मसाल्यांसाठी प्रसिध्द लालबाग मार्केट

मसाल्यांसाठी प्रसिध्द लालबाग मार्केट

लालबाग मार्केट

गिरणगावातील लोकांचे खरेदीचे ठिकाण म्हणून लालबाग मार्केट नावारूपाला आले. हे मार्केट कसे वसले याबद्दल काही मतमतांतरे आहेत. भायखळा मार्केटचे अनेक्स म्हणजे विस्तार म्हणून हे मार्केट अस्तित्वात आले असे म्हटले जाते. तर काहींच्या मते हे मार्केट ओरिजिनल आहे. आता जेथे लालबागचा राजा बसतो ते मार्केट म्हणजे लालबाग मार्केट. त्याचा इतिहास हा महापालिकेच्या गॅझेटमध्ये आहे; पण मार्केटबद्दल समज काय आहेत हे कुठेच नाही म्हणून ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय. 19 व्या शतकाच्या आरंभी म्हणजे मुंबईत गिरण्या सुरू झाल्यावर हे मार्केट नावारूपाला आले.

हे मार्केट सुरुवातीला तेलासाठी प्रसिद्ध होते. मार्केटमध्ये बोहरा मुस्लिमांची तेलाच्या घाणी होत्या. त्या तेलाच्या घाणीवर तेथेच शेंगदाणा, तीळ, नारळाचे तेल काढून मिळायचे. मुंबईतील चाकरमानी विशेषतः कोकणात राहणारे गावी जाण्यापूर्वी या घाणीवरून घाऊक तेल घेऊन जायचे. कारण गावाकडे तेल काढण्याची सोय अभावानेच असायची. या घाण्याच्या आजूबाजूला नारळ, शेंगदाणा अशी किराणा मालाची दुकाने होती. अनेक लोक त्या दुकानावरून नारळ, शेंगदाणे खरेदी करून त्याचे तेल काढायला द्यायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात जसा कोलू ओढला होता तसे कोलू या मार्केटमध्ये होते. त्यांच्या मदतीने तेल काढले जायचे. तेलाबरोबरच गरम मसाल्याचे पदार्थ, मिरच्या यासाठी हे मार्केट प्रसिध्द होते. त्यामुळे या मार्केटला गरम खाड्याचे मार्केट असेही म्हटले जायचे. मार्केटमध्ये गेल्यावर तेल आणि मसाल्याचे पदार्थांची खरेदी करूनच गिरणगावकर बाहेर पडायचा. त्यावेळी लालबाग हे गणेशोत्सवासाठी नव्हेतर तेल आणि मसाल्यांसाठी मुंबईत फेमस होते. अर्थात हे मसाल्याचे पदार्थ आणि मिरच्यांचे व्यापारीही बोहरा मुस्लीम होते.

कालांतराने तेथे मराठी व्यापारी आले. बोहरा व्यापारी लालबाग मार्केटमधून का गेले, याचा एक वेगळा इतिहास आहे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी लिहू. आज लालबाग मार्केट हे मसाल्यासाठी ओळखले जाते. येथील तेलाच्या घाणी आता गेल्या आहेत. कोलू तर कधीच नष्ट झाला. आता तेलाची एखाद दुसरी घाणी राहिली आहे. पण मसाल्यांची मात्र खूप दुकाने आहेत. येथे मिरची खरेदी करून ती दळून मसाला करून दिला जातो. तसेच डंकीनीवरही मसाला कुटून दिला जातो. गरम मसाल्याचे सर्व पदार्थही मिळतात, घाऊक आणि किरकोळ सुध्दा. पूर्वी लग्नासाठी लागणारे साहित्य जसे मुंडावली, रुखवात, कुळाचे साहित्य येथे मिळायचे. त्याकाळी कॉन्ट्रॅक्टरमार्फत लग्न लावण्याचे प्रकार नसल्यामुळे हे साहित्य खरेदी करायला या मार्केटमध्ये खूप गर्दी व्हायची.

आताही हे साहित्य येथे विकले जाते; पण गर्दी कमी झाली आहे. आमच्या लहानपणी म्हणजे सत्तरीच्या दशकात लग्नात अक्षता पडल्यावर कागदाच्या दोन पुड्या हातात ठेवल्या जायच्या. त्यापैकी एका पुडीत दळलेली साखर असायची आणि दुसर्‍या पुडीत सुपारीचे तुकडे, ती साखरेची पुडी मिळवण्यासाठी आमची खूप धडपड असायची. ती साखरेची पुडी या लालबाग मार्केटमध्ये घाऊक मिळायच्या. त्या तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याचे बघण्याचे समाधान काही औरच होते. आज त्या पुड्या नाहीशा झाल्या आहेत. पण अजूनही हे मार्केट तग धरून आहे. त्याची ओळखही तशीच आहे ही नक्कीच समाधानाची गोष्ट आहे.

First Published on: December 23, 2018 4:43 AM
Exit mobile version