…माझी न मी राहिले रे!

…माझी न मी राहिले रे!

साठीच्या मार्गावरची माझी मित्रमंडळी आता रिटायर होण्याच्या दिशेने आपली थकली पावलं टाकू लागली आहेत. परवा असाच माझा एक मित्र रिटायर झाला आणि घरी टीपॉयवर पाय टाकून बसला. रिटायरमेंटनंतरचे त्याचे पहिले काही दिवस बरे गेल्यानंतर नंतर नंतर त्याला अपरिहार्यपणे रितेपणा जाणवू लागला. पठ्ठ्या संगीत वगैरे विषयांत बर्‍यापैकी रस घेणारा असल्यामुळे दिवसांतले दोन-तीन तास संगीत ऐकण्यात घालवू लागला. पण रिटायर झाल्यामुळे येणार्‍या एकाकीपणाचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण पूर्वी त्याला आवडणार्‍या ‘देखा ना हाय रे सोचा ना’ यासारख्या जोशिल्या गाण्यांना त्याने त्याच्या आयुष्यातून कटाप करून टाकलं आणि एकाएकी काळजावरचे भाव डोळ्यांत दाटून आणणारी गाणी त्याला आवडू लागली.

त्याच्यातला हा बदल ठळकपणे जाणवण्यासारखा होता. त्याला हे रितेपण खूपच जाणवतं आहे हे मला सहजपणे जाणवत होतं. मी म्हणूनच त्याला दर दिवशी नित्यनेमाने फोन करण्याचा मित्रधर्म बजावू लागलो. मी ज्या ज्या वेळी हल्ली त्याला फोन करत होतो त्या त्यावेळी एक गोष्ट मला त्याच्याकडून न चुकता आढळून येत होती. ही न चुकता आढळून येणारी गोष्ट होती ती तो फोनवर बोलत असताना मागून त्याच्या घरातून ऐकू येणारं संगीत! त्याला फोन केला की बॅकग्राउंडला मागे कोणतंही एखादं गाणं त्याच्या घरातून कायम दरवळत होतं.

मी त्याला म्हटलं, बरं झालं…तू संगीतात तुझं मन रमवू लागला आहेस!…तो म्हणाला, आजच्याइतका रस मी संगीतात या आधी का घेतला नाही याची खंत मला वाटू लागली आहे!
मी म्हटलं, पण बेटर लेट दॅन नेव्हर…उशिरा का होईना…
तो माझं वाक्य तोडत म्हणाला, पण खूप उशीर केला मी, माणसाच्या आयुष्यात संगीतात रमण्यासारखं दुसरं ठिकाण नाही हे मला खूप उशिरा जाणवलं.
हल्ली हे त्याचं खंतावणारं वाक्य तसं त्याच्या फोनमधून माझ्या कानावर सतत आदळू लागलं आहे.

त्या दिवशी असाच त्याला फोन केला तर मागून ऐकू येणारं गाणं होतं – माझी न मी राहिले रे, तुजला नाथा सर्व वाहिले. ‘मंगळसूत्र’ सिनेमातलं, बाळ पार्टेंचं संगीत असलेलं आणि शांता शेळकेंनी लिहिलेलं ते गाणं मी त्याच्याशी बोलता बोलता ऐकत होतो. बोलता बोलता ऐकत होतो म्हणजे त्याच्या बोलण्याकडे माझं तसं फारसं लक्ष नव्हतंच. माझं सगळं लक्ष त्या गाण्याकडे होतं.

शेवटी न राहवून मी त्याला म्हटलंच, काय गाणं आहे ना रे हे!…नुसतं गाणं नाहीच हे…भावनेचं निव्वळ ओथंबणं आहे. हे गाणं संपेपर्यंत आपण आता काही बोलुयाच नको. फक्त एक काम कर, तुझा फोन तुझ्याकडल्या स्पीकरजवळने म्हणजे मला जरा गाणं आणखी स्पष्टपणे ऐकू येईल.

