टांगा पलटी…घोडे फरार…

टांगा पलटी…घोडे फरार…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक ताकदवान नेते समजले जातात. देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीची अचूक नाडी पकडण्याचे कसब, जबरदस्त राजकीय निरीक्षण क्षमता, मराठी तरुणाईला भुरळ घालू शकणारे फर्डे आणि तडाखेबाज वक्तृत्व ही राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची बलस्थाने समजली जातात. महाराष्ट्रातून २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एक आमदार विधानसभेवर निवडून आला असला तरीही मुंबई, दादर येथील शिवाजी पार्क मैदान हाउसफुल करण्याची ताकद ही राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या मताला, भूमिकेला आणि विधानाला महाराष्ट्रात निश्चितच एक विशिष्ट असे मूल्य आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या तेरा वर्षात राज ठाकरे यांनी अत्यंत प्रभावीपणे व पद्धतशीरपणे या प्रचारकी तंत्राचा वेळोवेळी वापर करून घेतला आहे. मात्र २००९ सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वगळता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फारसे यश मिळवता आलेले नाही हीदेखील वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. केवळ दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि पुरोगामी राज्यांमध्ये एकाच वेळी तब्बल तेरा आमदार निवडून आणण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाच्या अशा कोणत्या चुका झाल्या की २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका आमदारावर या पक्षाला समाधान मागण्याची वेळ आली?

२०१४ सालच्या पूर्वी म्हणजे भारतात मोदी युगाचा प्रारंभ होण्यापूर्वी प्रादेशिक पातळीवर ज्या ज्या काही सरकार विरोधात शक्ती उभ्या ठाकल्या होत्या त्यामध्ये एक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन होते, दिल्लीत या आंदोलनाने भलताच जोर पकडलेला होता. तर महाराष्ट्र पातळीवर मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक या या परिक्षेत्रा पुरते तरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तत्कालीन प्रस्थापित सरकार विरोधात तसेच अगदी विरोधी पक्षाच्या विरोधातही राज्यातील जनतेमध्ये आगडोंब उसळला होता. त्याआधी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या केवळ दोन वर्षे आधी राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्याच निवडणुकीत आपल्या ताकदीची चुणूक दाखवत तब्बल १३ आमदार एका झटक्यात विधानसभेवर पाठवले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबई ठाणे कल्याण-डोंबिवली नाशिक पुणे येथील मराठी तरुणाईवर राज ठाकरे यांनी अक्षरश: गारूड केले होते. वास्तविक हा परिसर हा शिवसेना आणि भाजप युतीचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून तोपर्यंत ओळखला जात होता. मात्र २००९ सालच्या विधानसभा निकालांनी शिवसेना-भाजप युतीच्या आणि विशेषता शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.

आता पहिल्याच निवडणुकीत मनसेचे जरी १३ आमदार निवडून आले असले तरी मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेना-भाजप युतीचे ४९ उमेदवार थोड्याबहुत मतांच्या फरकाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पराभूत झाले होते. त्यामुळे सहाजिकच मनसेचा फायदा हा मनसे पेक्षाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक झाला आणि २००९ साली महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या मतविभागणीच्या बळावर आले. त्यावेळी देखील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आल्याचे उघडपणे मान्य केले होते.
राजकीय क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो की व्यापारी क्षेत्र असो तेथे यश मिळवताना ज्याप्रमाणे अविश्रांत परिश्रम उपसावे लागतात. त्याचप्रमाणे ते टिकवण्यासाठी अखंडपणे परिश्रम करत राहावे लागते तरच मिळालेले यश टिकू शकते. मनसेच्या प्रारंभीच्या काळामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या यशासाठी वाढीसाठी अविश्रांत परिश्रम घेतले यात शंकाच नाही. मात्र त्यानंतर मिळालेले यश टिकवण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी जेवढे नियोजनबद्ध अखंड आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, कष्ट राज ठाकरे यांनी घेणे अपेक्षित होते तेवढे घेण्यास मात्र ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच २०१४ सालच्या विधानसभा निवडणुका आणि त्या नंतरच्या म्हणजे गेल्या वर्षी २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर मनसेचा केवळ एक आमदार कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आला. कल्याण ग्रामीण मध्ये निवडून आलेले आमदारदेखील स्वबळ अधिक मनसे या निकषावर निवडून आलेले आहेत. मनसेच्या गेल्या दहा वर्षातील या घसरगुंडीला केवळ संघटनात्मक बांधणीचा अभाव हे एकमेव कारण कारणीभूत नाही. ते त्यातील एक कारण असू शकेल. मात्र केवळ हे एकच कारण नाही. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण हे शिवसेनेसाठी प्रमुख मर्मस्थळ होते. त्याप्रमाणे राज ठाकरे यांचे भाषण हे देखील मनसेच्या उमेदवारांसाठी एक प्रमुख मर्मस्थळ होते आणि आजही आहे. मात्र त्यानंतरही मनसेच्या पदरी जर यश पडत नसेल त्यामागे प्रमुख कारण हे मनसेच्या सतत बदलत जाणार्‍या भूमिका हे आहे.

