दान अंगठ्याचे करणार नाही !

दान अंगठ्याचे करणार नाही !

आपल्या बोर्डिंग हाऊसमधल्या मुलांना खाऊ घालायला पैसे नाहीत. उधारीवर सामान द्यायलाही कुणी तयार होईना, हे सारं पाहून लक्ष्मीबाईंनी आपलं मंगळसूत्रच गहाण ठेवलं. गडगंज संपत्ती, बंगले, गाड्या म्हणजे खरी लक्ष्मी नव्हे, तर शिक्षण हीच खरी लक्ष्मी, हे लक्ष्मीबाई जाणून होत्या. पती कर्मवीर भाऊराव तर गरीबातील गरीब पोर शिकला पाहिजे, या ध्यासाने झपाटून गेले होते. त्यांचं मोठेपण सांगणारा आम्हाला पाठ्यपुस्तकातच धडा होता.

रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यापासून ती अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कर्मवीर हे तर महाराष्ट्राला पडलेलं मनोहर स्वप्न. कर्मवीरांना प्रेरणा दिली राजर्षी शाहूंनी. आर्थिक मदत असो वा भावनिक पाठबळ, शाहू महाराज त्यांच्या पाठीशी होते. शाहू होते म्हणून कर्मवीर घडले आणि कर्मवीरांमुळे लाखो विद्यार्थी शाळेच्या अंगणात येऊ शकले. भाऊरावांना काही सुजाण राजकीय नेत्यांनी, संस्थानिकांनीही मदत केली. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अगदी योग्य वेळी शिष्यवृत्ती देऊ केली म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. त्यांच्यासारखा थोर माणूस आपल्याला लाभला आणि बाबांसाहेबांमुळे तर पिढ्या घडल्या. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या महिनाभरापासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन. होस्टेल, मेसच्या शुल्कात अमाप वाढ विद्यापीठ प्रशासनाने केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला कुलगुरु मामेडालांची अवस्था ‘मार डाला’ अशी झालेली. ते कॅम्पसवरून गायब झालेले. कुलगुरु हरवले आहेत, अशी जाहिरात विद्यार्थ्यांनी केली. अखेरीस त्यांनी संसदेवर आपला मोर्चा वळवला आणि तिथे अगदी अंध-अपंग विद्यार्थ्यांपासून ते तरुण विद्यार्थिनीपर्यंत सर्वांवर लाठीचार्ज करण्यात आला. काहीजण भयंकर जखमी झाले. एका विद्यार्थ्याच्या पायाला मोठी जखम झाली. प्लास्टर करण्यात आलं. त्यावरही लिहिलं होतं-इन्कलाब जिंदाबाद. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लढाऊ बाण्याला दाद दिली पाहिजे. पाशवी बळाचा वापर समोरुन होत असताना ते ज्या तडफेने लढत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या लढ्याला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे, पण मुद्दा केवळ जेएनयुचा नाही, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. देशभरातल्या बहुसंख्य कॉलेजांनी, विद्यापीठांनी शिक्षण नावाची कमोडीटी निर्लज्जपणे विकायला काढली आहे. त्याचा खुला लिलाव सुरू आहे. त्या प्रकारची धोरणं ही केंद्र पातळीवरून राबवली जात आहेत. ‘मेक इन’ इंडिया की ‘विकीन’ इंडिया, असा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे. आणि अशा वेळी आमच्या टॅक्सपेयर्सच्या पैशावर हे फुकटे, देशद्रोही जगतात, अशी हाकाटी मध्यमवर्गातून ऐकायला मिळते आहे. आपण टॅक्स भरतो ( किती आणि कसा हे सीएला माहीत, पण असो!) त्यामुळे सरकारने पैसा कशावर खर्च करावा, याचा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं या ग्रेट इंडियन मिडलक्लासचं म्हणणं आहे. अगदी रास्त मुद्दा आहे.

