खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

महात्मा गांधी 

महात्मा गांधी यांच्याबद्दल समाजमनात जितका आदर आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त अनादर जनमनात पसरवण्यात आलाय. माझा स्वतःचा असा अनुभव असा सांगतो की, चार साडेचार दशकांपूर्वी मी शाळेत असताना पुस्तकातून, भाषणातून आणि व्याख्यानमालेतून गांधी जितके भावले, राष्ट्रपिता वाटले, त्यापेक्षा आजूबाजूला, काही स्वतःला सुसंकृत समजणार्‍या लोकांच्या कायावाचेतून महात्म्याचा चेहरा खलनायकाचा केला जात असल्याचे अनुभवले आहे. सोबतची बरीचशी मुले आणि मग त्यांचे पालकही हे असेच बोलायचे. ते बोलतात म्हणून बाकीचे बोलायचे. अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते दंगलीपर्यत गांधी कसे दोषी आहेत आणि हिंदू समाज जो काही वार्‍यावर पडला त्याला हा पंचा नेसलेला माणूस कसा कारणीभूत आहे, याचे रंगीत धावते चित्रण त्यावेळी कानावर गेले होते.

आपल्या जाणिवा समृद्ध होण्याचा तो काळ नव्हता, पण काही तरी गडबड आहे, असे सतत वाटायचे. मग कॉलेज आणि भोवताल विस्तृत होत गेला आणि गांधी कालातीत का आहेत, हे तनामनात पक्के रुतून बसले. इतिहास तोडून मोडून सांगणार्‍या कुठल्या कुडमुड्यांची गरज भासली नाही. मेंदू आपल्या ताब्यात आहे, त्याच्यावर कोण राज्य गाजवू शकणार नाही, याचा तो आत्मशोध होता. गांधी बाबा कोणाच्या ‘वधा’ने मेला नव्हता. तो मरणारही नाही. गांधी कधी मरत नाही, तो विचार आहे. हा विचार माझ्या देशात नाही तर तो जगाच्या अंतापर्यंत टिकून राहणार आहे, हे जेव्हा लख्खपणे समोर येते तेव्हा एक भारतीय असल्याचा अभिमान ओसंडून वाहतो… सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक वाचताना हा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला समृद्ध करतो. मुख्य म्हणजे या पुस्तकाच्या निमित्ताने तरी मोठ्या जनमानसाला जो काही गांधींचा खोटा इतिहास काल, आज आणि उद्या सुद्धा सांगितला जाईल, तो कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी हे पुस्तक मोलाचे ठरेल.

चंदूभाऊ यांचे याआधी ‘आपुलाच वाद आपणाशी’ हे पुस्तक वाचले होते. प्रमोद चुंचूवार या आमच्या विदर्भातील पत्रकार मित्रामुळे केवळ हे पुस्तक नाही तर चंदूभाऊंनाच आत बाहेर नीट वाचता आले. मुद्याला थेट भिडणारा, आपल्याला जे वाटते ते स्पष्ट तोंडावर बोलणारा असा हा अवलिया माणूस आहे. मुख्य म्हणजे वयाने, विचारांनी ज्येष्ठ असूनही अजिबात अंतर न राखणारा मनमोकळा माणूस मला त्यांच्यात दिसला. आयुष्याशी दोन दशके दूर खेड्यात सामान्य माणसांत, शेतकर्‍यांमध्ये काम केल्यावर त्यांना आलेले अनुभव ‘आपुलाच’मधून वाचताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो.

गांधींप्रमाणे हा सुद्धा त्यांचा ‘सत्याचा प्रयोग’ होता. याच पुस्तकात ते थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याबद्दलचा अनुभव कथन करतात तेव्हा आपण चक्रावून जातो. खरेखोटेपणाचे अंगरखे आपोआप गळून पडतात. कोणाला बरे वाटते, छान दिसते म्हणून उगाचच खर्‍याचा आभास करून खोटे बोलण्यासाठी आपला जन्म झालेला नाही, असे चंदूभाऊ सांगतात त्यामुळे त्यांना गांधीच नव्हे तर आंबेडकर, जयप्रकाश नारायण असा एक लेखक म्हणून त्यांना मोठा प्रवास करता येतो. आपण बघतो की समाजात प्रत्यक्ष काम करणार्‍या माणसांपेक्षा बोलघेवड्या माणसांचा समाजावर ‘उगाचच’ एक मोठा प्रभाव असतो. केवळ शब्दांचे खेळ करून आणि वाचिक ताकदीच्या जोरावर गारुड करून भारूड करणारे लोक आता खूप झालेत. आपण काहीच करायचे नाही, पण आव असा आणायचा की मीच लोकांसाठी रक्ताचे पाणी केले.

