नाटकघरातला जादुई अंधार !

नाटकघरातला जादुई अंधार !

माझ्या जन्मापासून ते 1991 अशी तब्बल 12 वर्षे काळाचौकीपासून हजारएक पावलांच्या अंतरावर असलेल्या घोडपदेवमधील एका चाळीत मी माझे बालपण जगलो. भायखळा, घोडपदेव, काळाचौकी, लालबाग, परळ, शिवडी ते थेट नायगावपर्यंत त्यावेळचे बहुप्रसिद्ध असे गिरणगाव पसरलेले होते. गिरणगावातल्या गल्लोगल्लीतल्या प्रत्येक चाळीत अगदी सहज जरी फेरफटका मारला, तर त्यावेळेस जे काही सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम नजरेस पडत, त्यात लहान मुलामुलींनी सादर केलेली नाटुकली आणि गणपती उत्सवात मोठ्यांनी केलेली नाटके यांचा समावेश हमखास असे. त्या नकळत्या कोवळ्या वयात पाहिलेले नाटक पुढे आपल्या आयुष्यातला बहुतांश वेळ व्यापून टाकणार आहे, हे मला त्यावेळेस जाणवलेसुद्धा नव्हते. पण गिरणगावातली ती मोजकी वर्षे हा माझ्या मनात नाटकाबद्दलची आवड आणि आकर्षण निर्माण करणारा आणि तसा आज मला जाणवणारा अत्यंत महत्वाचा काळ होता, असे मागे वळून पाहताना वाटते.

दर गणपतीत मी शिवडीला माझ्या आत्येकडे एक दिवस फेरी मारत असे. तिथल्या गणेशोत्सवात त्यावेळी त्यांच्या चाळीतलीच काही तरूण मुलंमुली एकत्र येऊन एखादे नाटक सादर करत असत. ते नाटक पाहण्याकरता म्हणून मी माझ्या वडिलांसोबत जात असे. आयुष्यात पहिल्यांदा रंगमंच पाहिला तो याचवेळी. त्या दिवसांतला घडलेला एक मजेदार किस्सा इथे मला आवर्जून सांगावासा वाटतो. आचार्य अत्रेंचं ‘लग्नाची बेडी’ की आणखी कुठलं ते आता आठवत नाही. पण त्यात एक तरूण आणि त्याच्याच वयाची एक तरूणी असे दोघंही एकमेकांच्या प्रियकर-प्रेयसीचे काम करत होते. तालमी सुरू होत्या. यथासांग प्रयोगही पार पडला आणि नाटकात एकमेकांच्या प्रियकर-प्रेयसीचे काम करणारे ते दोघंही, नाटकाबाहेरच्या त्यांच्या खर्‍या आयुष्यातही एकमेकांचे प्रियतम बनले होते आणि पुढे जाऊन त्या दोघांनी लग्नगाठही बांधून टाकली.

गंमतीचा भाग सोडला तरी या घटनेने माझ्या नाटकाविषयीच्या समजूतीत एक बालसुलभ पण महत्वाची भर घातली. ती अशी की नाटकात जे घडताना दिसते ते जसेच्या तसे खर्‍या आयुष्यातही घडते. म्हणजेच नाटक आपल्या जगण्याच्या खूप जवळचे आहे. पुढे जसजशी वर्षे सरत गेली तेव्हा ही समजूत प्रगल्भ होत गेली आणि कळत गेले …आपले जगणे नाटकाचा आरसा नाही. तर नाटक हा आपल्या जगण्याचा आरसा आहे. दुसरा भाग म्हणजे नटाने आपल्या भूमिकेत वाहून न जाता तटस्थपणे भूमिका करायचे कसब अंगी बाणवणे. या दृष्टीने पाहता वर उल्लेख केलेले दोघंही ‘कलाकार’ वाईट अभिनय करीत होते हे सिद्ध होते. अर्थात हेही आज कळते. पण त्यावेळी मात्र नाटकाविषयीच्या माझ्या समजुतींनी आकार घेण्याच्या दृष्टीने ही घटना खूप महत्वाची होती आणि मजेदारही. हे झालं त्यावेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन.

पुढे प्रत्यक्ष रंगमंचावर उभं राहून काम करण्याचा योगही माझ्या आयुष्यात लवकरच जुळून आला. मी ज्या चाळीत राहत होतो, तिथे एक ट्युशन इंस्टिट्यूट होते. त्या इंस्टिट्यूटच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बुवाबाजीवर शेरेबाजी असणार्‍या एका छोट्याशा नाटुकलीत मी काम केले होते. त्याचवेळी शाळेच्या गॅदरिंगमध्ये माझा छोटामोटा सहभाग नोंदवणे सुरूच असे. शाळकरी वयात केलेलं ‘बोलावणं आल्याशिवाय नाही’ या एकपात्री स्वगताचं सादरीकरण ही त्या वयातली माझी ठळक आठवण आहे. त्या एका सादरीकरणाने मला शाळेत बर्‍यापैकी प्रसिद्धी मिळाली होती. माझ्या समवयस्क मुलांसमोर रंगमंचावर उभे राहून असं नाटकात काम करताना सबंध शाळेतल्या मुलांच्या डोळ्यांत जे कौतुक मला त्यावेळेस दिसलं होतं, ते मला आजही लख्ख आठवते. नाटकात काम करून असं शिक्षकांच्या गुड बुक्समध्ये राहता येत होतं आणि मित्रांच्या कौतुकाचा धनी होता येत होतं, हाही अंतस्थ उद्देश हळुहळू मनातल्या मनात त्यावेळेस बळावत चालला होता.

