समाजसेविका नजुबाई गावित

समाजसेविका नजुबाई गावित

नजुबाई गावित या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणार्‍या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९५० रोजी धुळे जिल्ह्यातील आदिवासी व भूमिहीन कष्टकरी कुटुंबात झाला. नजुबाईंना लहानपणापासूनच दारिद्य्राशी सामना करावा लागला.

दहा भावंडे असल्याने जेमतेम चौथीपर्यंतच त्यांना शिक्षण घेता आले. आदिवासी समाजाची भयानक पिळवणूक होत आहे हे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळेच १९७२ मध्ये त्यांनी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. चळवळ चालवायची तर राजकीय पक्षाचे पाठबळ मिळायला हवे, या हेतूने त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाल्या. यातूनच धुळे येथे श्रमिक महिला सभेची स्थापना त्यांनी केली. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात नजूबाई आघाडीवर होत्या. पुढे ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’तून अनेक लढे त्यांनी दिले. वनजमीन हक्काचा लढा उभारण्यात त्या पुढे होत्या. एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मूलन यांसारख्या सामाजिक चळवळींमध्ये नजुबाई होत्या.

आदिवासी महिलांवर कमालीचा अन्याय होत असल्याने त्यांनी याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे हिंदू कोड बिल वा कोणत्याही प्रकारचे कायदे आदिवासींना लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल तेव्हा न्यायालयाने दिला. या निर्णयाने त्या पेटून उठल्या. अनेक स्त्रीमुक्ती संघटनांना सोबत घेऊन त्यांनी आदिवासी महिलांना हिंदू कोड बिल लागू करावे यासाठी संघर्ष केला. सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करतानाच त्यांनी आदिवासींच्या व्यथा मांडणारे लिखाणही केले. त्यांच्या ‘तृष्णा’ या आत्मवृत्तपर कादंबरीने मराठी साहित्यात खळबळ माजवली. अनेक पुरस्कार या कादंबरीला मिळाले. इंग्रजांच्या विरोधात अनेक आदिवासी लढले, पण त्याची दखल घेतली न गेल्याने ‘भिवा भरारी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. ‘नवसा भिलणीचा एल्गार’ ही त्यांची कादंबरीही विलक्षण गाजली. त्यांनी अनेक कथाही लिहिल्या.

 

First Published on: January 10, 2022 5:00 AM
Exit mobile version