शरद पवारांना आत्मचिंतनाची गरज !

शरद पवारांना आत्मचिंतनाची गरज !

शरद पवार

गेल्या पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला असंख्य राजकीय संकटांना सामोरे जावे लागले तरी मुत्सद्देगिरीच्या जोरावर हे सरकार तरले. नुसते तरले नाही तर राजकीयदृष्ठ्या बळकटी प्राप्त करीत फडणवीस यांनी पक्षाला राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहचवले. शिवाय, गेल्या दशकानुदशकांपासून राज्याच्या सत्ताकारणाचा अविभाज्य घटक बनलेल्या काँग्रेस तसेच दोन दशकांपासून प्रभावी ठरत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लावण्यात यश मिळवले. गेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकांत भागीदारीत लढलेल्या या दोन्ही काँग्रेसना जागांची दुहेरी संख्या गाठणेही शक्य झाले नाही. केंद्रात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारांनी केलेल्या कामांवर खूश होत जनतेने त्यांना तूर्तास तरी अढळस्थानी नेऊन ठेवल्याचे म्हणता येईल. भाजपच्या उधळत्या वारूमुळे अस्वस्थ झालेली दोन्ही काँग्रेसमधील मंडळी कमळाभोवती रूंजी घालू लागली आहेत. त्यामध्ये बड्या राजकीय घराण्यांसोबतच पक्षाचे आमदार, नेते व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बरं, यापैकी अनेक जण शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडत असल्याचे स्पष्ट होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून गणले जाणार्‍या गिरीश महाजन यांच्या मते राज्यातील आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी ह्या केवळ हिमनगाचे टोक असून भविष्यात अजून बरेच काही घडणार आहे. अर्थात, सत्तेपुढे शहाणपण नसते हेच खरे. दोन्ही काँग्रेसला फारसे भविष्य उरले नसल्याचा तत्काळ निष्कर्ष काढणे परिपक्वतेचे लक्षण नसले तरी या पक्षांतील नेत्यांनीच तशी मानसिकता बनवून पक्षांतराचा मार्ग स्वीकारल्याची वस्तुस्थिती आहे.

साधारण दोन दशकांपूर्वी सोनिया गांधी यांचा ‘विदेशी’चा मुद्दा पुढे करीत शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. पवारांसारख्या जाणत्या नेत्याने राष्ट्रवाद व स्वाभिमानाच्या मुद्यावर केलेले ते दुसरे राजकीय बंड असले तरी त्याला क्रांतीचा मुलामा मिळाल्याने नव्या पक्षाने अल्पावधीत चांगले बाळसे धरले. आर.आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, गणेश नाईक, अरूण गुजराथी, सुनील तटकरे आदी जनाधार असलेली मंडळी पवारांच्या शब्दाखातर काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करून मोकळी झाली. पवारांच्या प्रगल्भ नेतृत्वाचा परिणाम म्हणून या पक्षाने काँग्रेससोबत आघाडीत येऊन राज्याच्या सत्तेत भागीदारी नोंदवलीच. शिवाय, राज्यभरातील अनेक सत्तास्थाने काबीज केली. राष्ट्रीय राजकारणात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने या पक्षाचे स्थान महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले. काँग्रेससोबत तात्विक मतभेद असले तरी पवारांच्या पक्षाने जुळवून घेण्याची भूमिका घेतली. त्यामागील कारण म्हणजे पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, याची पवार आणि कंपनीला पुरेपूर जाणीव होती. अर्थात, पवारांसारखा प्रगल्भ आणि चतु:रस्त्र नेता लाभूनही राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ खुंटली. पक्षाने पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पाळेमुळे घट्ट केली असली तरी मुंबई, कोकण, विदर्भ ही राजकीयदृष्ठ्या प्रबळ क्षेत्रे पक्षाला कधीही काबीज करता आली नाहीत. पक्षावर मराठा छबी आणि केवळ पश्चिम महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे आरोप झाले. छगन भुजबळ, अरूण गुजराथी यांच्यासारख्या अ-मराठा चेहर्‍यांना प्रदेशाध्यक्ष पदासह महत्त्वाची मंत्रीपदे बहाल करूनही अवघी निर्णय प्रक्रिया अजितदादा आणि कंपूकडे असल्याने पक्षातील अस्वस्थता लपून राहिली नाही. हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या अवनतीचे मूळ ठरले.

