सोन्याचे मोहजाल

सोन्याचे मोहजाल

(फोटो प्रातिनिधिक आहे)

एखाद्या लग्न समारंभाला गेल्यावर नववधूच्या अंगावर किती तोळे सोने आहे, त्यातलं माहेरच्यांनी किती घातलं, सासरच्यांनी किती घातलं याचा अंदाज नजरेनेच मांडणारे निष्णात लोक तिथे जमलेले असतात. आसेतुहिमाचल लग्नात सोन्याचं महत्त्व नववधुवरांपेक्षा अधिक असतं. सोन्यावरून लग्न मोडतात आणि सोनं दिलं जातंय म्हणून विजोड विवाह उरकलेही जातात. उच्च शिक्षित, उच्च प्रतिष्ठित स्थळांसाठी सोनं मोजण्याची पद्धत समाजाच्या अंगवळणी पडली आहे. या सोन्याने नाते जुळून येते तेच मुळात भेगाळलेले असते असा विचार क्वचितच कुणाला शिवत असेल.

मागच्या स्तंभातील लेखात मंगळसूत्राभोवती गरगरणार्‍या स्त्रियांचा उल्लेख केला होता. पण केवळ मंगळसूत्राभोवतीच नव्हे तर सोन्याच्या दागिन्यांभोवतीचे स्त्रियांचे गरगरत रहाणे लक्षात घ्यायला हवे.

मध्यम परिस्थितीतील अनेक दाम्पत्ये केवळ बायकोच्या अंगावर सोन्याचे दागिने हवेत, पोटावर लोंबत येईल एवढे तरी लांब मंगळसूत्र हवे, चारदोन बांगड्या, कानातले हवेत या हट्टाग्रहापोटी संसाराच्या सुरुवातीलाच घायाळ होत असलेली दिसतात. घरात जीवन सुखकर करणार्‍या गरजेच्या वस्तू एकवेळ नसल्यातरी चालवून घेतात. पण प्रतिष्ठेचे सोने मात्र अंगावर हवेच अशी विशेषतः स्त्रियांची मानसिकता असते. यात उभयपक्षी आया, बहिणी, आज्या, मावश्या हिरीरीने सामील होतात.

सोन्याच्या दागदागिन्यांचा इतिहास तसा सुरस आहे. इजिप्शियन, ग्रीकोरोमन आणि भारतीय संस्कृतीत सुवर्णालंकारांचे स्थान विशेष होते. नंतर हे लोण तसे जगभर पसरले. पण अजूनही युरोपीय देशांतील सर्वसामान्यांमध्ये सोने अंगावर घालण्याचे वेड भारताच्या तुलनेत अत्यल्प आहे. पण त्यामुळे त्या कमी सुरक्षित आहेत किंवा कमी सन्मान्य आहेत असे अजिबातच झालेले नाही. मात्र भारतात सर्वत्र जरासे स्थैर्य आलेल्या कुटुंबांत सोन्यासाठी जीव पाखडायला बायका आणि पुरुषही तयार असतात. कर्ज काढून लग्ने केली जातातच. पण त्यातला एक मोठा भाग सोन्याच्या अंगठ्या आणि इतर सोन्याच्या दागिन्यांवर खर्च करण्यासाठीच होतो.

एक जवळपास अनाथ मुलगा आठवतो. जवळपास अनाथ म्हणजे वडील नव्हते आणि आई अपंग. इमारतींच्या जिन्याखाली झोपून, सार्वजनिक नळ-संडास इथं प्रातर्विधी करून आयुष्याची दहा वर्षे मुंबईत त्याने काढली होती. मग केबलवाल्याकडे नोकरी लागल्यावर झोपडपट्टीत एक जागा घेऊन तो राहू लागला. ओळखीपाळखीच्या सर्वांनी त्याला घर लावायला वस्तू देण्यापासून मदत केली. याने लग्न ठरवलं आणि म्हणाला माझं एक स्वप्न आहे ताई… बायकोला मला दोनपदरी लांब सोन्याचं मंगळसूत्र करायचं आहे. बास, फक्त तेवढ्यासाठी कर्ज काढणार आहे… त्याला अनेक प्रकारे समजावले तरीही त्याने शेवटी तेच केले. पन्नास हजार रुपये कर्ज मंगळसूत्रासाठी. या कर्जात मान अडकवूनच त्याने संसार ओढायला सुरुवात केली. मग नोकरीच्या ठिकाणी इथेतिथे हात मारायची सुरुवात केल्याविना सोन्याचं कर्ज फिटण्यासारखं नव्हतंच.

सोन्याच्या देवाणघेवाणीची विवाहाच्या व्यवहारांत फार मोठी परंपरा आहे. भलेभले लोक होणार्‍या बायकोच्या, सुनेच्या घरच्यांकडून सोन्याची भीक मागून घेतात. भीक ती भीक मागायची वर शिरजोरी करायची हे तर केवळ आक्रीतच. पण त्याला समाजमान्यता आहे.

