टिक टॉक नको,मग…भारी अ‍ॅप्स बनवा

टिक टॉक नको,मग…भारी अ‍ॅप्स बनवा

चीनच्या सैनिकांनी गलवान खोर्‍यात भारतीय जवानांवर हल्ला केला आणि त्यात आपले 20 जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध म्हणून सर्व भारतीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम राबवली. सोशल मीडियावर यासंबंधीचे संदेश पसरवण्यात आले आणि याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाददेखील मिळाला. यासोबतच चीननं मोबाईलमध्ये वापरात असलेले सोशल मीडियाचे जे अ‍ॅप्स तयार केले होते, ज्याचे भारतीय वापरकर्ते जवळपास 60 टक्के होते, (मोबाईल वापरणारे यांच्या प्रमाणात) त्या सर्व अ‍ॅप्सवरसुद्धा बंदी घालावी, अशी मागणी भारतीयांकडून जोर धरू लागली. या सर्वांचा परिणाम असा झाला की, मागच्याच आठवड्यात जवळपास 59 चायनीज अ‍ॅपवर भारत सरकारनं बंदी घातली. आणि सर्व भारतीयांना एक संदेश दिला की आपण सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर झाले पाहिजे. आणि ज्या कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्याच प्रकारचे अ‍ॅप भारतीय इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांनी एकूणच युवकांनी तयार करावेत. यासाठी भारत सरकार तुमच्यासोबत आहे असेही सांगितले. या सर्वांचा परिणाम असा झाला की सर्व वापरकर्त्यांनी हे सर्व सोशल मीडियाचे अ‍ॅप्स आपल्या मोबाईलमधून डिसेबल/अनइन्स्टॉल केले. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. ही झाली एक बाजू पण याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे ज्याची चर्चा होणं अतिशय महत्त्वाचं आहे.

यासंदर्भात मी काही माझ्या मित्रांशी बोललो त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर त्यांचं मत काय आहे हेसुद्धा इथं देत आहे. एका मित्राला फोन करुन विचारलं की, काल आपल्या सरकारनं काही चायनीज अ‍ॅपवर बंदी घातली यावर तुझं काय मत आहे. त्यावर तो म्हणाला, ‘अरे विचारुच नको.. कारण बर्‍यापैकी डिस्टर्ब झालोय.. त्याचं कारण असं की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनामुळं लॉकडाऊनचा काळ अनुभवत आहे. घरात राहावं तर पाहिजे तेवढी प्रायव्हसी मिळत नाही. आणि बाहेर पडावं तर आपल्या आरोग्याची भीती.. म्हणून आपल्या गॅलरीत किंवा छतावर काही टिकटॉकचे व्हिडिओ तयार करणे आणि अपलोड करणे.. यात मजा यायची, वेळ पण जायचा आणि मनोरंजन व्हायचं.. आतापर्यंत माझे जवळपास तीन हजार फॉलोअर्स आणि लाईक्स पण बर्‍यापैकी वाढत होत्या… आयडी डेव्हलप होऊन यातून पैसे मिळाले असते.. पण आता काही फायदा नाही हे सर्व बंद झालं.., बघू आता नवीन एखादं भारतीय अ‍ॅप येतं का.. असंही चायना माल जास्त दिवस टिकत नाही.. एका अर्थाने बरंच झालं बंदी आली ते..’

त्याचं हे मत लक्षात घेण्यासारखं आहे. यात त्याच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. पहिली गोष्ट म्हणजे तो फक्त लाईक, कमेंट आणि फॉलोअर्स इथेच थांबणार नव्हता. तर तो त्यातून स्वतः पैसे कसे मिळवता येतील यासाठी प्रयत्न करत होता. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे त्याने या निर्णयाचं स्वागत पण केलं. ते म्हणतात ना आपला फायदा कितीही होत असला तरी देशप्रेम प्रथम असते. असे अनेक युवक आहेत ज्यांनी टिकटॉक, गुगल प्ले, शेअर-इट या आणि इतर सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर करून स्वतःची आर्थिक बाजू भक्कम केली. सुरुवातीला स्वतःची कला सादर करण्यात आणि झटपट प्रसिद्धी मिळवण्यात व्यस्त असलेले वापरकर्ते सोशल मीडिया अ‍ॅपकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत हे नाकारता येणार नाही. पण आपली प्रायव्हसी आणि देशाचासुद्धा आपल्याला अभिमान असायलाच हवा. ही आहे या सोशल मीडिया अ‍ॅपची अत्यंत महत्वाची बाजू.