पुढे शाळा संपल्यावर कॉलेज सुरू झाले. मी परळच्या महर्षि दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बारावीची परीक्षा दिल्यानंतर आता मधल्या सुट्टीत काय करायचे याचा विचार करत होतो. एकदा सहजच कॉलेजच्या व्हरांड्यात फेरफटका मारत असताना दादरच्या कीर्ती महाविद्यालयात घेण्यात येणार्‍या एका नाट्यकार्यशाळेची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. सहज चौकशी करावी म्हणून जाहिरातीत दिलेला फोन नंबर फिरवला आणि जुजबी प्रश्नोत्तरे झाल्यानंतर थेट त्या कार्यशाळेत अ‍ॅडमिशन घेतले. ते वर्ष होते 1997. हे वर्ष माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरले. याच कार्यशाळेत नाटक ही नुसतीच मनोरंजनाची नसून एक पुरेशा गांभीर्याने करायची कलेच्या क्षेत्रातली विधा आहे, याची जाणीव माझ्या मनात तयार झाली.

दादरच्या कीर्ती महाविद्यालयाने मला दिलेली ही सर्वात मोठी दीक्षा आहे. त्या कार्यशाळेत त्यावेळची हिंदी-मराठी रंगभूमीवरची दिग्गज मंडळी आम्हाला मार्गदर्शन करायला यायची. त्यांच्या अनुभवातून आणि आम्ही प्रत्यक्ष केलेल्या प्रॅक्टिकल्समधून नाटकाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन अधिक गंभीर झाला आणि इथेच मी ‘नाटक’ या क्षेत्रात वावरत आपल्या पुढील आयुष्यात काहीतरी करत राहण्याचे मनोमन ठरवून टाकले. दिवसांमागून दिवस जात होते. हळुहळू माझा नाटकाकडे असलेला कल माझ्या घरी माझ्या वडिलांच्या लक्षात येऊ लागला होता. त्यांनी माझ्या नाटक करण्याला सरसकट विरोध जरी केला नव्हता तरी, या क्षेत्रातील अनिश्चिततेबाबत मला सावध करायलाही ते विसरले नव्हते. मला असे सावध करण्यामागे त्यांचा स्वत:चा अनुभव होता. तो असा की, त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या एका मित्राच्या नाटकासाठी आर्थिक मदत केली होती, जी पुढे त्यांच्यालेखी बुडीत खात्यात जमा झाली होती.

अशी मजल दरमजल करीत आज गांभीर्याने नाटक करायला घेतल्याला आज तेवीस वर्षे उलटून गेली आहेत. या तेवीस वर्षांत नाटकाच्या निमित्ताने देशभर फिरणे झाले. उत्तमोत्तम कलावंतांचा सहवास लाभला. काहींच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काहींनी तर माझे आयुष्य समृद्ध केले. असे असले तरी या प्रवासात नाटक करता करता त्या विधेचे आपले म्हणून एक आकलन तयार होत असते. त्या आकलनाचा सारांश देतो –

नाटक एका बिंदूवर सुरू होते. एका बिंदूवर येऊन संपते. दोन बिंदूंच्यादरम्यान जे जादुई क्षण निर्माण होत असतात, ते नाटक संपताना विरून गेलेले असतात. ते विरतात म्हणून आपण त्यांना जादुई क्षण म्हणतो. किंबहुना, ते जादुई असतात म्हणूनच विरतात. नाटकघराच्या आतला जादुई अंधार आत सोडून आपण जेव्हा बाहेर येतो, तेव्हा वास्तवाचं कठोर उन्हं तळपत असतं किंवा रात्रीचा बोचरा अंधार घेरून असतो. ते तळपतं उन्हं आणि बोचरा अंधार जादुई नसतो. खरा असतो. त्याला सामोरं जाण्याकरता कुणी नाटकातल्या जादुई क्षणांच्या भरवशावर राहू शकत नाही, कुणाला राहता येत नाही. त्या क्षणांचं जादुई असणंच कुणालाही त्यांच्यावर अवलंबून न राहण्याला परावृत्त करत असतं. हे ज्याला उमगलं, त्याला ‘जादुई क्षण-मॅजिकल मोमेंट्स’ निर्माण करून, त्यातली मजा घेत, ते तिथल्यातिथे सोडून देण्यातलं नाटकाचं मर्म कळालं.

नाटकातल्या जादुई क्षणांच्या भरवशावर वास्तवात बंगले बांधू पाहणारा माणूस नाटक नावाच्या जादुई चीजेपासून कोसो दूर आहे, असतो.

-समीर दळवी.

First Published on: February 16, 2020 6:04 AM
Exit mobile version