एखाद्या लग्न समारंभाला गेल्यावर नववधूच्या अंगावर किती तोळे सोने आहे, त्यातलं माहेरच्यांनी किती घातलं, सासरच्यांनी किती घातलं याचा अंदाज नजरेनेच मांडणारे निष्णात लोक तिथे जमलेले असतात. आसेतुहिमाचल लग्नात सोन्याचं महत्त्व नववधुवरांपेक्षा अधिक असतं. सोन्यावरून लग्न मोडतात आणि सोनं दिलं जातंय म्हणून विजोड विवाह उरकलेही जातात. उच्च शिक्षित, उच्च प्रतिष्ठित स्थळांसाठी सोनं मोजण्याची पद्धत समाजाच्या अंगवळणी पडली आहे. या सोन्याने नाते जुळून येते तेच मुळात भेगाळलेले असते असा विचार क्वचितच कुणाला शिवत असेल.

माझी स्वतःची आठवण आहे. आम्ही ठरवलेलं लग्नात सोन्यावर एक पैही खर्चायची नाही. माझ्या आईलाही सांगितलं, तुला काय द्यावंसं वाटत असेल तर घरातल्या उपयोगी वस्तू उपकरणे दे. फ्रीझ, ओव्हन, मिक्सर यातलं सारं. सोनं नकोच. तरीही तिने कानातले हट्टाने घेतले. सासरचं मंगळसूत्र चांदीतलं होतं आणि वाटी सोन्याची. माझं लक्षही गेलं नव्हतं. पण अनेक भोचक भवान्यांनी हे काय सासरच्यांनी चांदीतलं मंगळसूत्र घेतलं म्हणून चुकचुक केली होती. मला मंगळसूत्राचीच फिकीर नव्हती तर ते सोन्याचं असण्याची वा नसण्याचीही काही फिकीर नव्हती हे त्यांच्या पचनीच पडत नव्हतं.

सोनं स्त्रीच्याच नव्हे तर कुणाच्याही अंगावर का असावं याची आर्थिक कारणे अर्थातच फार जुनी आहेत. सोनं ही एक हमखास द्रव्य मिळवून देणारी गोष्ट. राजेरजवाड्यांपासून ते सामान्यांपर्यंत सोनं हे त्यांच्या धनिकतेचं मोजमाप. संकटकाळी ते विकून आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी सोयीचे.

स्त्रीच्या नावे घर, शेती, मालमत्ता नसण्याच्या काळापासून स्त्रीधनाची संकल्पना रुजली होती. स्त्रीधन म्हणजे बहुधा सोन्यारुप्याचे दागिने, भांडी. ते तिच्या हक्काचे. आपत्तीच्या काळात ते विकून तिला आधार व्हावा हीच कल्पना. तरीही हे स्त्रीधन अन्याय्य परिस्थितीत तिच्या मदतीला येऊ शकत नाही याचीही अगणित उदाहरणे आहेत. नवरा मरून गेलेल्या आणि पदरात फक्त मुली असलेल्या स्त्रियांचे स्त्रीधनाचे दागिने लुबाडून घरातून हाकून दिल्याची किंवा घरातच मोलकरीण म्हणून राबवल्याची उदाहरणे अनेक कुटुंबांत घडली आहेत. दागिने चोरीला गेल्यानंतर तर बायका फारसे काहीच करू शकत नाहीत.

विशेषतः या आधुनिक काळात स्त्रीधनाची कल्पना आता आपले संदर्भ हरवून बसली आहे. आता सुरक्षिततेसाठी घर, जमीन, दुकान वगैरे मालमत्तांमध्ये स्त्रीचे नाव असणे हे गरजेचे आहे. तिचा वैद्यकीय विमा, आयुर्विमा असणं महत्त्वाचं आहे, तिची वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे. तिचे मन मारून तिला घरकामात राबवून घेणं बंद करणं गरजेचं आहे. या गोष्टी कुणी सहजासहजी लुबाडू शकत नाहीत.

स्त्रियांच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे ते शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास. फोलपटी परंपरा झुगारून स्वत्व सांभाळण्याची ताकद.

