चारित्र्याला लागलेले ग्रहण !

चारित्र्याला लागलेले ग्रहण !

ग्रहण

सर्व माध्यमांमध्ये सध्या एकच चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणाबद्दल. कारण एक आमदार यात गुन्हेगार आहे आणि त्यामुळेच सार्‍या देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बलात्कारित तरुणी तिची मावशी, काकू आणि वकील यांच्याबरोबर जात असताना त्यांच्या मोटारला एका ट्रकने धडक दिली आणि त्यात तिच्या मावशी आणि काकूला प्राण गमवावे लागले आणि ती तरुणी आणि तिचा वकील जबरदस्त जखमी झाले. हा अपघात नसून तो त्या तरुणीला मारण्याचा कट होता असा संशय आता घेतला जात आहे. कारण तिला सुरक्षा पुरवण्यात आलेली असतानाही अपघाताचे वेळी ते तेथे नव्हते व त्यामुळेच संशयाला बळकटी येत आहे. आपल्याला धोका असल्याचे तिने सर्वोच्च न्यायाधीशांनाही कळवले होते, तरी त्याचा उपयोग झाला नाही. आमदाराच्या पक्षाचेच सरकार असल्याने त्याला ‘क्लीन चिट’ देण्याचे प्रयत्न होणार आणि त्यासाठीच हा अपघात आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्नही होणार, असे बोलले जात आहे.

या घटनांमुळे साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘ग्रहण’ नावाच्या चित्रपटाची आठवण ज्यांनी तो पाहिला असेल त्यांना झाली असणार हे नक्की. कारण आठवण व्हावी अशीच त्या चित्रपटाची कथा होती. दिग्दर्शक शशिलाल नायर यांनी कथा-संवाद लेखक सुजीत सेन यांची ती कथा सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर संस्मरणीय केली होती. कुठल्याशा एका राजधानीच्या शहरात ही कहाणी घडते.

पार्वती-पारु-शास्त्री नावाची एक तारुण्यात नुकतीच पदार्पण केलेली तरुणी स्वच्छंदपणे बागडत, मैत्रिणींबरोबर खेळत असते. तिचा साखरपुडा तिच्यावर प्रेम करणार्‍या तरुणाबरोबरच होतो. ती आणि तिचे वडील सुखस्वप्ने बघू लागतात. पार्वती नृत्यशिक्षिका असते आणि ते काम ती आवडीने करत असते. काही मुली तिच्या घरी तर काहींच्या घरी जाऊन ती शिकवण्या करत असते. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आचार्य यांचा मुलगा संजय तिला पाहतो. त्याच्यातील वासना जागी होते. तो त्याच्या हस्तकांकरवी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करतो. नंतर ती मेल्याचे समजून तिला रस्त्यावर फेकून देतो. पारु जिवंत असते; पण तिची अवस्था दयनीय असते. एक पत्रकार तिला पाहतो आणि तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथे पोलीस अधिकारी अशा बड्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यास तयार नसतानाही त्यांना ती नोंदवून घेणे भाग पाडतो. तो अधिकारी लगेच वरिष्ठांना फोन करतो. वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्याबाबत सांगतो आणि आम्ही काय करायचे अशी विचारणा करतो. हताश होऊन मुख्यमंत्री त्याला कायद्यानुसार सारे करा असे म्हणतो. पण हा धक्का त्याला सोसत नाही आणि एका कार्यक्रमाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने तो मरण पावतो.

मुख्यमंत्री परिवार शोकाकूल असतानाच खटला सुरू होतो. संजयचे वकीलपत्र जग्गू सिन्हा घेतो. मुख्यमंत्र्यांची मुलगी सुनीता ही त्याची बायको. तिलाच आता मुख्यमंत्री होण्याची गळ घालण्यात येते. संजय तिला तसा आग्रह करतो आणि सर्वांची सहानुभूती तुला असल्याने तू नक्कीच निवडून येशील, असे सांगतो. संजयला वाचवण्यासाठी जग्गू पार्वतीवर वाईट आरोप करून तिची चाल चांगली नसल्यानेच ती रात्रीची घराबाहेर पडते आणि वेगळेच उद्योग करून अपरात्री परतते वगैरे सांगून ती शरीरविक्रय करणारीच आहे हे ठासून सांगतो. तिने मुद्दामच हा आरोप केला आहे आणि पत्रकाराचे वर्तमानपत्र हे सुनीताला मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात असल्याने त्यानेच हा कट रचल्याचेही तो सांगतो. महिला डॉक्टर बलात्कार झाला आहे का नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे सांगते. परिणामी न्यायाधीश संजयला निर्दोष ठरवतात आणि पारुला ताकीद देऊन पुन्हा असे खोटे आरोप करू नको आणि चांगली वाग असे बजावतो.

