आयुष्याची भेट !

आयुष्याची भेट !

मी ज्ञानराज पाटकर. एक भारदस्त नाव असलेली व्यक्ती! पण हाक मारायला आणि लिहायला कठीण नाव म्हणून ‘राजन’ या नावाने ओळखली जाणारी. अभ्यासात हुशार वर्गात मोडणारी. व्यवसायाने इंजिनियर. कुटुंबात आणि मित्रांत रमणारी. खेळाची आवड जोपसतानाच, नाटक आणि मालिकांत अभिनय करणारी. आपल्या दमदार आवाजाचा उपयोग डबिंग आणि रेकॉर्डींग यासाठी करणारी! सदा हसतमुख असणारे व्यक्तिमत्व !

सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे असं वाटत असताना, वडिलोपार्जित पॉलिसिस्टीक किडनी या विकाराची शिकार होते.वडील, दोन काका, लहान चुलत भाऊ यांचा या विकाराने आधीच बळी घेतलेला. परिणामांची दाहकता माहीत असल्याने, स्वत:बरोबरच कुटुंबाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होतात.पॉलिसिस्टीक किडनी याला रोग म्हणावे की अनुवांशिक शारीरिक व्यंग? कोणतीही चाहुल न लागू देता अचानक झडप घालणारा राक्षस ! आहारावर नियंत्रण ठेऊन काही दिवस त्याला दाबून ठेवला तरी कधीना कधी डोकं वर काढणारच. मग डोके दुखणे, डोळ्याखाली सुज येणे, दम लागणे, त्वचेवर काळे डाग व पुरळ येणे, मरगळ वाटणे ही लक्षण दिसू लागतात. किडणीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. शरीरात पाणी जमा होण्यास सुरुवात होते. यावर एकमेव मार्ग म्हणजे डायलिसिस! डायलिसिसचे दुष्टचक्र सुरू होते. आठवड्यातून तीन दिवस चार-चार तास.डायलिसिस जीवनाचं अविभाज्य अंग बनुन जातं. त्यामुळे व्यवसायावर कामधंद्यावर परीणाम होऊ लागतो. मिळकत कमी आणि औषध-उपचारावरचा खर्च जास्त असं व्यस्त प्रमाण सुरु होते.

त्यातच, डायलिसिसचे दुष्परिणामही दिसू लगतात. उजव्या किडनीला इंफेक्शन होते. ती किडणी काढुन टाकण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया पार पडते. बेंबीपासून पाठीच्या कण्यापर्यंत पोट फाडले जाते. मुठीच्या आकाराची किडणी, वाडग्याच्या आकाराची झालेली असते. एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही डायलिसिसपासून सुटका नसते. जोपर्यंत डायलिसिस करणार, तोपर्यंत शरीर चालणार, डायलिसिस थांबवलं की….. त्याला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास, कुटुंबाची धावपळ, आर्थिक ओढाताण हे सर्व राजनची त्याच्यापेक्षा चार वर्षाने लहान असलेली पुण्याला रहाणारी बहीण गौरी पोरे सहा महिने बघत असते. आपल्या भावासाठी काय करता येईल याचा विचार सुरू होतो. नवरा, मुलगा, सासूबाईंशी विचारविनिमय होतो. त्या सगळ्यांकडून तिच्या निर्णयाला संमतीच नव्हे तर प्रोत्साहनही मिळते.1 जानेवारी 2009 नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजनला फोन येत असतात. फोन वाजतो. गौरीचा फोन. ‘तुला नवीन वर्षाची भेट देणार आहे. मी तुला किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांशी बोल आणि काय करायचे ते सांग.’ हल्ली नातेसंबंधाची विण सुटत चालली आहे असं म्हटलं जातं. पण राजनची लहान बहीण वयाच्या 46व्या वर्षी भावाच्या प्रेमापोटी निरपेक्ष भावनेने, स्वत:ची एक किडनी त्याला देणार असते. जीवंतपणी स्वत:चा एक अवयव काढून देण्यासाठी खूप धैर्य लागतं, मोठं काळीज लागतं! गौरी ते करुन दाखवणार होती. खूप टेस्ट होतात. कायदेशीर बाबींची पूर्तताही होते. 9 मे २००९ रोजी, प्रत्यारोपण क्षस्त्रक्रिया पार पडते. गौरी राजनला किडनी दान करते. राजनला जीवदान आणि त्याच्या कुटुंबाला नवसंजीवनी देते.

आज राजन ६१ वर्षांचा आहे. पुन्हा स्वत:च्या पायावर उभा आहे. मुलीचे लग्न झाले आहे. मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो मोठ्या हुद्यावर नोकरी करत आहे. किडनी विकारांचे निदान होण्याआधी राजन जे काही करत होता, ते सर्वकाही तो आजही करु शकतो आणि करतोही. त्याला ही जाणीव नक्कीच आहे, की त्याच्या प्रत्येक श्वासावर आज त्याच्या बहिणीचा अधिकार आहे.ज्या समाजाने राजनला कठिण काळात मदत केली, जीवनात पुन्हा उभे केले, त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजनने ‘नर्मदा किडनी फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेच्या बरोबर समाजकार्य करण्यास सुरुवात केली आहे. स्किट, लहुपट, नृत्यनाट्य या मनोरंजनाच्या माध्यमांद्वारे अवयवदानाचे महत्त्व आणि त्याची गरज याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात माणसाने केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. नवनवीन उपचार पध्दती, औषधे या विषयांतील संशोधन अजूनही सुरुच आहे. निकामी झालेल्या अवयवांचे आणि पेशींचे प्रत्यारोपण करण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. हे सर्व खरं असलं तरी, आजही आपल्याला स्वत:चे रक्त आणि कृत्रिम अवयव बनवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे, ज्यावेळी अवयवांचे किंवा पेशींचे प्रत्यारोपण करण्याची वेळ येते, तेव्हा ते अवयव आणि पेशी या माणसाच्याच असाव्या लागतात. यामुळेच गरजवंत रुग्णांना योग्यवेळी आवश्यक अवयव उपलब्ध व्हावेत यासाठी अवयवदान करणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्या देशात जनजागृतीचा अभाव, अपुरी माहिती, गैरसमज, भीती यामुळे मृत्यूनंतर अवयव दान करणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मरणोत्तर अवयवदान केल्यास आठ व्यक्तींचे प्राण वाचू शकतात किंवा जीवनमान बदलू शकते. भारतात दरवर्षी अंदाजे ५ ,००,००० लोक योग्यवेळी अवयव उपलब्ध न झाल्याने मृत्यूमूखी पडतात. ही स्थिती बदलण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. अवयवदानाचे महत्त्व सामान्य लोकांना कळावे आणि अधिकाधिक लोक मरणोत्तर अवयवदान करण्यास प्रवृत्त व्हावेत, यासाठी दर वर्षी १३ ऑगस्ट रोजी ‘अवयव-दाता दिन’ साजरा केला जातो. विविध उपक्रमांद्वारे अवयवदानाचे महत्त्व जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. अवयवदान हेच महादान आहे. मृत्यूनंतर अवयव जाळून किंवा पुरून टाकण्याऐवजी ते अवयव दान करा. त्यामुळे काही जणांना नवजीवन मिळू शकेल. तसेच, त्या अवयवांच्या माध्यमातून आपण मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो. अवयवदान करुया. कोणाला तरी आयुष्याची भेट किंवा नवे आयुष्यच भेट म्हणून देऊया!


 

-ज्ञानराज पाटकर

First Published on: September 5, 2018 3:00 AM
Exit mobile version