चकव्याची गोष्ट !

चकव्याची गोष्ट !

तुम्ही जेव्हा शिक्षकाच्या भूमिकेत असता तेव्हा तुम्हाला तरुणपिढीचे अनेक अनुभव ऐकायला, बघायाला मिळत असतात. गेल्यावर्षी अकरावीची अ‍ॅडमिशन्स झाली. नियमित कॉलेज सुरू झाली. महिनाभरात पहिली चाचणी संपली. मुलांचे हे डे ते डे सुरू झाले. कॉलेज पुन्हा गजबजू लागलं. सर्व डे, सांस्कृतिक कार्यक्रम जवळपास संपत आले. आता पुन्हा कॉलेजमधली मुलांची उपस्थिती रोडावू लागली. एकदिवस ज्या मुलांची उपस्थिती कमी आहे, त्यांच्या पालकांना बोलावलं. बहुतेक पालकांना आपली मुलं कॉलेजला येत नाहीत याची कल्पनाच नव्हती. मुलं नेहमी कॉलेजला जात असतील असा त्यांनीच आपला गोड समज करून घेतला होता. पण वास्तव जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा पालकांचे डोळे उघडले.

एवढं करूनसुद्धा एका मुलाचे पालक काही आले नाहीत. त्या मुलाला मुख्याध्यापकांच्या खोलीत बोलावलं आणि पालक का आले नाहीत याची चौकशी केली. तेव्हा त्या मुलाने बाबा आजारी असून आई कामावर जाते. बाबांची सुश्रुषा करण्यासाठी त्याला थांबावं लागतं, असं उत्तर दिलं. मुलाने आपली बाजू मांडल्यावर मुख्याध्यापकानी निदान सकाळचे दोन तास कॉलेजमध्ये येऊन नंतर जाण्याची त्याला परवानगी दिली. दोन-तीन दिवस गेले. हा मुलगा वेळेवर यायचा आणि मधल्यासुट्टीनंतर घरी जायचा. एक दिवस वर्गाच्या वर्गशिक्षिकेला वर्गातल्या मुलांनी जी माहिती दिली, ती कळल्यावर मी चक्रावूनच गेलो. या मुलाचे वडील चांगले ठणठणीत असून त्यांचा चांगला बिझिनेस आहे. आईदेखील बँकेत कामाला आहे. वर्गशिक्षिकेने मुलाने वर्षाच्या सुरुवातीला नोंद केलेल्या पालकांच्या संपर्क क्रमांकावर फोन केला तर तो नंबर एका हॉटेलचा होता. त्या मुलाला खाली बोलावलं आणि त्याच्याकडून आई-वडिलांचे खरे मोबाईल नंबर घेतले.आई-वडीलांना त्वरित कॉलेजमध्ये बोलावलं. त्यांना खरी परिस्थिती सांगितली.

पालक त्या मुलाने दिलेली माहिती ऐकून गारच झाले. तो मुलगा रोज कॉलेजच्या वेळेला घरून निघतो. दहावीला थोडेथोडके नाहीतर एकोणनव्वद गुण मिळवलेला तो मुलगा. कॉलेजला न येता कुठे तरी व्हिडिओ गेम खेळायला जातो. अभ्यास करत नाही. दिवसभर पालक घरात नसतात. त्यांना तुम्ही नसताना दुपारी अभ्यास करतो, दहावीला चांगले गुण मिळवले ना. तसेच आतादेखील मिळवीन,असे वचन दिले होते. पालकदेखील निर्धास्त होते. पण समोर काही वेगळेच सत्य आले. वर्गातल्या मुलांनी जी माहिती दिली त्यावरून पालकांच्या समोर त्याची चौकशी केली. बाहेर तो मुलगा सिगारेट पितो हेदेखील त्याने कबूल केले. त्याचे हे प्रताप ऐकून बिच्चारी त्याची आई अक्षरशः रडू लागली. मुलगा मान खाली घालून उभा होता. त्याच्याकडे बघून मुख्याध्यापक म्हणाले, अरे एवढा चांगला मुलगा तू , तुला नक्की झालंय तरी काय? त्यावर त्याची आई पटकन म्हणाली, काही नाही वो सर त्याला चकवा लागलाय. आम्ही पालकांची आणि मुलाची समजूत घालून त्यांची रवानगी केली. ते पालक आणि मुलगा गेल्यापासून माझ्या मनात त्याच्या आईचे बोल मात्र कुठे तरी घर करून राहिले.

