गाणं,व्यक्त करतं अव्यक्ताला!

गाणं,व्यक्त करतं अव्यक्ताला!

6 डिसेंबर 1992. या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर मुंबईत दंगली झाल्या. काही ठिकाणी जाळपोळ झाली. आजुबाजूच्या वातावरणात एक शांतता पसरली होती. ती भयाण वाटण्यापेक्षा बीभत्स वाटत होती. या अशाच वेळी बीबीसीच्या प्रतिनिधीने मुंबईतल्या एका वाटसरूला गाठलं. त्याच्याकडून मुंबईतल्या त्या भयप्रद वातावरणाची माहिती घेतली. त्या वाटसरूनेही बीबीसीच्या त्या प्रतिनिधीपुढे आपण पाहिलेलं ते भयाचं वास्तव आपल्या भाषेत मांडलं. जाता जाता त्या प्रतिनिधीने, आज जसे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधले चॅनेलचंपू प्रश्न करतात तसा एक समारोपाचा प्रश्न वाटसरूला केला – मुंबईत घडलेल्या या एकूण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं?

त्या दिवसांतली ती जळणारी मुंबई काळ्यानिळ्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या वाटसरूने त्या प्रश्नाला उत्तर देताना गाण्याची एक ओळच ऐकवली. तो म्हणाला – रश्म-ए-उल्फत को निभाये तो निभाये कैसे; हर तरफ आग है, दामन को बचाये कैसे?

त्या जळजळीत वास्तवावर ती प्रतिक्रिया देताना त्याने रश्म-ए-उल्फत को निभाये तो निभाये कैसे या गाण्याचा घेतलेला आधार हा खूप काही सांगून जाणारा होता. हर तरफ आग है, दामन को बचाये कैसे? हे शब्दच सभोवताली लागलेल्या आगीच्या झळांची आणि त्यात होणार्‍या आपल्या घुसमटीची आणि पर्यायाने, आपल्या पराकोटीच्या अगतिकतेची साक्ष देत होते. त्या गाण्याचा संदर्भच मुळात मुंबईतल्या त्या भीषणतेचं अचूक वर्णन करणारा होता.

सांगायचा मुद्दा काय तर कधी कधी गाणं एखाद्या गोष्टीवर असं नेमकं भाष्य करून जात असतं. जशा म्हणी एखादा मोठा आशय कमी शब्दांत सांगून जातात तसंच या गाण्यांचंही असतं. ते गाणं अशा वेळी गाऊन दाखवायलाच हवं असं काही नाही. गाण्याचे शब्द केवळ गद्यात उच्चारले तरी ज्याला जो संदेश पोहोचवायचा तो पोहोचतो.

बर्‍याच वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट एका अभिनेत्रीबाबतीत घडली होती. एका अभिनेत्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधांची चर्चा जिकडेतिकडे होत होती. ते दोघंही काही दिवसांत लग्नाच्या बोहोल्यावर चढणार हे एक उघड गुपित होतं. दोघांचं ते प्रेम अस्सल आणि समजूूतदार होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नियतीने घडवलेल्या एका घटनेमुळे त्यांची ताटातूट झाली. तिच्या मनाला ती गोष्ट पार खोलवर लागली असावी. त्यावेळी एका मराठी साप्ताहिकात एक सदर चालवलं जायचं. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आवडीनिवडी त्यात सेलिब्रिटींकडून जाणून घेतल्या जायच्या. याच सदरात एकदा त्या प्रेमभंग झालेल्या अभिनेत्रीची आवडनिवड छापून आली आणि त्यात तिने जे आपल्याला सर्वात भावणारं गाणं सांगितलं ते वाचून जाणकार वाचकांच्या मनात गलबलून आलं. कारण त्या अभिनेत्रीने सांगितलेल्या त्या गाण्याचे शब्द होते – दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया हैं, उम्र भर का गम हमे इनाम दिया हैं.

ते पाक्षिक ज्या दिवशी पेपर स्टॉलवर आलं त्या संपूर्ण आठवड्यांत आमच्या काही पत्रकार मंडळींमध्ये या गाण्याची खूप गंभीरपणे चर्चा झालीं. आपल्या प्रेमभंगाची ती तीव्र जखम दाखवून देण्यासाठी तिने निवडलेलं ते गाणं तिच्या दृष्टीने अगदी समर्पक होतं. आपल्याला जवळचं वाटणारं ते गाणं सांगून खरं तर तिने त्या अभिनेत्याला पोहोचवायचा तो जळजळीत संदेश पोहोचवला होता. साहजिकच, तिचा ते गाणं सांगण्यामागचा हेतू पूर्णपणे सफल झाला होता. तात्पर्य काय तर एका अभिनेत्रीने आपलं अव्यक्त दु:ख सांगण्यासाठी एका गाण्यातल्या शब्दांची वाट निवडली होती आणि ती तिच्या मनात ठिबकणार्‍या दु:खासाठी सार्थ ठरली होती.