भारतच नाही तर जगभरात टिकटॉक हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. भारतात ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्याप्रमाणात जवळपास 60 टक्के लोकांच्या मोबाईलमध्ये टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपचा समावेश होता. गुगल प्ले स्टोअरमधील पहिल्या दहा अ‍ॅप्समध्ये त्याचा समावेश होता. भारतात 14 भाषांमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध होते. टिकटॉकवर यापूर्वीसुद्धा पॉर्नोग्राफी आणि इतर अश्लील चित्रफिती तथा लोकांची प्रायव्हसी या कारणावरून काहीकाळ बंदी घालण्यात आली होती. पण ती कायमस्वरूपी नव्हती. आता मात्र भारत सरकारने या सर्वच गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी तर केलंच पण अनेक बुद्धिवादी लोकांनीसुद्धा याचं समर्थन केलं आहे. याचे कारणसुद्धा तसेच आहे. इंटरनेट वापर हा आपला मूलभूत अधिकार झाला आणि प्ले-स्टोअरवर जे कोणतेही सोशल मीडियाचे अ‍ॅप आहेत त्या सर्वांचा डाऊनलोडमध्ये सर्रास वापर होत गेला. त्याची ना आपण प्रायव्हसी तपासली ना आपल्या डेटाची खात्री करून घेतली. जो ट्रेंड चालतोय त्या ट्रेंडच्या पाठीमागे धावता-धावता आपलं आयुष्य मागे पडत आहे याचा विसर युवकांना पडला. (मोजकेच अपवाद वगळता) एक प्रकारे या मायाजाळात आपण पुरते अडकत चाललो आहोत का..? हे माहिती करून घेण्याइतपत वेळ मिळत नव्हता.

यातून काही लोकांना हजारो लाखो रुपये मिळाले हे जरी खरं असलं तरी ज्यांना काहीच मिळत नाही त्यांचं मात्र वेळेच नुकसान झालं हेही तितकच खरं… एखाद्या साधनाच्या आहारी गेल्यानंतर आपलं सर्वस्वी नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. पण काही प्रमाणात आता हा धोका टळला आहे असे म्हणायला हरकत नाही. टिकटॉक, शेअर-इट, यूसी ब्राउजर, हॅलो, लाईकी, क्लब फॅक्टरी, न्यूज डॉग, वीगो व्हिडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ, व्हीमेट, मी व्हिडिओ कॉल, ब्युटी प्लस, मी कम्युनिटी, व्हिचाट, बिगो लाईव्ह या लोकप्रिय आणि इतर बंदी घातलेल्या सोशल मीडिया अ‍ॅपच्या अर्थकारणाचा विचार केला असता असे दिसून येते की, कोट्यवधी रुपयाचा फायदा त्या-त्या कंपनीला होतो आणि लाईक्स कमेंट शेअर, सबस्क्राईबर आणि फॉलोअर्सनुसार वापरकर्ता जो आहे त्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते.(वेळेचा सदुपयोग की, दुरुपयोग हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून.)म्हणजेच पूर्णवेळ व्यवसाय नसला तरी मिळालेल्या उत्पन्नाचा दरडोई उत्पन्नात समावेश होत असतो. सोबतच प्रत्येक अ‍ॅप प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येत असले. तरी वापर करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होत असतो. एकूणच सोशल मीडियाच्या सर्वच अ‍ॅपच्या पाठीमागे मोठे अर्थकारण दडलेले आहे. याची आकडेवारी मार्केटिंग चार्ट आणि स्टॅटिस्टिकल सर्वे यांच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध आहे.

भारत सरकारने बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्याचे बारकावे सांगितले, एवढेच नाही तर हा मुद्दा राष्ट्रवादाशी जोडला गेला. ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारे असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे.असे सरकारने सांगितलं आहे. आणि आता आपण या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे असा सूर निघू लागला. हे खरेसुद्धा आहे. कारण अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर नाकारल्यानंतर विजय भटकर यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता वापरून भारतीय बनावटीचा सुपर कॉम्प्युटर तयार केला होता. हीच प्रेरणा घेऊन विविध अ‍ॅप्स निर्मितीच्या क्षेत्रातसुद्धा आपण आता वेगळी ओळख निर्माण करायला हवी. तसे पाहता चिंगारी, मित्रों, बोलो इंडिया, रोपोसो व शेअर चॅट यासारखे भारतीय अ‍ॅप्स सध्या सोशल मीडिया विश्वात आहेत. पण त्यांची लोकप्रियता पाहिजे तेवढी नाही. कारण या अ‍ॅप्सला आपण पर्याय म्हणून पाहिले. आणि वापर करत असताना त्यात काही कमतरता असल्यामुळे इतर अ‍ॅप्सचा वापर जास्त प्रमाणात होत गेला. सहाजिकच भारतीय अ‍ॅपची मागणी घटली. इथे मूळ मुद्दा हाच आहे की, वेगवेगळ्या अ‍ॅप डेव्हलप करणार्‍या कंपन्यांनी आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुखकर आणि प्रगतीशील बनवायची असेल तर आपल्यातल्या उणिवा दूर करून नव तंत्रज्ञानाचा वापर करून असे अ‍ॅप्स तयार करावेत. यामुळे ग्राहकहित जोपासले जाईल. सोबतच या क्षेत्रातसुद्धा ‘हम भी किसी से कम नहीं’ हे दाखवून देता येईल.