मित्राला माझं संगीतप्रेम माहीत होतं. त्याने माझं म्हणणं राजीखुशीने मानलं.

गाणं संपलं…आणि मी त्या गाण्याला एखाद्या मैफलीत द्यावा तसा वन्समोअर दिला. त्याने पुन्हा ते गाणं लावलं. आम्ही दोघांनी पुन्हा ते गाणं ऐकलं. यावेळी ते ऐकताना आम्ही एका शब्दाने एकमेकांशी बोललो नाही…आणि गाणं संपलं तेव्हाही काही सेकंद आम्ही एकमेकांशी एक शब्द बोलू शकलो नाही. अगदी नि:शब्द झालो. आजच्या प्रोफेशनल भाषेत सांगायचं तर अ‍ॅब्सोल्युटली स्पीचलेस!

आम्ही दोघं जे गाणं ऐकत होतो ते गाणं होतंच तसं! गाणं अगदी सुरू होतानाच ‘माझी’ या शब्दानंतर घेतलेला आपला श्वास थांबवणारा, काळजाला हात घालणारा लता मंगेशकरांचा तो पॉज…आणि त्यानंतर ‘राहिले रे’ या शब्दांचं उच्चारण करताना घेतलेली ती वेगळ्याच वळणाची, पण लक्ष वेधून घेणारी वळणदार हरकत. कितीही वेळा ऐकली तरी कानामनाची तृप्ती न होणारी. एकदा ऐकल्यावरही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी. ती ऐकताना गाणं आपल्याला कुठल्या तरी वेगळ्याच जगात घेऊन जातं. ते जग या जगापेक्षा कितीतरी वेगळं असतं. गाण्यातली ती सुरांची बहार ऐकताना सर्वांगावर काटा आणणारं, रोम रोम मोहरून टाकणारं, तनामनाला गहिवर आणणारं ते जग या जगात नसतंच.

गाणं संपल्यानंतर मी माझ्या त्या मित्राला म्हटलं, काय वाटलं हे गाणं ऐकून?

तो म्हणाला, खरं सांगू!…जुन्या कपाटातले जुने कपडे काढताना बायकोचा लग्नातला तो जुनापुराणा झालेला शालू हाताला लागावा ना अगदी तसं वाटलं हे गाणं ऐकून…या गाण्याला त्या शालूचा तो दरवळ आहे, तो हवेत विरूनच जाऊ नये असं वाटतं!

मित्र त्या गाण्यात फार रमून, तरंगून गेला होता. त्याचं म्हणणं खरं होतं. ते गाणं तसं त्या काळात लोकांपर्यंत पोहोचलं होतं हे खरं आहे, पण जातिवंत रसिकांपर्यंत जाऊन त्या गाण्याची हद्द तिथेच संपली होती. त्यामुळे आजच्या काळात सर्वांनाच त्या गाण्याची माहिती असणं, सर्वांनी त्या गाण्याची नोंद घेणं तसं दुरापास्त होतं. पण त्यातही एक मेख अशी होती की गाणं ऐकल्यानंतर ऐकणारा त्या गाण्यात गुंतून जात होता.

खरं सांगायचं तर संगीतकार बाळ पार्टेंचं नाव तसं आजच्या पिढीला माहीत असण्याची शक्यता नाही. पण हे इतकं नितांत सुंदर गाणं ऐकल्यानंतर बाळ पार्टे या नावाची नोंद घ्यायला तिने काहीच हरकत नाही.

असो, माझ्या रिटायर मित्राने त्या दिवशी मला एका जुन्या गाण्याचा नजराणा बहाल केला. वर त्या गाण्याबद्दलच्या त्याच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवून मला त्या गाण्याची नवी ओळख मिळवून दिली. तो रिटायर झाला आणि त्याच्याकडून गाण्याबद्दलच्या ज्ञानाचं धन मला मिळू लागलं आहे. गाणं बजावण्याची आवड असणार्‍या माझ्यासारख्याला त्याचे आभार मानावेच लागतील!

First Published on: September 22, 2019 5:38 AM
Exit mobile version