पर्यावरणाशी माणसाचं अबोल नातं

पर्यावरणाशी माणसाचं अबोल नातं

माणूस म्हटला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे नाती. आयुष्यात खूप नाती जपतो माणूस, पण कधी निसर्गासोबत, पर्यावरणासोबत असणार्‍या अबोल नात्याचा विचार केला का आपण? या अबोल नात्याला कधी वाचा फुटावी असं वाटलंय का आपल्याला कधी? नसेल केला तर आजपासून करू. पर्यावरण किंवा निसर्ग हे एक असं नातं आहे जे मनाला कधी शांती देतं तर कधी क्षणभंगुरताही देतं. आत्ताच्या महामारीचंच उदाहरण घ्या. म्हणतात ना प्रत्येक दुःखात एक तरी सुखाचा क्षण असतोच. बहुदा हे त्याचंच उदाहरण असावं. जग भंडावून सोडलंय या कोरोनानं पण त्याच काळात हा निसर्ग, हे पर्यावरण किती खुलून आलंय…चिमण्या पाखरांची ती किलबिल शांतता देऊन जाते. शुद्ध हवेची ती आल्हाददायक झुळूक सुखदायक वाटते. जागोजागी पसरलेला हिरवा गालिचा तर जणू दृष्टीच मोहून घेतोय.

कोरोनाने किमान एक तरी सुख पदरात टाकलं म्हणायचं. निसर्गावर केलेलं प्रेम, माया कधीच वाया जात नाही. आज आपण तणावात असलो की, प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ बघतो. का तर मन पुन्हा नव्याने उभं रहावं म्हणून. पण कधी तणावात असताना निसर्गाशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय का आपण. फक्त १० मिनिटे जरी ह्या वृक्षांच्या हालचाली, पाखरांची किलबिल, वार्‍याची हुलकावणी देऊन जाणारी झुळूक न्याहाळली, तर मन कसं नव्याने उभारी घेते. कधी कधी तर आपण नकळत त्यातलाच एक भागही बनून जातो. या नात्याला आपण किमान १० मिनिटे तरी देऊच शकतो. पण प्रत्येक नात्याला जशी मायेची गरज असते, तशी ह्याही नात्याला आहे. या नात्याला गरज आहे ती पर्यावरण संवर्धनाच्या मायेची. वृक्ष लागवड, त्यांचं जतन हे आणि असे अनेक मार्ग आहेत हे नातं आणखी दृढ करण्याची, जेणेकरून ह्या अबोल नात्याला वाचा फुटेल. हे नातं जर आधीच जपलं असतं तर कदाचित आज ऑक्सिजन साठी पैसे मोजावेही लागले नसते.

त्यामुळे पर्यावरण हीच खरी जान आहे आणि म्हणूनच,जान है तो जहान है, और, इस जान को तू जान जाए, तोही तू महान है…

                                                                                               – शुभदर्शना पाटील, विद्यार्थीनी

First Published on: June 10, 2021 6:06 PM
Exit mobile version