ठाकरे सरकारच्या चक्रव्यूहातील ‘फडणवीस’

ठाकरे सरकारच्या चक्रव्यूहातील ‘फडणवीस’

बरोबर दोन वर्षांपूर्वी अर्थात 28 नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या आघाडीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले या घटनेला बरोबर दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोना, टाळेबंदी, विस्कटलेली आर्थिक घडी आणि त्याबरोबरच केंद्रातील सरकारच्या माध्यमातून भाजपकडून होणारी ठाकरे सरकारची राजकीय कोंडी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील संसदीय कार्यप्रणालीचा यापूर्वी कोणताही अनुभव नसलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सरकारच्या नेतृत्वाची धुरा या खडतर परिस्थितीमध्ये देखील यशस्वीपणे सांभाळून दाखवली आहे. याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्त गुणांकडे सोईस्कर कानाडोळा करणे आहे. ठाकरे सरकारच्या स्थापने आधीच महाराष्ट्रात आणखी एक मोठी घटना 22 नोव्हेंबरला घडली होती. शिवसेना-भाजप बरोबर सत्तेत येत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे तेजतर्रार नेते अजित दादा पवार यांना बरोबर घेऊन राजभवनवर पहाटेच्या साखर झोपेत उरकलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी हीच ती ऐतिहासिक घटना होय. ऐतिहासिक घटना यासाठी की या घटनेनेच तर देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणातील ग्रह फिरले आणि या घटनेला दोन वर्ष उलटून गेली तरी फिरलेले ग्रह काही मूळ पदावर यायला तयार नाहीत.
महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षांतील राजकीय स्थिती लक्षात घेतली तर पवार पॅटर्नमधून निर्माण झालेल्या ठाकरे सरकारच्या चक्रव्यूहामध्ये आजमितीला 2014 ते 2019 या पाच वर्षातील महाराष्ट्राचे तत्कालीन शक्तिशाली सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हे पुरते अडकल्याचे चित्र आहे आणि विशेष म्हणजे फडणवीसांना या चक्रव्यूहातून त्यांचे जे कृष्ण आणि अर्जुन बाहेर काढू शकतात ते देखील गेल्या दोन वर्षांपासून हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बसून आहेत.
देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक त्यानंतर महापौर मग आमदार आणि त्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नंतर 2014 मध्ये थेट राज्याचे मुख्यमंत्री अशा कोणालाही हेवा वाटावा अशा पद्धतीने राज्याच्या सर्वोच्च सत्ता पदापर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्रातील भाजपचे अत्यंत वजनदार नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसमोर हट्ट धरला आणि केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा जो भाजपचा राजकीय काळ होता तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा झंझावाती काळ होता. नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे महाराष्ट्र भाजपला आभाळही ठेंगणे पडू लागले आणि यातूनच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत शिवसेना भागीदार असू नये आणि भाजपची स्वबळावर सत्ता यावी या हेतूनेच या निवडणुकीत शिवसेनेसारख्या परंपरागत हिंदुत्ववादी मित्र पक्षाशी असलेली युती राज्यातील भाजप नेत्यांनी संपुष्टात आणली. महाराष्ट्रात शिवसेनेशी तोडलेली युती ही प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची झालेली पहिली मोठी चूक होती. कारण निवडणुकीपूर्वी तोडलेली युती निवडणुकीनंतर पुन्हा त्यांना शिवसेने बरोबरच करावी लागली. वास्तविक त्यावेळी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून न घेता देखील राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार चालू शकले असते. मात्र भाजप नेतृत्वाचा शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वास नसल्यामुळे राष्ट्रवादीने दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेतल्यानंतरही भाजपला शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागले. यामध्ये भाजपचा ज्याप्रमाणे शरद पवार यांच्यावर विश्वास नव्हता त्याचप्रमाणे उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जोडीला शिवसेना गेली तर महाराष्ट्रातील भाजपचं अल्पमतातील सरकार कोसळेल याची पूर्ण जाणीव आणि भान तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना होते आणि त्यामुळेच जसं महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले त्यानंतर 18 व्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला राज्याच्या मंत्रिमंडळात आणि सत्तेत सामावून घेतले.