प्रेमभंगाचा विषय निघाला आहे तर माझ्या कॉलेजातल्या एका मित्राची गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमचे कॉलेजातले ते फुलपंखी दिवस होते. आमचा हा अभ्यासाकडे, स्वत:च्या भविष्याकडे काटेकोरपणे लक्ष देणारा, नाकाच्या शेंड्यासमोर चालणारा मित्र अभ्यासाच्या नोट्सची देवाणघेवाण करत असताना अशाच एका फुलपंखीच्या प्रेमात पडला. पडला म्हणजे प्रेमाच्या पुरात आकंठ बुडाला. एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणं हा खरं तर त्याचा प्रांतच नव्हता. तो कसा तर वर्गात पहिल्या बाकावर बसणारा, पिरियड बंक न करणारा शंभर नंबरी आज्ञाधारक विद्यार्थी. पण शेवटी तोही माणूसच.

पुराणातल्या कोणत्या तरी अप्सरेने कोणत्या तरी ऋषीच्या तपश्चर्येचा भंग करावा तसा याच्या तपश्चर्येचा भंग करण्यात ती कुणी मेनका यशस्वी झाली. तन-मन देऊन अभ्यास करणार्‍या या आमच्या मित्राने प्रेमही त्याच्या अभ्यास करण्याच्या पध्दतीप्रमाणेच निरातिशय घनगंभीरपणे केलं. पण त्याची ती प्रेयसी पुढे त्याची राहिली नाही आणि त्याच्या प्रेमाचा सारीपाट विस्कटला गेला. ज्या गंभीरपणे त्या आमच्या मित्राने कुणावर तरी प्रेम केलं आणि प्रेम मनावर घेतलं, त्याच गंभीरपणे त्याने प्रेमभंगही मनावर घेतला. तो काही देवदास वगैरे होणार्‍यातला नव्हता; पण दु:खाची काजळी त्याच्या चेहर्‍यावर दिसू लागली. तो दारूच्या डोहाकडे गेला नाही किंवा सिगारेटी फकाफक ओढत बसला नाही; पण त्या एका काळात त्याला एक गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्याचं व्यसन लागलं. ते गाणं होतं – कोई होता जिस को अपना, हम अपना कह लेते यारो, पास नही तो दूर भी होता, लेकिन कोई मेरा अपना.

हे गाणं ऐकताना त्याला गुलजारनी लिहिलेले ते शब्द फार जवळचे वाटू लागले. किंबहुना, त्याला गुलजारनी ती त्याला त्याच्यासाठी लिहून ठेवलेली भावना वाटू लागली –

आंखों में निंद ना होती,
आंसू ही तैरते रहते,
ख्वाबों में जागते
हम रातभर.

एके दिवशी कॉलेजच्या कँटिनमध्ये त्याने मला नेलं. मला म्हटलं, यार, या गुलजारनी काय बरोबर लिहून ठेवलं आहे बघ. डोळ्यांत झोप नावाची गोष्ट औषधाला दिसत नाही; पण आसवं मात्र तरळत राहतात…आणि या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे वळत राहताना आपण कुठल्यातरी स्वप्नाच्या धुनकीत रात्रभर जागत राहतो. माझ्याजवळ तो या शब्दांबद्दल इतकं बोलत राहिला की आता या गाण्यावर आणि त्यातल्या नेमक्या या शब्दांवर हा प्रबंध लिहील की काय, असं मला क्षणभर वाटू लागलं. पण मला एव्हाना कळून चुकलं होतं की ते गाणं हे त्याला त्याची त्या काळातली सोबत वाटू लागली आहे.

असो, गाणं हे आपल्या जीवनाशी जवळीक साधणारं असतं, जीवनावर लिहिलं गेलेलं असतं, कधी कधी ते जीवनाची चुगली करणारं असतं, म्हणून आपणही कधी कधी एखाद्या क्षणी आयुष्यातल्या एखाद्या क्षणाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल बोलताना एखादं गाणं पटकन बोलून दाखवतो, गाऊन नाही दाखवत!

First Published on: October 20, 2019 4:45 AM
Exit mobile version