आताच्या सोशल मीडियाचा जगात तर दररोज लोकांसमोर येत आणि आपल्या भाषणांनी लोकांचा मेंदू ताब्यात घेणारे अनेक गारुडी बाबा तयार झाले आहेत. हे चित्र किती आभासी आहे हे चंदूभाऊंमुळे आपल्या समोर येते. हे एवढे सारे येथे मुद्दाम सांगण्याची गरज म्हणजे तोच त्यांचा सच्चेपणा गांधी पुस्तकात आलाय. उगाच इतिहासाचे मोठे दाखले देऊन आणि जड शब्दात ते लांबलकच मांडून आपण फार थोर इतिहासकार असल्याचा अजिबात दावा न करता केलेले हे लेखन आहे. छोट्या प्रसंगांनी, सोप्या आणि कमी शब्दात गांधी आपल्यासमोर मांडताना ते आपल्याला आधी नीट गांधी समजावून सांगतात. सामाजिक चळवळींत झोकून देऊन काम करणार्‍या अनेक संवेदनशील कार्यकर्त्यांमुळेच आज महाराष्ट्र हे राज्य देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते, त्याच परंपरेचे चंदूभाऊ हे पाईक आहेत.

गांधी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गांधी हा डोक्यावर घेऊन नाचायचा नव्हे, तर डोक्यात ठेऊन तो आपल्या जगण्याला जोडण्याचा विषय असल्याची त्यांची भूमिका. गेल्या दशकभरात त्यांनी महाराष्ट्रभर विविध वृत्ती-प्रवृत्ती आणि वयोगटाच्या लोकांसमोर गांधींवर शेकडो व्याख्याने दिली आहेत. गांधी हा दडपलेल्या चेहर्‍याने आणि मठ्ठ निर्विकार मनाने ऐकण्याचा विषय नसून, गांधींच्या जगण्यातील विद्रोहाच्या ठिणग्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रसरशितपणा समजून घेण्याचा विषय असल्याचे त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांमधून ध्यानात आणून दिले. गांधी ऐकताना एरवी कंटाळणारा वर्ग चंदूभाऊंच्या या व्याख्यानानंतर गांधी खरंच वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायला हवा, असे मनापासून वाटते आणि ते ऐकणारा दुसर्‍याला सांगतो, दुसरा तिसर्‍याला सांगतो. खरे तर,  ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अशाच भारावून टाकणार्‍या मांडणीचे दस्तावेज आहे.

‘गांधींचा तिरस्कार करणारी मंडळी जगात कमी असली तरी त्यांनी भारतीय जनमानसात हे तिरस्काराचे विष पसरविण्यात बर्‍यापैकी यश मिळविले आहे. हे विष पसरविण्याचे सातत्याने कार्य करणारी मंडळी कोण होती? त्यांनी हे का केले? ज्यांनी हे काम सातत्याने केले, गांधी त्यांना वारंवार कसा आडवा येत गेला? त्यांच्या आंतरिक स्वप्नांच्या आशाआकांशांचा कसा चुराडा होत गेला? आणि गांधींना थांबविण्यासाठी त्यांचा वध कसा केला गेला, या सर्व प्रश्नांची सहज-सरळ-सोपी मांडणी म्हणजे, ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक होय. चंदूभाऊ पुस्तकाच्या प्रस्तावनेत हीच भूमिका मांडतात.

30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली. गांधी हे मुस्लिमधार्जिणे, पाकिस्तानप्रेमी, देशाच्या फाळणीला जबाबदार, पाकिस्तानला पंचावन्न कोटी भारत सरकारला द्यायला भाग पाडणारे, म्हणजेच देशद्रोही होते आणि या देशद्रोहाची शिक्षा म्हणजेच गांधी वध होय, असे नथुरामवंशीय लोक सतत सांगून, ती हत्या न्याय्य असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न करतात. खरे तर पाकिस्तान निर्मितीच्या आणि पंचावन्न कोटींच्या अगोदरही 1934 मध्ये पुण्यात गांधी हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी त्यांची हरीजनयात्रा सुरू होती. तो प्रयत्न यशस्वी झाला असता, तर मग, गांधी भंगी, न्हावी व वकिलाला एका स्तरावर आणू इच्छितात आणि आमच्या ब्राम्हणी महत्त्वाकांक्षेच्या आड येतात म्हणून ही हत्या केली, असे ते म्हणू शकले असते काय? यांसारखे बिनतोड प्रश्न लेखकाने उपस्थित करून गांधी हत्येसाठी, गांधींचा वर्णव्यवस्थाधारीत समाज व्यवस्थेतील उच्च निचतेच्या संकल्पनेला उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा इथल्या उच्चवर्णीय लाभार्थी व्यवस्थेला भयंकपित करीत होता, यातूनच ही हत्या झाली असे अधोरेखित करतात.

गांधींच्या मृत्यूनंतर विनोबा भावे  यांना विचारले गेले. ‘गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वात प्रथम कोणता विचार तुमच्या मनात आला? त्यावर ते म्हणाले, ‘माझ्या मनाला असेच वाटते की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचे कधी मृत्यू होत नाही. ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असत नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात असतात’. आणि म्हणूनच मग प्रश्न पडतो, ‘गांधी का मरत नाही’. चंदू भाऊंच्या या पुस्तकाचे सर्व भाषांमध्ये अनुवाद होऊन काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाने ते वाचायला हवे. अशांत अशा वातावरणात आज समाजाला त्याची मोठी गरज आहे.

First Published on: January 16, 2021 9:39 PM
Exit mobile version