जेएनयुच्या विद्यार्थ्यांची फी किती असावी, हा वेगळा मुद्दा, पण जेव्हा ३ हजार कोटींचा पुतळा बांधला जातो तेव्हा आपल्या टॅक्सपेयरच्या पैशाचं काय होतं, हा प्रश्न नाही का विचारता येत आपल्याला? जेव्हा लाखो लीटर पाणी केवळ एका रोडशोसाठी वाराणसीमध्ये खर्च होतं तेव्हा आपल्या तोंडाला कुलुप का लागतं ? जेव्हा हजारो कोटी रुपये केवळ जाहिरातींवर खर्च होतात अशी माहिती समोर येते तेव्हा आपल्याला शब्द का फुटत नाहीत ? ज्या शिवरायांच्या पुतळ्यावरून एवढी लंबीचवडी भाषणं दिली जातात ते म्हणाले होते- रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. इथे तर शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीवरच गदा आणली जाते आहे. तेही अशा विद्यापीठात जिथे सुमारे ४५ टक्के विद्यार्थी हे अत्यंत वंचित अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून येतात. अशा वेळी आपण जर टॅक्सपेयर म्हणून जेएनयुच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेत असू तर आपल्याहून अधिक दांभिक कोण !

युरोप अमेरिकेत शिकण्यासाठी लाखो रुपयांच्या स्कॉलरशिप्स आणि त्यासाठीची सापशिडी खेळणार्‍या मध्यमवर्गाला भारतातल्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत द्यायची म्हटलं की पोटशूळ का उठतो ? मुळात या मध्यमवर्गाने जी आर्थिक स्थिती प्राप्त केली तीच मुळी राज्यसंस्थेच्या कल्याणकारी धोरणांमुळे. स्वातंत्र्यानंतरच्या जन्माला आलेल्या तीन चार पिढ्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकल्या त्या ‘मायबाप’ सरकारच्या कल्याणकारी भूमिकेमुळे. चहावाला ( चहा विकला की नाही, हे ठाऊक नसलं तरीही) देशाचा पंतप्रधान झाला, ही शक्यता निर्माण झाली ती लोककल्याणकारी समाजवादाच्या राज्यसंस्थेमुळे. शेवटच्या माणसला नजरेसमोर ठेवून धोरणं आखली जावीत, हाच तर या राज्यसंस्थेचा आग्रह होता. या सार्‍या व्यवस्थेचे लाभ घेतलेला मध्यमवर्ग खांदे उडवत जेएनयुसकट देशभरातल्या गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करतो, हे चित्र अत्यंत अशोभनीय आहे. ज्या दिशेने अर्थव्यवस्थेची पावलं पडताहेत ते पाहता उद्या हीच वेळ उच्च मध्यमवर्गावरही येऊ शकते.

एकाने हसावे, लाखोंनी रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे
माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे

हे गाणं गायचं असेल तर आपल्याला आज शिक्षण क्षेत्रावर ओढवलेल्या संकटाचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ‘इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले’ असं निक्षून सांगणार्‍या फुल्यांना आठवावे लागेल. शिकण्याची, संघटित होण्याची, संघर्ष करण्याची त्रिसूत्री देणार्‍या बाबासाहेबांचं म्हणणं पुन्हा एकदा कान देऊन ऐकावं लागेल.

लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट १९४७ ला जे स्वातंत्र्याचे सूर्यकिरण पडले ते झोपडीझोपडीपर्यंत पोहोचावेत म्हणून शिक्षणासाठीचा हा लढा द्यावा लागेल, अन्यथा उद्याचा सूर्योदयही प्रायोजित केलेला असू शकतो. अक्ष्ररांचे आणि उद्याच्या स्वप्नांचे स्वामित्वहक्कही त्यांनी विकलेले असतील. आधुनिक भांडवली द्रोणाचार्य शिक्षणाची समान संधी नाकारण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ठणकावून सांगायला हवं-

येवोत कितीही द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही
नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचे करणार नाही !

 

-श्रीरंजन आवटे

First Published on: November 24, 2019 2:55 AM
Exit mobile version