या निर्णयाने पारुला धक्का बसतो आणि तिची स्मृती जाऊन ती वेडसर बनते. ती कोठे गेली हे कुणालाच समजत नाही. संजय तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. मुख्यमंत्र्यांच्या एका पार्टीत संजय दारुच्या प्रभावाखाली असताना जग्गूला आपणच पार्वतीवर बलात्कार केल्याचे सांगतो. आता जग्गूला पश्चाताप होतो. तो पारुच्या शोधात निघतो. तो कोठे जाणार याबाबत त्याने कोणालाच सांगितलेले नसते. इकडे सुनीता संजयला खडसावून विचारते; पण तो न बधता तिला आपण निर्दोष असल्याचे पटवून देतो. जग्गूचा पत्ता लागत नसल्याने संजय आणि जग्गूचा भाऊ दोघेही अस्वस्थ होऊन प्रयत्न करतात. जग्गूला जात असताना पारू एका ठिकाणी कचर्‍याचे ढीग उपसत असताना दिसते. तो तिला घेऊन एका सुरक्षित ठिकाणी जातो. डॉक्टरांकडून तिची तपासणी करून घेतो आणि त्यांना तिच्यावर इलाज करण्यास सांगतो. डॉक्टर तिला मधूनच त्या प्रसंगाची आठवण होऊन ती बेभान होऊन काहीही करेल, असा इशारा देतो. अशा मनस्थितीत रुग्ण आत्महत्येचा प्रयत्नही करतात, म्हणून तू सतत तिच्याबरोबर रहा, तिच्यावर कायम लक्ष असू दे, असे बजावतात. जग्गू ते मान्य करतो आणि त्याप्रमाणे ते दोघे त्या निसर्गरम्य, सुरक्षित ठिकाणी राहू लागतात.

पारू हळूहळू बरी होत असते. नाचू गाऊ लागते. तरीही मधूनच तिला तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन तिचा तोल जातो. अशा वेळी ती जग्गूलाही मारहाण करते. पण तशाही परिस्थितीत जग्गू तिला सांभाळतो. संजयने पैसे देऊन हा शोध घेण्यास सांगितलेला माणूस त्याला सारे सांगतो. संजय अस्वस्थ होतो. डॉक्टरांनी पारू आता पूर्ण बरी झाल्याचे सांगितल्यानंतर जग्गू परततो. संजयनेच गुन्हा केल्याचे आपल्याला कळले आहे असे सांगतो. दरम्यान सुनीताची मुख्यमंत्रीपदी निवड होते आणि तिच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम असतो. ती आणि तिच्यानंतर एक एक मंत्री शपथ घेऊ लागतात. संजय मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी उठतो तेव्हाच प्रेक्षकांत बसलेली पारू उठून उभी राहते. तिच्या हातात पिस्तूल असल्याचे पाहून संजय अस्वस्थ होतो. पारू पिस्तुलातील सर्व सहा गोळ्या झाडते. संजय खाली पडतो. पारुला अटक होते. तिच्यावर खुनाचा आरोप होतो.

जग्गू आपण तिच्या बाजूने खटला लढवणार असे सांगतो. त्याचा भाऊ त्याला तसे करू नको सांगतो. पण तो ऐकत नाही. हा खटला तू हरशील आणि आपली बदनामी होईल. त्यापेक्षा ते लोक म्हणू ते पैसे देण्यास तयार आहेत असे सांगतो. पण त्यालाही जग्गू नकार देतो. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मी संजयच्या वतीने खटला लढवीन आणि आपण न्यायालयात भाऊ नाही हे ध्यानात ठेव. जग्गू जातो. तिकडे सुनीताही पैशाने साक्षीदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. जग्गू तिला भेटायला जातो, तेव्हा ती माझ्या भावानेच मला तो निर्दोष असल्याचे सांगितले होतेे, असे सांगून जग्गूवरच त्याला पारुबरोबरच राहायचे आहे, त्यांनी किती मजा केली वगैरे आरोप करते. तो तिला थप्पड मारतो. ती रागावून त्याला हे महाग पडेल असे म्हणते. पुन्हा माझे नावही घेऊ नको असे बजावते.