२०१४ मधील लोकसभा आणि तद्नंतर लगेचच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने अवघी राजकीय गणिते बदलली. तेव्हाच्या लोकसभेत दोन्ही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. विधानसभेत दोन्ही काँग्रेससह भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले. तरीही शेटजी-भटजींचा म्हणून हिणवल्या गेलेल्या भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला. शेवटी हिंदुत्वाचा मुद्दा आणि नैसर्गिक मित्र या टेकूंवर शिवसेना भाजपच्या सोबत आली आणि फडणवीस सरकार सत्तेवर आले. हे सरकार फार काळ टिकू द्यायचे नाही, असा सुप्त अजेंडा ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने खेळी खेळल्याचे अनेक दाखले देता येतील. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या नावाचा गजर करून पुरोगामीत्वाची भाषा करणार्‍या पवारांना फडणवीस यांच्या रूपातील पेशवाई जाचली. पन्नास वर्षे स्वत: सक्रिय राजकारणात राहून, तब्बल चारदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवून पवार मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू शकले नाहीत. तथापि, मराठा आरक्षण मुद्याला फुंकर घालत राज्यातील राजकारण तापवले गेले. राज्यभरात अठ्ठावन्न मोर्चे काढण्यात येऊन फडणवीस सरकारविरोधात रान पेटवण्याचे प्रयत्न झाले. यामागील बोलावता धनी कोण याचीही तत्कालीन परिस्थितीत चर्चा झाली. आधी मराठा, पाठोपाठ धनगर, मग मुस्लीम आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले. बरं, या आरक्षण मागणी चळवळीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी फार सक्रियता दाखवू नये, अशाही सूचना लघुसंदेशाव्दारे पाठवण्यास या पक्षातील नेतेमंडळी कचरली नाही. थोडक्यात काय तर शरद पवार यांनी वेळोवेळी केलेले सोयीचे राजकारण त्यांच्या अंगलट आले. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, रमेश कदम यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पाठीशी घालण्यातही पवारांना कमीपण जाणवले नाही. या सर्वांना ‘क्लीन चिट’ नामक दाखला देत पवारांनी भलामण केलेली तमाम महाराष्ट्रीयांनी अनुभवली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अपेक्षित गैरकृत्यांना पायबंद घालण्याची कठोर भूमिका घेणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य करण्यासही पवारांनी जीभ आखडती घेतली नाही.

शरद पवार यांच्या सातत्यपूर्ण बदलत्या भूमिकांमुळे त्यांचा पक्ष राज्यातील जनतेच्या मनातून उतरला. तुलनेत रचनात्मक भूमिकेतून राजकारण करणार्‍या भाजपचा प्रभाव राज्यभर वाढला. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात जनतेत मानाचे स्थान मिळवण्यात भाजप यशस्वी झाला. मुंबई-कोकणात भक्कम तटबंदी असलेल्या शिवसेनेचा भाजपमुळे फार प्रभाव कमी झाला नाही. तथापि, भाजपच्या वाढण्याचा फटका काँग्रेस आघाडीला, विशेषत: राष्ट्रवादीला बसला. पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील अवघे बुरूज ढासळले. अलीकडील लोकसभा निवडणुकीत तर पक्षाची जेवढी क्षती झाली, त्याहून पवारांच्या वैयक्तिक प्रतिमेला तडे गेले. ज्या माढा मतदारसंघातून त्यांनी लढण्याची घोषणा केली होती, तेथील असंतोष लक्षात घेऊन पवारांना निवडणुकीपूर्वीच माघार घ्यावी लागली. मावळमध्ये अजित पवारांचे पुत्र यांना मोठा विरोध असूनही उभे करण्यात आले आणि अपेक्षेनुरूप पवारांच्या घरात पहिल्यांदा पराजयाने प्रवेश केला. याशिवाय, अशा अनेक कारणांमुळे पक्षात असंतोष राहिला आणि त्याचे प्रत्यंतर आज येत आहे. मोहिते-पाटील, क्षीरसागर, पिचड अशी निष्ठावंतांची फळी पवारांना ‘बाय’ देऊन गेली. भविष्यातही अनेक धक्कादायक घडामोडी घडून या पक्षाच्या गडाचे बुरूज ढासळतील. पवार या घडामोडींना सत्ताधार्‍यांना दोष देऊन मोकळे होत असले तरी त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. पक्ष सोडून जाणारे सगळेच सत्ताधार्‍यांच्या दबंगगिरीपुढे झुकून जाण्याचे कारण नाही. त्यांना त्यांचे राजकीय भवितव्य अंध:कारमय दिसत असल्यानेच ते तसा निर्णय घेत आहेत. म्हणतात ना, जहाज डुबू लागले की त्यावरील उंदीरही इतरत्र पळतात. राष्ट्रवादी काँग्रेसची तशीच अवस्था झालीय. बघूयात, पवार आणि कंपनी त्यावर काय उपाय शोधतात ते.

First Published on: July 29, 2019 5:30 AM
Exit mobile version