मी बॉलपेन्स विकत घेतली असती तर…

मी बॉलपेन्स विकत घेतली असती तर…

लोकल ट्रेनमध्ये पेन विकणारा मुलगा

मुंबई लोकल आणि त्यातून प्रवास करणारे बहुरंगी-बहुढंगी लोक, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. या रोजच्या प्रवासात एखादी व्यक्ती तुम्हाला कधी व कसा अनुभव देऊन जाईल याचा काही नेम नसतो. काहीसा असाच घडलेला एक प्रसंग. जेमतेम १२-१३ वर्षांचा होता तो पोरगा. ट्रेनमध्ये बॉलपेन्स विकत होता. पेनाची आवश्यकता नसल्याने साहजिकच माझं त्याच्याकडे फार लक्ष गेलं नाही. मात्र त्याचं माझं उतरायचं स्टेशन एकच असल्यामुळे, तो दारात माझ्यापुढे येऊन उभा राहिला. हिंदीमध्ये स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता.

त्याच्या त्या स्वगतामधील एका वाक्याकडे मी ठरवूनही दुर्लक्ष करू नाही शकलो. ते वाक्य होतं – ‘‘आज ये सारे पेन बीक जाते तो मैं डॉक्टर बन जाता’’ कोणालाही प्रासंगिक हसायला येईल, असंच वाक्य होतं ते. स्टेशन आलं आम्ही उतरलो. माझ्याकडे थोडासा वेळ असल्याने मी त्याला थांबवलं आणि स्टेशनवरून बाहेर घेऊन गेलो. बाहेर जाताच मी त्याला विचारलं,‘‘क्या छोटू, सारे पेन एक दिन मैं बेचके कैसे डॉक्टर बनेगा तू?’’ यावर तो ताबडतोब उत्तरला – ‘‘छोटू नही यतीन नाम है मेरा। और एक दिन मैं कौन डॉक्टर बनता है भय्या? ये तो मैं रोज खुदको बताता हूं. ताकी एक दिन तो मैं सब माल बेच सकू और डॉक्टर बनने के लिये, ज्यादा पैसे जमा करने लग जाऊं।’’

तो पुढे बोलता झाला… ‘‘हमारे मां-बापने कहा है, की हम तूमको ज्यादा से ज्यादा स्कूल तक पढायेंगे। उससे ज्यादा के सपने मत देखो. उनके पास इतने पैसे नहीये. वो बोलते है पढाई से ज्यादा पैसे कमाने पे ध्यान दो । पर भैय्या कुछ भी हो मुझे तो डॉक्टर बनना है। बडा आदमी बनना है, तो बस पढाई के साथ साथ जो मिले वो सब काम करके पैसे जोडता हूं. त्या मुलाच्या बोलण्यात आणि देहबोलीमध्ये एक कमालीचा आत्मविश्वास होता. बरेचदा काही लोकांकडे सर्व ऐहिक सुखं, सोयी-सुविधा असूनही असा आत्मविश्वास मात्र त्यांच्यात पाहायला मिळत नाही.

यतीनच्या आत्मविश्वासाने मी भारावून गेलो होतो. मात्र त्याच्या बोलण्यावर मी फार काही प्रतिक्रिया द्यायच्या आत, चलो चलता हूं भैया… म्हणत तो गर्दीत हरवला. अर्थात त्या आधीच मी त्याला माझ्या कॅमेर्‍यात कैद केलं होतं.

‘त्याच्या’ डॉक्टर बनण्याच्या प्रवासात मी त्याला पुरा पडणार नव्हतो हे शाश्वत सत्य. पण त्याच्याकडे बाकी राहिलेली बॉलपेन्स मी त्यादिवशी कदाचित विकत घेऊ शकलो असतो.

First Published on: July 25, 2018 3:46 PM
Exit mobile version