नका मागू दागिने, नका खर्च करू दागदागिन्यांवर. महागडे सोन्याचे दागदागिने हे अखेर स्त्रीवर घातलेल्या वेसणी, लोढणी, बेड्याच आहेत. ते तिने हौस वाटल्यास क्वचित स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मिळवलेल्या पैशाने विकत घ्यावेत; पण सासरचे, माहेरचे, नवरा या नात्यांकडून परंपरागत अपेक्षा म्हणून घालून घेऊ नयेत. त्यात आपण तोळ्यातोळ्याने आपले स्वातंत्र्यच गमावत असतो याची खूणगाठ बांधावी.
एवढं सोनं घातलं अंगावर तरीही हिचं समाधान नाही असा कसलासा भाव त्या सोन्यामध्ये असतो.
विचार करा, अंगावर सोनं घालून तुमच्या सुखात भर पडते की वरपांगी प्रतिष्ठेत?
गळाभर माळा, हातभर पाटल्या बांगड्या, जिथंजिथं म्हणून तारा अडकवणं शक्य आहे तिथे तिथे अलंकार घालून तुमची दुःखं कमी होतात? स्वत्वाचा ठायीठायी अपमान होणं थांबतं? आसवं गळायची थांबतात?
तुम्ही कपड्या-दागिन्यांच्या उत्पादकांच्या जाहिरातींनी पुरस्कृत केलेल्या मालिका पाहता… तस्सेच काहीतरी अंगावर हवे म्हणून खुळावता आणि त्या हट्टापायी स्वतःच्या स्वच्छ, सन्मान्य अस्तित्वाची साधी सुखे लाथाडता.
कुठल्या ना कुठल्या परंपरागत सण-समारंभात आपली कौटुंबिक वत्ता किती आहे हे जगाला दिसावे म्हणून सोने लादून झुलत असलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या भरजरीपणातून दिसणार्‍या स्वतःच्या इभ्रतीकडे समाधानाने नजरा टाकणारे त्यांचे कुटुंबपुरुष आपल्याला पाहायला मिळतात.
अनेक मोक्याच्या सरकारी अधिकारपदांवरील स्त्रिया लाच खातात ती सोन्याच्या रुपात हेही ऐकून असाल. एका बाईचा फाईल पुढे सरकवण्याचा रेटच एक ग्रॅम, दोन ग्रॅम, एक तोळा या मापात असे आणि खणात उघडून ठेवलेल्या जेवणाच्या डब्यात लाल पुडी टाकायची असे त्यांचे तंत्र होते. या लाचखाऊपणातले वेगळेपण म्हणजे बाईंचा सोन्याच्या दागिन्यांचा सोस हेच. अनेक लाचखाऊ पुरुष अधिकारीही आपल्या बायकोसाठी दागिने या मिषाने लाच घेतात. एकंदर सोन्याचे दागिने हे समाजातील हर प्रकारच्या भ्रष्टतेची लक्षणे ठरू लागले आहेत.

‘चोरीचा मामला’ नावाचा एक जुना मराठी सिनेमा आठवतो. अगदी गरिबीत रहाणारे मायलेक. ललिता पवार आणि निळू फुले या दोघांनी तो सिनेमा जिवंत केला होता. त्यात अखेरीस लेकाला लुटीतले सोन्याचे दागिने मिळतात. पैसे मिळतात. दोघं तो आनंद साजरा करण्यासाठी एकत्र बसून चवीचं जेवतात. पोटभर समाधान पावतात आणि मग म्हातार्‍या आईला ते दागिने घालून बघण्याची हुक्की येते. ती ते भराभरा अंगावर चढवते. आरशात बघत रहाते… आणि हर्षातिरेकाने हसू लागते. खूप हसते, खूप हसते… आणि आरशासमोर बसून आपलं दागिन्यांनी सजलेलं रुप पाहून हसता हसता हृदय बंद पडून बसल्याबसल्याच मरून जाते.

ते सिनेदृश्य मला अजूनही लख्ख आठवतं आणि वाटतं कधी काही न मिळालेल्या म्हातारीचं हृदय बंद पडलं असं नाही. सतत सोनं अंगावर लादून घेत त्यातच आनंद मानणार्‍या अनेक बायकांच्या हृदयांचे किती कप्पे बंद पडलेले असतील…
अतिशय अनुत्पादक अशा प्रकारची सोन्यातली गुंतवणूक म्हणजे अंगावरचे दागिने. यातून जोवर तुम्ही पैसे उभे करायला कर्ज काढत नाही, तोवर ते दागिने म्हणजे जिवाला घोर आणि सामाजिक वेसण एवढे दोनच हेतू साध्य करतात. तरीही भल्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घडवणारे जवाहिरे, त्यांच्या दुकानांच्या चकचकाटी जाहिराती, त्यांची आलिशान, थंडगार दुकाने हा सारा व्यवहार बहुतांश स्त्रियांच्या संवेदनाहीन अशा दागिन्यांच्या सोसाच्या आधारावर सुरू राहतो.

एका संपूर्ण समाजाची समसमान प्रगती व्हायची असेल तर समाजातील सर्व घटकांची सामाजिक, शैक्षणिक प्रगती विषम असून चालत नाही. पण विषम प्रगतीचे लाभार्थी अनेक असतात. समाजातील एका महत्त्वाच्या घटकाला एका निर्बुद्ध आसक्तीत- सोन्यानाण्याच्या आसक्तीत गुंतवून ठेवणे ही विषम प्रगतीच्या लाभार्थींचीच चाल म्हणावी लागेल.

हा आज न पचणारा विचार वाटेल. पण हा भविष्याचा विचार आहे. तरुण मुलींनी सोन्याचे दागिने घडवण्याचा सोस टाकून द्यावा. स्वतःला घडवण्याचा सोस धरावा- इतकेच मागणे.

First Published on: February 17, 2019 4:38 AM
Exit mobile version