आजवरचा राजकीय अनुभव मनसेच्या बाबतीत असे सांगतो की मनसेने जे जे स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी केले, पक्षाच्या वाढीसाठी केले. महाराष्ट्राच्या हितासाठी केले. मराठी माणसाच्या रोजगारासाठी केले त्या-त्यावेळी मराठी माणसाने मनसेच्या झोळीमध्ये भरभरून मतदान केले आहे. मात्र जेव्हा जेव्हा मनसे निवडणुकीच्या मैदानात स्वतःसाठी कमी आणि अन्य पक्षाच्या विजयासाठी अथवा अन्य पक्षाला पराभूत करण्यासाठी उभी ठाकली तेव्हा तेव्हा मराठी माणसाने मनसेला मतदान करण्याऐवजी शिवसेनेला मतदान करणे हे अधिक पसंत केले. याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे शिवसेना आणि मनसे या दोन्ही संघटना आजही मराठी माणसांना स्वतःच्या हक्काच्या संघटना वाटतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा शिवसेना आणि मनसे स्वतःच्या हक्कासाठी मते मागतात, तेव्हा तेव्हा मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणूस हा अन्य राष्ट्रीय पक्षांपेक्षा अथवा अन्य प्रादेशिक पक्षांपेक्षा शिवसेना आणि मनसे यांच्या पाठीशी उभा राहतो हे महाराष्ट्रातील जनतेने यापूर्वी अनेकदा दाखवून दिलेले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हा प्रकल्प कोकणातील तरुणांच्या रोजगारासाठी आणि महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेरच्या राज्यात जाऊ नये यासाठी या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. याआधीची राज ठाकरे यांची नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची भूमिका ही पूर्णपणे विरोधात होती. त्यामुळे सहाजिकच जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे आता अशी कोणती जादूची कांडी फिरली की, राज ठाकरे यांच्यासारख्या जाणकार नेत्याने नाणार प्रकल्पाचे समर्थन सुरू करावे? कोकणातील नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा अर्थात केंद्रातील भाजप सरकारचा पेट प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात विशेषता गुजरातमध्ये जाण्याचे प्रयोग याआधीदेखील झाले आहेत. उरणमधील जेएनपीटीतील ३५-४० टक्के प्रकल्प हे गुजरातमध्ये गेले. मात्र त्यावेळी ही आरडाओरड का नाही करण्यात आली? राज ठाकरे हे आताही आणि भविष्यातही महाराष्ट्रातील एक ताकदवर नेत्यांमध्ये गणले जातील यात निश्चितच शंका नाही. मात्र जर राज ठाकरे यांना खरोखरच मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करायचे असेल तर त्यासाठी त्यांना त्यांची एक भूमिका कायम राखावी लागेल. कारण भूमिका बदलल्या की नेतृत्वाच्या हेतूविषयी सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आणि एकदा का विश्वासाला तडा गेला की तो पुन्हा मिळवणे हे जेवढे वाटते तितके सहज, सोपे नसते. पक्षाचे भवितव्य धूसर होत जाते आणि एकदा का पक्षाच्या भवितव्याबाबत पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या की ‘टांगा पलटी घोडे फरार’ होण्यास फारसा वेळ लागत नाही.

First Published on: March 7, 2021 11:58 PM
Exit mobile version