खटला सुरू होतो. जग्गूचा भाऊ न्यायालयात संजयच्या मृत्यूच्या प्रसंगाची ध्वनिचित्रफीत दाखवतो आणि न्यायालयाचीही खात्री पटल्यासारखे दिसते. निकाल नंतर जाहीर होईल, असे ते सांगतात. दरम्यान जग्गू संजय अधून मधून डॉक्टरकडे का जात असतो, ते शोधून काढतो. त्यामुळेच त्याचा मदतनीस त्याला सर, ही केस आपण हरणार. कारण आपल्याकडे सबळ पुरावा नाही, असे म्हणतो तेव्हा जग्गू त्याला, पुरावा आहे, असे म्हणतो. सारे चकित होतात. संजयच्या खुनाची ध्वनिचित्रफीत जग्गू पाहतो आणि निश्चिंत होतो. निकाल देण्याआधी बचाव पक्षाला सांगायचे आहे का, असे न्यायाधीश विचारतात. संजय डॉक्टरकडून तपासणी करून घेत असे. कारण त्याला हृदयविकार होता असे सांगून शपथविधीच्या वेळी पारू उभी राहिलेली पाहून, तिच्या हातातील पिस्तूल बघूनच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावला.

पारुने झाडलेल्या पहिल्या पाच गोळ्या त्याला लागल्याच नाहीत. शेवटची गोळी त्याला लागली ती तो खाली पडताना; पण त्यावेळी तो मरण पावला होता. आणि शवावर गोळी मारली तर खून होत नाही, असा बचाव करून ती ध्वनिचित्रफीत दाखवण्याची परवानगी मागतो. न्यायालयही त्याला परवानगी देते. मग तो ती ध्वनिचित्रफीत संथगतीने दाखवून संजय आधीच छातीवर हात धरून पडला. नंतर पारुने गोळ्या झाडल्या त्या भलतीकडेच गेल्या. तो पडताना मात्र त्याला गोळी लागली हे सप्रमाण दाखवून देतो. सारेजण गप्प होतात. न्यायाधीश पारुला निर्दोष ठरवतात. बाहेर पडताच पारुचे वडील जग्गूला भेटून आभार मानतात. ती नमस्कार करताना जग्गू तिला थांबवतो. तो म्हणतो, हे सारे ठीक पण तिच्या होणार्‍या सासर्‍यांनी आणि आजेसासूने आम्ही तिला सून म्हणून स्वीकारणार नाही, असे सांगितले आहे. जगात देव नाहीच असेही निराशेने म्हणतो. ते ऐकून त्याच्याकडेच येणारा त्याचा मदतनीस म्हणतो, नाही. वकीलसाहेब देव आहे. असे म्हणून तो पारुच्या, तिच्याशी लग्न करायला तयार असलेल्या, ज्याच्याबरोबर साखरपुडा झालेला असतो, त्या भावी नवर्‍याला घेऊन येतो. तो हार घालूनच पारुचे स्वागत करतो… चित्रपट संपतो.

पारु शास्त्रीची भूमिका मनीषा कोईरालाने अविस्मरणीय केली आहे. तिच्या अभिनय कौशल्याला दाद द्यावीच लागेल. जॅकी श्रॉफ (जग्गू सिन्हा) आणि रघुवरन (त्याचा भाऊ) यांनीही स्मरणीय काम केले आहे. अनुपमा वर्माने (सुनीता आचार्य) तोडीस तोड रंगवली आहे. चंद्रकांत गोखले (पारुचे वडील) आणि रवी पटवर्धन (पत्रकार) यांच्या भूमिकाही प्रभावी आहेत. कथेला साजेसे संगीत कार्तिक राजा यांचे आहे. एकूणच पहावा असा हा चित्रपट आहे.

– आ. श्री. केतकर

First Published on: August 4, 2019 3:04 AM
Exit mobile version