त्यानंतरचा अर्थात 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा काळ हा देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशा दोघांचाच होता. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कठोर आणि सक्षम प्रधानमंत्री असताना आणि देशभर भाजपची प्रचंड लाट असताना महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवण्याची नामी संधी फडणवीस यांच्यासमोर चालून आली होती आणि त्याचा पुरेपूर वापर फडणवीसांनी या दोन्ही पक्षांना संपवण्यासाठी केला. राधाकृष्ण विखे पाटील तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर होतेच, त्याचबरोबर ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते. मात्र फडणवीसांच्या सत्तेचा करिश्मा एवढा जोरात त्याकाळी होता की त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यालाच काँग्रेसमधून फोडून भाजपात आणले. केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीमधील परंपरागत मोठ-मोठी पवारनिष्ठ घराणी देखील फडणवीसांनी भाजपच्या तंबूत डेरेदाखल करायला लावली. एकीकडे फडणवीस भाजपचे वर्षानुवर्ष परंपरागत राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला खालसा करत असतानाच दुसरीकडे राज्यात शिवसेनेचा जोर वाढणार नाही याकडेही कटाक्षाने बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेत तर सहभागी करून घ्यायचे मात्र सत्तेचे लाभ सेनेला मिळू द्यायचे नाहीत या नीतिचा फडणवीसांनी पुरेपूर वापर केला. मात्र त्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत सुमधुर राहिले हे विशेष. ते इतके घनिष्ट आणि सुमधुर होते की शिवसेनेच्या एका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. शिवसेनेचे संभाव्य मंत्री, शिवसेनेची तिकिटे यामध्ये देखील उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांचा शब्द त्या काळात प्रमाण मानत असत.
थोडक्यात सांगायचे झाले तर देवेंद्र फडणवीस यांची त्या काळात केवळ भाजपमध्ये चलती होती असे नाही तर शिवसेनेतही त्यांची चलती असायची. साहजिकच त्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा होती. इतका मजबूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी पहिल्यांदाच बघितला होता. साहजिकच गिरीश महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस यांना देवत्व बहाल केले होते. महाराष्ट्रात भाजपा मजबूत करण्याची आणि स्वतःचे मुख्यमंत्रिपद आणखीन पुढची पाच वर्षे टीकवण्याची हीच नामी संधी आहे हे जर धूर्त, चाणाक्ष आणि मुत्सद्दी देवेंद्र फडणवीसांनी ओळखले नसते तरच नवल होते. मात्र हे करत असताना त्यांना स्वपक्षतील प्रस्थापित नेत्यांची नाराजी अंगावर ओढून घ्यावी लागली. मग ते विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे असतील अथवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे असतील. मुख्यमंत्री पदाकडे आशेने बघणार्या प्रत्येक भाजप नेत्याचे खच्चीकरण कसे करता येईल याचाच प्रयत्न देशात आणि महाराष्ट्रात भाजपा अत्यंत मजबूत स्थितीत असताना केला गेला. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळेच ते महाराष्ट्राचे पुढे मुख्यमंत्री होऊ शकले त्याचं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला अर्थात पंकजा मुंडे यांना देखील त्रास देण्याचे उद्योग देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असतानाच झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरी यांच्या समर्थकांनाही डावलण्यात आले. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये कोणीही आपल्या बरोबरीने स्पर्धक म्हणून उभा राहू नये याची पुरेपूर दक्षता फडणवीस यांनी त्याकाळात घेतली. मात्र हीच दक्षता त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे उलटली आहे. सत्तेच्या काळात ज्या ज्या राजकीय विरोधकांना संपवण्याचे आणि दाबण्याचे काम केले ते त्यांचे सर्व राजकीय विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आले असून हेच सर्व विरोधक फडणवीसांना चक्रव्यूहामध्ये घेरत आहेत. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यापेक्षा मातोश्रीमध्ये बसून राज्याचा जमेल तसा कारभार चालवणारे उद्धव ठाकरे केव्हाही परवडले या भूमिकेपर्यंत आता राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आले आहेत. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे किमान अन्य राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत नाहीत हीच उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दोन वर्षांच्या राजकारणातली सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे दिल्लीतील पक्षनेतृत्वाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघण्याची बदललेली दृष्टी हीदेखील दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळेच ठाकरे सरकारचा दोन वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडतानाच राज्यातील 106 भाजपा आमदारांचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कामगिरीचा लेखाजोखा मांडायला गेल्यास त्यामध्ये राज्यातील सत्तेअभावी फडणवीस यांची राजकीय ताकद ही दिवसेंदिवस क्षीण होत जाताना दिसत आहे आणि हाच शरद पवार यांचा पवार पॅटर्न आहे. त्यामुळेच ठाकरे सरकारच्या चक्रव्यूहामध्ये फडणवीस गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे गुरफटले आहेत. यातून ते कधी सहीसलामत बाहेर पडतील याबाबत आजमितीला तरी भाजपातील कोणीही ठामपणे शाश्वती देण्यास तयार नाही.

First Published on: November 29, 2021 5:10 AM
Exit mobile version