वर उल्लेख केला त्याप्रमाणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. या आव्हानात आपली भारतीय ओळख आणि हित महत्त्वाचे आहे. कारण सोशल मीडिया वापरत असताना आपला जो वायफळ वेळ जातो, तो वेळ न जाता वापरकर्त्याच्या हिताचे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेऊन भारतीय बनावटीचे अ‍ॅप तयार करावे लागणार आहेत. अन्यथा त्यातून काहीही साध्य झाले नाही व फक्त मनोरंजन हाच भाग असेल तर पुन्हा सरकारला या अ‍ॅपवर बंदी आणावी लागेल. कारण प्रत्येक पिढी आपल्या संस्कृतीची वाहक असते. चांगले स्वीकारून वाईटाचा नाश झाला पाहिजे हे शिकवणारी असते. किंबहुना, त्या त्या वेळी आपल्यावर सामाजिक संस्कार होत असतात. पण ऑनलाईन राहून वेगवेगळ्या सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे आपण आपलंच स्वतःचं विश्व निर्माण करणार्‍या पिढीला अधोगतीकडे घेऊन जाईल. ही भीती समाजशास्त्रज्ञ वर्तवत आहेत. नेमकी ही भीती खरी ठरायची नसेल तर नवीन शोध लावला पाहिजे. पण त्यात अश्लीलता वैयक्तिक स्वार्थ नसावा. समाजहिताचं नवं काही असेल तर नक्कीच फायद्याचं असेल आणि ते स्वीकारलं जाईल. तसे पाहता वैयक्तिक मनोरंजनावर बंधन लादता येत नाहीत. फक्त इतरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून काही प्रमाणात चौकट ठरवलेली असते. नेमका तोच अभ्यास करून आजच्या सोशल मीडिया वापराला तरुणांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता लक्षात येते की, एखाद्या वस्तूला जर पर्याय उपलब्ध असेल, आणि ती वस्तू वापरताना तेवढ्याच प्रमाणात फायदा होत असेल तर लोक कधीही पर्याय निवडत असतात. मला वाटतं जर आपण चायनीज अ‍ॅपला योग्य पर्याय म्हणून भारतीय अ‍ॅप्सवर विश्वास ठेवला आणि कंपन्यांनी त्याच प्रमाणात चांगली सेवा दिली, तर वापरकर्ते वाढतील शिवाय परदेशी कंपन्यांना मिळणारा कोट्यावधीचा नफा भारतीय कंपन्यांना मिळेल. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. काही प्रमाणात रोजगार प्राप्त होईल. याचाही विचार पर्याय निवडताना करता येऊ शकतो. ५ जुलै रोजी एलिमेंट्स हे भारतीय सोशल मीडिया अ‍ॅप लॉन्च झाले आहे. ज्याचा वापर अधिक सुटसुटीत आणि फायद्याचा आहे असे तज्ञांचे मत आहे. अशाच प्रकारचे इतर भारतीय सोशल मीडिया अ‍ॅप तयार करण्यात आले तर एक मोठी क्रांती होऊ शकते. भारत स्वातंत्र्यापूर्वीपूर्वी तसेच स्वातंत्र्याच्या काही वर्षानंतरदेखील महत्त्वाच्या वस्तू आयात करत होता. पण नवतंत्रज्ञानाचा वापर करून भारताने आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे केली आहे. जागतिकीकरणानंतरची समीकरणं बदलली आहेत. जागतिक बाजारपेठेत टिकून राहात असताना काही नियम पाळून आयात निर्यात करावी लागते.

भारत जवळपास सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व भारतीयांना आत्मनिर्भर व्हा…! असा संदेश दिला आहे. खरे तर हे मोठे आव्हान आहे, पण ते पेलावे लागणार. आणि यातून सोशल मीडिया तरी कसा सुटेल. ज्याप्रमाणे चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याचप्रमाणे नवीन अ‍ॅपची मागणी सध्या वाढत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील युवकांसाठी हीच मोठी संधी आहे. प्रत्येक वेळी आपण इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. सरकारनेसुद्धा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला हवे. भारतीयांना भारतीयांचे सोशल मीडिया अ‍ॅप तयार करण्यास मदत केली तर नक्कीच बदल होईल. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या असे झाले तर जैसे थे परिस्थिती असेल. असे होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सकारात्मक विचार करूयात कारण तंत्रज्ञानाच्या या युगात रोज नवीन बदल होत असतात या बदलाला एक वेगळी वाट मिळेल, आणि आपण यशस्वी होऊ. यानिमित्ताने हाच आशावाद…!

-धम्मपाल जाधव

First Published on: July 12, 2020 5:34 AM
Exit mobile version