समाजसेवक भाऊ दाजी लाड

समाजसेवक भाऊ दाजी लाड

भाऊ दाजी लाड हे महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर १८२२ रोजी आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला आले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊंचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३). भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली.

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणार्‍या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते (१८६३-७३). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रद्धेला फाटा द्यावा, या मताचे ते होते.

वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), अल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इन्स्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. अशा या महान समाजसेवकाचे ३१ मे १८७४ रोजी निधन झाले.

First Published on: September 7, 2021 3:20 AM
Exit mobile version