‘टीआरपी’साठी मूल्यांची ऐशीतैशी !

‘टीआरपी’साठी मूल्यांची ऐशीतैशी !

भारतीय पुरुषी मानसिकता आणि सामाजिक विषमता ही प्राचीन काळापासून पाहायला मिळते. कोणत्याही काळात ‘स्त्री’ ही पुरुषांच्या जुलमी अत्याचाराची बळी ठरली, प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आणि त्या समस्या निर्माण केल्या आपल्या परंपरावादी समाजाने.. हा परंपरावादी समाज स्वतःच्या सोयीसाठी व आम्ही किती बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी अन्यायकारक गोष्टींना संस्कृतीचे नाव देऊ लागला व यात नुकसान झाले ते आपल्या स्त्रियांचे. एखादा नवीन बदल महिलांनी स्वीकारला की तिला विरोध करणारे तयार असतात. सध्यपरिस्थितीत तर एक तुकडी महिलांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. त्यांना जर स्वतःला चुकीचे वाटले मग ते कितीही बरोबर आणि आधुनिक असो त्या गोष्टीला धरून सगळ्या बाजूने त्या महिलेला जाळ्यात अडकवून तिचे जगणे मुश्किल करणारे महाभाग समाजात वाढत आहेत. या खुळचट आणि बुद्धीहीन वर्गाचा उदय सध्या आपल्या भारतीय पत्रकारितेत होताना दिसत आहे. या आठवड्यात आपण कोरोना आणि इतर समस्या बाजूला ठेवून फक्त आणि फक्त सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि रिया चक्रवर्ती कशी दोषी आहे. सीबीआय तिची किती तास चौकशी करत आहे. यातच व्यस्त होतो. यापासून आपला सोशल मीडिया तरी कसा सुटेल.

सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या वेगाने रिया चक्रवर्तीचा मीडियाने प्रश्न विचारतानाचा एकूणच तिच्या भोवती गराडा घातल्याचा फोटो व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून ‘मोरॅलिटी’ आणि भारतीय माध्यमांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही हेच स्पष्ट होते. रिया ही खरंच गुन्हेगार आहे का..? हे तपास यंत्रणा ठरवू शकत नाही. ते फक्त तपास लावू शकतात. जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत शहाण्याने न बोललेलेच बरे.. पण आपल्या मीडियाने मात्र तिला आरोपी घोषित केले. नको त्या शब्दात तिची अवहेलना केली. या प्रकरणाने सध्या सोशल मीडियात जोर धरला आहे. एखादी व्यक्ती प्रेम करत असेल तर तिला करू द्या, तिची अग्निपरीक्षा प्रत्येक वेळी घेतली जाऊ शकत नाही. रियासोबत जे घडत आहे. त्या अनुषंगाने कवयित्री नम्रता फलके यांची एक कविता सध्या व्हायरल होत आहे.

अब हर लड़की प्यार से बचेगी
उससे जो रहता हैं कांच के महलों में
या फिर शायद कच्चि दीवारों में।

अब डरी हुई हैं हर लड़की
और डरना चाहिए हर बाप और भाई को भी
जिनकी लड़की प्यार कर बैठी है
उससे जिसके भूतकाल का कोई अता पता नहीं…

या ओळी आजच्या प्रत्येक रियाचं प्रतिनिधित्व करतायत..पाठीमागच्या काही लेखात उल्लेख केला त्याप्रमाणे इथे दोन्ही बाजूंनी चर्चा होतेय.

यापूर्वीही आपण ‘मी टू’ या चळवळीची मोहीम पाहिली जी जगभरातील महिलांना न्याय मिळवून देणारी होती. जगभरातील लोकांचा या मोहिमेला तेवढाच पाठिंबादेखील मिळाला. आज नेमकी याच प्रकारची गरज आहे ती म्हणजे रिया चक्रवर्ती आणि तिच्यासारख्या अनेक महिलांच्या बाबतीत…. ‘आम्ही आणि आमचा टीआरपी’ याचाच पाठलाग करणार्‍या माध्यमांना सोशल मीडियावर मात्र चांगलेच उत्तर मिळत आहे. भोवतालचे जग नकोसं वाटणारी परिस्थिती निर्माण करणारा मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कसा..? हा प्रश्न विचारला जातोय. याचे उत्तर कुणाकडेच नसले, तरी व्यक्त होताना खाजगी जीवन जगण्याचा अधिकार आणि मूल्यात्मक पत्रकारितेचा आधार याचा आरसा सोशल मीडिया काही प्रमाणात दाखवत आहे.

