सूडबुद्धी की भेदबुद्धी?

सूडबुद्धी की भेदबुद्धी?

संपादकीय

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीमार्फत चौकशी झाली. एक केंद्रातील तर दुसरे राज्यातील बडे नेते. त्यामुळे चौकशी आणि अटकेची चर्चा तर होणारच यात शंका नाही. पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील सहभाग आणि राज ठाकरे यांचे शेअर असलेल्या कोहिनूर मिलचा संशयास्पद खरेदी व्यवहार ही या अटक आणि चौकशीमागील कारणे होती. सीबीआय आणि ईडी या स्वतंत्र तपास संस्था असल्या तरी आतापर्यंत त्यांचा होत असलेला राजकीय वापर काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे चिदंबरम आणि राज ठाकरे यांच्याबाबत सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा केंद्रातील भाजप सरकारने वापर केला, असा आरोप सहाजिकच आहे. मात्र, हे आरोप करणारे एक गोष्ट मात्र सोयीस्कररित्या विसरले आहेत. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनीही अशाचप्रकारे सीबीआय आणि ईडीचा गैरवापर केला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची सीबीआयने चौकशी केली होती, तर गुजरातचे गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांना अटक केली होती. त्यावेळी भाजपविरोधक सीबीआय महान कार्य करत असल्याच्या अविर्भावात मोदी आणि शहा यांनाच दुषणे दिली जात होती. बरं मोदी आणि शहा यांच्यावरील आरोप खरे ठरले का? कोर्टाने या दोन्ही नेत्यांची निर्दोष सुटका केली. त्यावेळी तर कोर्टही आरोपाच्या पिंजर्‍यात उभे करण्यापर्यंत विरोधक आणि कथित पुरोगाम्यांची मजल गेली होती. आजही मोदी आणि शहा यांच्यावरील सीबीआयच्या कारवाईला ते योग्य समजतात आणि मोदी व शहा यांनी घोटाळा करून सीबीआयच्या ताब्यातून आपली सुटका करून घेतली आहे असे म्हणतात, पण देशाची जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. या कथित बुद्धीमंतांना त्यांची जागा दाखवत त्यांनी मोदी, शहा यांच्या भाजपला सलग दोन टर्म प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. आपण करत असलेले कांगावे, खोटे दावे मोदी-शहा यांना सत्तेपासून पायउतार करण्यासाठी योग्य ठरणार नाहीत, याची कल्पनाही विरोधी पक्ष आणि कथित पुरोगाम्यांना आलेली नाही. त्यामुळेच त्याच-त्याच कटकारस्थानात त्यांनी आपल्याला गुंतवून घेतले आहे आणि अविरतपणे तोंडघशी पडण्याच्या त्यांच्या कार्यक्रमात जराही खंड पडलेला नाही. सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर पुन्हा त्याचा प्रत्यय आलेला आहे. चिदंबरम यांच्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सुडाने कारवाई केली आहे, अशी दवंडी पिटण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. म्हणजे आजचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभलेली ही सुडाची कारवाई आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे, पण हे दोघे नेते कशासाठी ही सुडाची कारवाई करीत आहेत? चिदंबरम यांनी मोदी-शहांचे असे काय नुकसान केले आहे? चिदंबरम यांनी मोदी-शहांचे काहीतरी नुकसान केल्याशिवाय ते सुडबुद्धीने कारवाई कशी करू शकणार? तसेच चिदंबरम यांनी मोदी-शहांचे व्यक्तिगत स्वरूपाचे काही नुकसान केलेले असायला हवे. त्याची भरपाई म्हणून त्या दोघांनी ह्या उचापती करायला हव्यात. चिदंबरम व त्यांच्या समर्थकांवर विश्वास ठेवायचा, तर ते भाजप किंवा मोदींवर कठोर टीका करतात, म्हणूनच त्यांच्यावर कारवाईचा सूड घेतला जातो आहे. ठीक आहे, पण मग मोदी-शहा यांना गुंड, रक्तपिपासू, चोर अशी विश्लेषण वजा शिवीगाळ करणार्‍यांवर मोदी, शहा यांनी का कारवाई केली नाही?
