स्वीडिश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल

स्वीडिश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल

आल्फ्रेड बर्नाल्ड नोबेल हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते. आल्फ्रेड यांचा जन्म 21 ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेड यांनी शालेय शिक्षण खासगी शिक्षकांकडून घेतले. नवव्या वर्षी शिक्षणासाठी ते रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे होते. तेथून ते पॅरिसला गेले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना जगातल्या पाच भाषा बोलता येत होत्या. पुढे त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. येथेच त्यांचा विस्फोटकांशी परिचय झाला. नायट्रोग्लिसरिनचा सुरक्षित उपयोग या विषयावर ते सखोल संशोधन करीत होते. त्यांचे तीन भाऊ पिट्सबर्ग येथे व्यवसायात गुंतले होते. शेवटी १९६३ मध्ये त्यांना ते पेटंट मिळाले. हेच ते ‘ब्लास्टिंग ऑइल.’ यातूनच पुढे डायनामाइटचा जन्म झाला.

नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून अल्फ्रेड यांनी डायनामाइट तयार केले. यामुळे ते सिलिंडरमध्ये भरणे सुलभ झाले. त्यावर होणारा तापमान व दाबाचा परिणाम नियंत्रणात आला. धोके टाळून ते हाताळणे सुकर झाले. या शोधामुळे विस्फोटाची शक्ती वाढली. पूर्वीच्या गनपावडरपेक्षा ती पाच पट अधिक शक्तिशाली झाली. खाणकामात व मोठ्या प्रमाणावरील बांधकाम क्षेत्रात यामुळे क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. या उत्पादनामुळे अल्फ्रेड यांचे जगभर नाव झाले आणि हीच त्यांची पुढे ओळख झाली. डायनामाइटमुळे होणार्‍या स्फोटातून जिवांचे व साधनसंपत्तीचे नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षित उपाय शोधण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या नावावर एकूण ३५५ पेटंट नोंद आहेत. अल्फ्रेड यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ‘डायनामाइटचा जनक’ या व्यतिरिक्त ते रसायनशास्त्रातील इंजिनीअर, शस्त्रनिर्माता, उद्योगपती, तत्त्वज्ञ, लेखक, कवी, थोर शांतिवादी म्हणूनही जगाला परिचित आहेत. त्यांनी १५० पुस्तकांचे लेखन केले आहे.

आपल्या शेवटच्या काळात ते खूप भावूक झाले होते. त्यांनी आयुष्यभर जमवलेल्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट तयार केला. त्यात ३१ मिलियन सेक म्हणजे २६५ मिलियन डॉलर्सचा निधी जमा केला. यातून जगाची शांती वाढावी व जगाचा विकास व्हावा, विश्वाचे कल्याण व्हावे अशी त्यांची कल्पना होती. आपल्या या अलौकिक कार्यामुळे अल्फ्रेड विश्वशांतीचे दूत झाले. जमा रकमेच्या व्याजातूनच आजतागायत नोबेल पुरस्कार दिले जात आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी दरवर्षी पुरस्कारांची घोषणा केली जाते.

नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे. सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती. अशा या शास्त्रज्ञाचे १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झाले.

First Published on: October 20, 2021 1:07 AM
Exit mobile version