. माहेरी आणि सासरीही. ती माहेरकडून चंदगडची. कोकण आणि घाटमाथ्याच्या मधोमधच्या भागातली. घरची गरीबी आणि पाच एक मुली म्हणून वडिलांनी जो नवरा मुलगा हुंडा घेत नाही, अशा घरात आपल्या मुली दिल्या. मग नवरा मुलगा काय करतो, कसा आहे, याची फारशी चौकशी केली नाही. ‘पोटाक पोर आणि जिवाक घोर’ अशा मानसिकतेमधून शांता कोकणात दिली गेली.

घरची थोडीशी भातशेती आणि बाकीच्या दिवसांत मोलमजुरी. लग्न करून आल्यावर नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर तिला आपला नवरा सकाळ संध्याकाळ दारू पिणारा असल्याचे लक्षात आले. पण, माहेरचा रस्ता तिला बंद झाला होता. कष्ट हेच आपल्या पाचवीला पुजलेत, अशी मनाशी खूणगाठ बांधून तिने मग जीवनाशी दोन हात करायला सुरुवात केली. लग्न झाल्यानंतर दोन मुले पदरात टाकून शांताबाईचा नवरा आता आपली बायको पुढाकार घेऊन काम करते असे दिसल्यावर कामच करेनासा झाला. त्याला तिने समजावून पाहिले. पण, सारखा त्याचा मार खाऊन घेण्यापेक्षा कष्ट हेच आता आपले आयुष्य आहे, अशी मनाची समजूत करून ती जीवनाशी टक्कर देत राहिली.

काळी सावळी शांता कष्टाने शरीर आणि मनाने खणखर झाली आणि गावात पुरुषाला जमणार नाही, अशी अंगमेहनतीची सर्व कामे करू लागली. नवरा दारू पिऊन घरात पडला असताना ती रडत बसली नाही. तिने दोन्ही मुलांना हाताला घेऊन हाती नांगर धरला. वर्षभर पुरणारी शेती, उन्हाळ्यात भाजीपाला आणि बाकी दिवशी मजुरी करून शांताने मुलांना जगवले. दारूबाज नवरा फार काळ जगला नाही. मुलांनी खूप शिकावे असे तिला वाटत होते, पण ती काही फार शिकली नाहीत. मोठा मुलगा बारावी होऊन पोट भरायला मुंबईत आला. छोटा मुलगा बापाच्या वळणावर जातो की काय अशी भीती वाटून शांताने त्याला घेऊन मुंबईचा रस्ता धरला. आधी विरारला राहणारी शांता माझ्या बहिणीमुळे बोरिवलीत चाळीत भाड्याचे घर घेऊन राहू लागली आणि पहिले घरकाम तिने आमच्याकडे केले. तिच्या कामाचा वेग शंभर मीटर धावणार्‍या स्प्रिंटरसारखा होता… सुसाट! आमचे चार रूमचे घर इतरांना साफ करायला चार दिवस लागले असते, पण ती एका दिवसात ते काम हातावेगळे करायची आणि ते पण झकपक. कुठेच नाव ठेवायला जागा नाही.

आमचे घरकाम झाल्यानंतर ती इतर खूप काम करायची. अशी कामे करत असताना तिला एका कपड्याचा व्यापार करणार्‍या महिला उद्योजिकेने हेरले आणि पूर्ण वेळ काम, चांगला पगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र तिने आमच्या घरचे काम न सोडता ते काम करायला सुरुवात केली. शांताच्या नशिबी चांगले दिवस आले होते. तिच्या मोकळ्या कानात, हातात आता सोन्याच्या कुड्या, दोन बांगड्या आल्या होत्या. मोठा मुलगा बरा कमावता झाला तर होता आणि छोटाही छोटी मोठी कामे करू लागला होता. पुढे मागे चाळीत स्वतःची खोली घेण्याची तिची स्वप्ने रंगात येत असताना कोरोना आला… आणि शांताच्या धावणार्‍या गाडीला अचानक ब्रेक लागला… तिची कामे बंद झाली. मुलेही घरी बसली. याचदरम्यान तिच्या मोठ्या मुलाने प्रेमविवाह करत घरात आणखी एक माणूस वाढवले. एका छोट्या भाड्याच्या खोलीत चार माणसांचे आता कसे होणार आणि कोरोना कधी जाणार? या भीतीने तिचा वेग मंदावला.

लॉकडाऊन उठून नियम शिथिल झाल्यावर शांताला पुन्हा कामावर घेण्यासाठी आम्ही तिला चारवेळा सांगितले. पण, स्वतःचे घर नसताना अचानक मुलाने लग्न करण्याचा निर्णय तिला पसंत नव्हता. आपल्या नशिबी जे आले ते मुलाच्या बाबतीत होऊ नये. त्याचे तरी विंचवाचे बिर्‍हाड होऊ नये, असे शांताला वाटत होते. पण नवरा जिवंत असताना तिला न मिळालेले सुख ती मुलांमध्ये शोधत होती. आपण कष्ट करुन ती त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या पायावर उभी करत होती. धाकटा धड नसताना मोठ्याने आणखी थोडी वर्षे आपल्याला साथ द्यायला हवी होती, असे तिला वाटत होते. पण तिच्या वेगात अडथळे आले आणि एका निराशेच्या क्षणी कोणाचं न ऐकता तिने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. ती कशीबशी गावाला पोहचली खरी, पण कोरोनाच्या या काळात जिथे माणुसकीने हात टेकले तेथे शांताचा जीवनाशी सुरू असलेल्या झगड्याचे कोणाला काही अप्रूप उरले नव्हते. शांता अचानक गावाला कशी आली? याची विचारपूस न करता आजूबाजूच्या लोकांनी तिला बघून घरांचे दरवाजे बंद करून घेतले. शांता आता जगण्याच्या शर्यतीत पुन्हा उतरेल का? हा प्रश्न मला सतावतो तेव्हा का कोण जाणे मला वाटते : शांता निराशेचा तो क्षण फेकून देईल आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा एकदा उंच भरारी घेईल!

First Published on: July 12, 2020 5:59 AM
Exit mobile version