चिदंबरम हे काही साधूसंत नाहीत. युपीएच्या काळातील अनेक आर्थिक घोटाळ्यांत मनमोहन सिंग वा अन्य मंत्र्यांवर चिखलफेक झाली, पण त्या घोटाळ्याच्या गप्पा चालल्या असताना चिदंबरम यांचे नाव कुठेही आलेले नव्हते. आता त्यांच्या पापाला वाचा फुटलेली आहे. प्रथम त्यांचे सुपुत्र गाळात अडकले आहेत, पण पित्याच्या अर्थमंत्री असण्याचा लाभ उठवित आपल्या परदेशी खात्याची तुंबडी भरून घेणारा कार्ति चिदंबरम हा छोटा मासा होता. मोठा मासा गळाला लावण्यासाठी आधी छोटा मासा गळाला लावला जातो, तसा कार्ति हा छोटा मासा आहे. तो कागदोपत्री फसला, मग त्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशाचा हिशोब देताना मोठा मासा म्हणून चिदंबरम अडकले आहेत. मोदी सरकारला शहाणपणा शिकवणार्‍या चिदंबरमना त्याची पूर्ण खात्री आहे. म्हणूनच हे गृहस्थ चौकशीला बोलावूनही हजर होत नव्हते. आपल्याला जिथल्या तिथे अटक होऊ शकते, याची किती खात्री असावी ना? म्हणून त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला होता. खरे तर नुसती हजेरी लावूनही विषय संपला असता, पण विषय हजेरी लावून वा खुलासा करून संपणारा नाही, हे चिदंबरम ओळखून होते. ते एकच टुमणे लावून बसले होते. आपल्याविषयीचे सर्व कागदोपत्री पुरावे ईडीकडे उपलब्ध आहेत, मग चौकशीसाठी आपल्याला बोलावतातच कशाला? तोच त्यांच्या सुपुत्राचा बचाव होता, पण तो टिकला नाही. चौकशीला हजेरी लावण्यात टाळाटाळ झाल्यावर कोर्टात त्यानेही धाव घेतली होती, पण अखेरीस त्यालाही गजाआड जावे लागले आणि आता पित्याला पुत्राच्या पावलावर पाऊल टाकून कोठडीत जावे लागले आहे. कारण काँग्रेसच्या सत्तेवरचा सूर्य कधीच मावळत नाही म्हणून कितीही उचापती कराव्यात, कोणीही आपल्याला पकडणार नाही, असा आत्मविश्वास होता ना?
चिदंबरम हा बहुधा देशातला पहिला अर्थमंत्री असावा, ज्याला अटकेच्या भयाने कोर्टात धाव घ्यावी लागली वा अटकपूर्व जामीन मिळवावा लागला. सहा महिने अटकपूर्व जामिनावर ते होते आणि अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर ते चक्क फरार झाले. खर्‍याची बाजू असती, तर त्यांना इतके भयभीत होण्याची काहीही गरज नव्हती. विविध गुंतवणुकी व त्यातल्या आर्थिक घोटाळ्यांना चिदंबरम यांनी वाकडीतिकडी वळणे घेऊन झाकलेले होते. त्याचा तपास कधीही लागला नसता, पण मुलीच्या खुनात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपल्या एका चौकशीत चिदंबरम व त्यांच्या पुत्राचे पितळ उघडे पाडले. आपल्या आर्थिक गैरव्यवहाराला नियमित करून घेण्यासाठी अर्थमंत्री चिदंबरम यांची भेट घेतली व त्यांनीच पुत्र कार्तिच्या कंपनीकडे पाठवले. त्याने सगळ्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्यासाठी काही कोटी रुपयांची लाच मागितली. ती परदेशी खात्यातून वळती केल्यावर पित्याने अर्थमंत्रीपदाचा वापर करून इंद्राणीच्या घोटाळ्याला नियमित केले. त्याविरुद्ध अधिकार्‍यांचे शेरे असतानाही व्यवहाराला नियमित केले. त्यातून विविध कंपन्यांचे शेअर्स कार्तिच्या मित्रांच्या नावे घेण्यात आले आणि ते शेअर्स त्या मित्रांनी नंतर कोवळ्या वयात मृत्यूपत्र करून चिदंबरमच्या नातीला देऊन टाकले. मोठ्या दुर्गम घाटातल्या रस्त्यापेक्षाही चमत्कारीक वेडीवाकडी वळणे आहेत ना? अशा व्यवहारात चिदंबरम नामानिराळे रहायला गेले, पण कार्ट्याने त्यांना पुरते गुरफटून टाकलेले आणि आता तपास यंत्रणांच्या सापळ्यात ते अडकले. ते भ्रष्टाचार घोटाळा करून सीबीआयच्या जाळ्यात अडकलेे असल्याचे माहीत असूनही त्यांच्या मदतीला जाणार्‍यांना शहाणे कसे म्हणायचे? उलट त्यांच्या मदतीला जाणारे हे त्याच जाळ्यात गुरफटून जनतेच्या नजरेेतून उतरणार हे निश्चित आहे. आता राहिला प्रश्न राज ठाकरे यांचा. त्यांनी मोदी-शहा यांच्याविरोधात आघाडी उघडल्याबरोबर ते पुरोगाम्यांचे हिरो झालेले आहेत. त्यापूर्वी ते जातीयवादी, प्रांतवादी आणि संकुचित मनोवृत्तीचे होते. असो. त्यांच्यावर टीका करणार्‍या अंजली दमानिया ज्या कधी याच पुरोगाम्यांच्या रणरागिणी होत्या, आज पुरोगाम्यांच्याच टीकेच्या धनी झालेल्या आहेत. कोहिनूर मिल खरेदीत राज ठाकरे हे भागीदार होते, त्यामुळे त्यांच्याकडून व्यवहाराची माहिती करून घ्यायला ईडीने त्यांची चौकशी केली आहे. राज ठाकरे हे निर्दोष असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई होणार नाही, पण येथेही अनेकांना सुडबुद्धी वाटतेय. असो! आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आपलेच अस्तित्व संपवायला निघालेल्यांना कोण काय करणार? ही भेदबुद्धी त्यांचे अस्तित्व खरंच टिकू देणार आहे का?

First Published on: August 24, 2019 5:25 AM
Exit mobile version