शिक्षणाचे ‘जड’ झाले ओझे

शिक्षणाचे ‘जड’ झाले ओझे

मुलांचे वय आहे साधारण 3 ते 4 वर्ष, पण त्याला साधारण चार पाच इंग्रजीतील कवितांपासून ते A to Z आणि अनेक रंगांची ओळखही असते आणि इतकंच नाही तर चित्रकला येत असते. त्या मुलाला बरंच काही येत असतं. हे बघूनच डोळे विस्फारले जातात. मनात प्रश्न निर्माण होतो की, इतके लहान असताना आपल्याला काय येत होतं. कारण या मुलांना तीन भाषांचं ज्ञान इतक्या लहान वयात असतं, पण ही मुलं ते आत्मसात करतात की त्यांच्यावर शिक्षणाचं ओझंं देण्यात येत आहे हा प्रश्न राहतोच. खरं तर आजकाल मुलांना देण्यात येणार्‍या शिक्षणाकडे पाहता, शिक्षणाचे ‘जड’ झाले ओझे अशीच परिस्थिती आहे. केवळ दप्तराचेच नाही तर मुलांच्या डोक्यावरही शिक्षणाचे ओझे झाले आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. अनेक ठिकाणी शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून अनेक विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या बातम्या येत असतात. त्यावेळी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीच करत नाही. कितीही काही म्हटलं तरीही मुलांना पुन्हा एकदा त्याच शिक्षणाच्या ओझ्याला जुंपून आपणही तीच हातगाडी ओढत असल्याचे कितीतरी जणांच्या लक्षात येईल. यावर फक्त चर्चा केल्या जातात, पण यावर कोणत्याही प्रकारचे तोडगे मात्र काढण्यात येत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे. जागतिक स्पर्धेच्या नावाखाली मुलांचं बालपण आपण हरवत चाललो आहोत हेच कित्येक पालकांना कळत नाहीये.

अगदी नर्सरीपासूनच आयसीएससी, सीबीएससी, आयजी या शाळांमधील अभ्यास हा साधारण आपल्या काळातील पाचवी ते सहावीचा अभ्यास असावा इतपत असतो. आता पालकही यामध्ये लक्ष घालत नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण द्यायच्या हव्यासापोटी आपणच आपल्या मुलांवर शिक्षणाचे ओझे लादत चाललो आहोत हे आपण विसरतो आणि त्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी अगदीच केविलवाणे होऊन हे शिक्षण घेत असतात. त्यातून त्यांना किती फायदा होतो आहे अथवा होत नाही हे पाहणंदेखील बर्‍याच पालकांना महत्त्वाचे वाटत नाही. केवळ अन्य विद्यार्थी या शाळांमध्ये जात आहेत त्यामुळे आपलं मूलही अशाच शाळांमध्ये जायला हवं हा अट्टाहास मुलांच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही.

अशा शाळांमध्ये देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाचा विचार करायचा झाल्यास, या अभ्यासक्रमांबाबत कोणतीही स्पष्टता बर्‍याचदा नसते. त्यामुळे मोठी फी आकारणे आणि मोठा अभ्यासक्रम असणे हेच खरे शिक्षण असेच सध्या समीकरण झाले आहे, पण या शिक्षणातून त्या विद्यार्थ्यांना जगण्यासाठी आणि पुढे आयुष्यात किती फायदा होणार आहे याची स्पष्टता ना पालकांना आहे ना विद्यार्थ्यांना. या सगळ्यातून सर्वात जास्त तोटा होत आहे तो मुलांचा. कारण त्यांना व्यक्त होण्याची आणि या शिक्षणाच्या ओझ्याखाली त्यांच्या नक्की आवडीनिवडी काय आहेत याकडे पालक दुर्लक्ष करत आहेत. केवळ अभ्यास करायला हवा आणि सर्व काही यायलाच हवं या सगळ्यात मुलांची मने भरडली जात आहेत हे नक्की. अशी परिस्थिती असताना आपण जन्म दिलेल्या मुलाला आपणच या शिक्षणाच्या ओझ्याच्या गर्तेत ढकलत असल्याचे बर्‍याचशा पालकांच्या लक्षातही येत नाही. आपल्याला इंग्रजी भाषा अथवा कोणतेही विषय येऊ देत अथवा न येऊ देत, पण आपल्या मुलाला मात्र त्यामध्ये उत्तम गुण असायला हवेतच ही पालकांची अपेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे ओझे अधिक जड करते. मुलांना हव्या असणार्‍या संधी आणि आवडी यामुळे आपण सगळेच त्यांच्याकडून हिरावत आहोत.