तसे पाहता सोशल मीडियाच्या उद्यापासून ते आजपर्यंत महिला सेलिब्रिटी, राजकीय, कार्पोरेट क्षेत्रातील महिला, साहित्यक्षेत्रातील असो किंवा शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असो. या सर्व ज्यावेळी समाजमाध्यमांवर व्यक्त झाल्या. त्यावेळी त्यांना ट्रोल करण्यात आलं. अश्लाघ्य भाषेत ट्रोल करणार्‍यांची टोळी तर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अर्थात याला रसद पुरवली जाते हेही तितकेच खरे. पण ज्यावेळी आपण माणूस म्हणून एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, त्यावेळी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण गदा आणता कामा नये. पण इथे मात्र उलट होते. (अर्थात अयोग्य गोष्टींचे समर्थन करता येणार नाही) हा प्रकार असाच सुरू राहिला तर ‘सोशल मीडिया लिंचींग किंवा सायबर लिंचिंग’ चे जाळे एवढे घट्ट विणले जाईल की त्यात सर्वांचाच बळी गेल्याशिवाय राहणार नाही.

समाजात वावरताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण ज्यावेळी काही बाबतीत सर्वांचं एकमत तयार होतं. त्या वेळी सामाजिक जाणीव जागृती वाढते. एक नवी पाऊलवाट तयार होते. अलीकडच्या काळात महिलांच्या बाबतीत सोशल मीडियावर चांगल्या गोष्टींना वाव मिळत असला तरी त्याचे प्रमाण नगण्यच. महिलांबद्दल कोणी वाईट पोस्ट केली तर त्याला ती पोस्ट मागे घेण्यास भाग पाडले जाते. याचा अर्थ ज्या सोशल मीडियाला आपण सुशिक्षित बेरोजगारांचा बिनकामी मीडिया म्हणायचो त्याला आज काही प्रमाणात चांगल्या दृष्टीने पाहणार्‍यामुळे वेगळी ओळख प्राप्त होत आहे. ही दुसरी बाजू तितकीच महत्वाची…

समाज माध्यमांच्या बाबतीत कधी कधी न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम तंतोतंत लागू पडतो. क्रीयाबल आणि प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान दिशा मात्र परस्परांच्या विरुद्ध असतात. इथे ज्यावेळी समाज माध्यमांवर एखादी समाजहितकारक नसलेली पोस्ट व्हायरल होते त्यावेळी परिमाण दोन्ही बाजूंचे सारखे पण दिशा विरुद्ध असतात. चांगले आहे या बाजूने काही असतात आणि वाईटाचे समर्थन करणारे दुसर्‍या बाजूला असतात. यातून साध्य काही होत नाही सामाजिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात होते. भविष्यात सामाजिक नुकसान येणार्‍या पिढीला वेगळ्या वळणावर घेऊन जाईल हे नाकारता येणार नाही. यासाठी आपले मत मांडण्यासाठी समांतर असावे पण आपल्यामुळे इतरांचे नुकसान होता कामा नये.

आपणही समाजाचा घटक आहोत, आपलेही कर्तव्य आहे की सर्वांना समान समजून प्रत्येकांच्या मताचा आदर आपण केला पाहिजे. कोणी चुकत असेल तर संवैधानिक भाषेत त्याला समज दिली पाहिजे या गोष्टीचे सोशल मीडिया वापरणार्‍या युवकांनी पालन केले तर समाजाचे प्रमेय वेगळ्या सूत्रात बांधता येईल. अन्यथा आपण अधोगतीच्या मार्गाने जायला लागू. भविष्यात असे म्हणण्याची वेळ येऊ नये की प्रगत काळापेक्षा अश्मयुग बरे होते. यासाठी सारासार विचार करून भारतीय पत्रकारिता आणि सोशल मीडिया यांनी एकत्र येऊन दिशादर्शक काम करायला हवं. नाहीतर मीडिया आणि सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात अडकवू पाहणार्‍या आजच्या स्त्रियांना मार्ग सापडणार नाही. जी स्त्री प्रगती करू पाहते तिच्या पाठीशी आपण सर्व उभे राहूयात आणि आपले एथिक्स जपूयात..

-धम्मपाल जाधव
-(लेखक युवा विषयाचे भाष्यकार आहेत)

First Published on: September 13, 2020 5:39 AM
Exit mobile version