केवळ दप्तराचे ओझे कमी करून चालत नसते तर प्रत्येक वयानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला मिळायला हवं. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाचे हे ओझे कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना एका कोणत्याही चौकटीत बांधून ठेवता कामा नये. त्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअरच व्हायला हवे हा पालकांचा हट्ट असू नये. मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्यवस्थित होतोय की नाही हे पाहायला हवे. पुस्तकांचे ओझे कमी केले असले तरीही त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणाचेदेखील ओझे होत आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी अधिक रस घ्यावा, त्यांना आयुष्याला उपयोगी पडणार्‍या गोष्टींचे शिक्षण मिळावे आणि त्यानुसार देशाचा विकास करण्यासाठी पुढची पिढी घडावी असा दृष्टीकोन शिक्षणाचा असेल तर पुढची पिढी अधिक चांगली घडेल, पण अमेरिकन अथवा अन्य देशांच्या लेखकांनी आणि शिक्षकांची पुस्तकं आपण आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासाला दिल्यानंतर त्याचा अभ्यास इथे कितपत लागू पडत आहे हे पाहणं महत्त्वाचे वाटत नाही का? कितीतरी मुलं हे शिक्षण घेऊन परदेशात निघून जातात मग त्या शिक्षणाचा भारताला काय उपयोग आहे? असेही प्रश्न उपस्थित होतात.

पालकांनी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या मनानुसार अर्थात आवडीनुसार शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. पालक आपल्या मनाच्या अपेक्षा आपल्या मुलांवर लादतात, पण त्या मुलांना हे शिक्षण झेपणार आहे की नाही अथवा हे शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे की नाही हे एका वयात आल्यानंतर विचारण्यातही येत नाही. एका ठराविक वेळेनंतर मुलांची गुणवत्ता ओळखता येते. त्यामुळे मुलाची गुणवत्ता ओळखून त्यानंतरच शिक्षण द्यायला हवे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे शिक्षणाचे ओझे लादू नये. ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे आई – वडिलांची.

कोणीही कितीही नाही म्हटलं तरीही सध्याच्या शिक्षणाचे ‘जड’ झाले ओझे अशीच स्थिती आहे हे नक्की. पारंपरिक आणि आधुनिक याचा मेळ घालून शिक्षण देण्याची आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, कौशल्यात आणि बुद्धिमत्तेमध्ये भर घालण्याची गरज आहे, पण विद्यार्थ्यांना जर शिक्षण ओझे वाटू लागले तर अशी परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही. त्यामुळे त्यासाठी लवकरात लवकर अभ्यासाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची आणि पुनर्विचार करण्याची गरज वाटते आहे.

विद्यार्थ्यांच्या मेंदूला अवजड होईल असे नाही तर मूल्याचा योग्य विचार होईल आणि विद्यार्थी अगदी मनापासून आनंद घेऊन शिक्षण घेऊ शकला तर त्या शिक्षणाचा खर्‍या अर्थाने गवगवा होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे शिक्षणाच्या या जड ओझ्याखालून विद्यार्थ्यांना बाहेर काढून एक मोकळा श्वास त्यांना देण्यासाठी पालक आणि शिक्षक दोघांनीही प्रयत्न करायला हवा. शालेय शिक्षण अथवा अभ्यासक्रमात बदल ही शासनाचीच जबाबदारी आहे, पण कोणतं शिक्षण आपल्या मुलाला घ्यायला आवडेल हे तर आपल्याला नक्कीच कळू शकतं. त्यामुळे शिक्षणाचे हे जड झालेले ओझे हलके करणे हे नक्कीच पालकांच्या हातात आहे.

First Published on: February 17, 2020 5:35 AM
Exit mobile version