चकवा म्हणजे नक्की काय ? एकदा कोणाकडून तरी ऐकलं होतं रात्रीच्या वेळी फिरताना अगदी नेहमीची वाट असूनदेखील फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येतो. पुढची वाट मिळतच नाही. रात्रभर प्रवास करून पुन्हा तिथेच. फार दमणूक होते. कोणीतरी बोलावतंय आणि आपण त्याच्यामागे जातो आहोत अशी एक अवस्था होते. कधीतरी रात्री या चकव्याचं बोलावणे येते. त्याबरोबर माणूस चालत चालत दूर जातो. आपण किती दूर आलो याचे त्याला भान राहत नाही. चालताना त्याला वाटेचं भान राहत नाही. दगड धोंडे दिसत नाहीत. एकाएकी चकवा नाहीसा होतो. माणूस भानावर येतो. त्यावेळी त्याला शरीराला झालेल्या जखमांची जाणीव होते. आपण फार लांब आलो आहोत याची जाणीव होते…..तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हा चकवा भल्याभल्यांचे आयुष्य उध्वस्त करतो.मारुती चित्तमपल्ली यांच्या आत्मकथनाचं नाव ‘चकवा चांदण’ असंच आहे. त्यांना चकवा संधिप्रकाश व गूढता याचं प्रतीक वाटतं. मारुती चित्तमपल्ली खुद्द वनखात्यात नोकरी करताना, त्यांना आलेल्या अनुभवाचे यथार्थ वर्णन या पुस्तकात आहे. या पुस्तकाचं नाव हाच एक मोठा चकवा होता. घुबडासारख्या एका अपशकुनी मानलेल्या पक्ष्याला त्यांनी चकवा चांदण म्हटलं आहे.

चकव्याचा संदर्भ मला जयवंत दळवींच्या ‘अधांतरी’ या कादंबरीत वाचायला मिळाला. त्या कादंबरीत सावित्री म्हणून जी नायिका आहे, तिची आई जिला अम्मा म्हटले आहे. ती तबलजीचा हात धरून घरातून निघून जाते. त्यानंतर सर्वस्व गमावलेली अम्मा जेव्हा पुन्हा येते तेव्हा सावित्री तिला तबलजीबरोबर पळून जाण्याचे कारण विचारते. त्यावर अम्मा जे उत्तर देते ते या चकव्याशी साधर्म्य साधते. ती म्हणते चकवा गो तो सावू ,चकवा ! याचा अर्थ अम्माच्या आयुष्यात तो तबलजी चकवा म्हणून आला. हे चकव्याचं प्रतीक वापरून दळवींनी अम्माच्या आयुष्याची झालेली परवड एका शब्दात व्यक्त केली आहे. कादंबरीत सावूच्या आयुष्यातदेखील हा चकवा येतो. सावित्री पहिल्या लग्नाच्या नवर्‍याला व मुलाला सोडून दुसर्‍या पुरुषाशी लग्न करते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा पुन्हा एकदा पहिल्या नवर्‍याकडे येते तेव्हा थोडा मोठा झालेला तिचा मुलगा आई म्हणून तिला नाकारतो. तेव्हा दळवी पुन्हा चकव्याची योजनाच करतात.

या चकव्यासारखी अनेक प्रतीके कोकणातील लोकसंस्कृतीत आजदेखील टिकून आहेत. लहानपणी घरातील दिवे गेल्यावर आम्ही खळ्यात बसून गावगजाली करत बसू. तेव्हा हमखास कोणतरी देवचाराची गोष्ट सांगे. एकदा मोठ्या काकांनी सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते. काका गोष्ट सांगायला लागले की, ऐकणारे रंगून जात असत. काकांनी गोष्टीला सुरुवात केली. वरच्या वाडीतला दामू गावकर रोज खळ्यात झोपायचा. दामू म्हणजे देवळात वतने सांभाळणारा माणूस. देवळात कडक गार्‍हाणे घालणारा माणूस. एक दिवस वईच्या आखाड्यावर कोणतरी काठी आपटून चल निघ लवकर …..चल निघ लवकर असे म्हणत आहे, असा त्याला भास झाला. एकदोन दिवस गेले. घरात दामूचं चित्त थार्‍यावर नसायचं, कोणतरी आपल्याला बोलावत आहे. याचा तो सारखा उच्चार करायचा. त्याची बायको वैतागून गेली. शेवटी ती म्हणाली, जो कोण तुमका बोलावता हा ना त्याच्याबरोबर जावा एकदाचे ….. त्या रात्री दामू पुन्हा खळ्यात झोपला. पुन्हा त्या रात्री कोणीतरी काठी आपटली. तेवढ्यात पाठोपाठ पुन्हा चल उठ लवकर निघ आता….. असं कोणी बोललं, त्याबरोबर दामू उठला आणि त्या आवाजाच्या दिशेने गेला. त्याच्या पाठोपाठ दामू निघाला. सकाळ झाली. दामूची बायको उठली. खळ्यात बघते तर अंथरुणात दामू नाही. अंथरूण न गुंडाळता आपला नवरा कुठे गेला म्हणून ती आपल्या नवर्‍याला शोधू लागली. पण दुपारपर्यंत नवर्‍याचा कुठेच पत्ता लागला नाही. दामू गेला कुठे? ही वार्ता आता गावभर पसरली.

कोणीतरी दामूच्या बायकोला विचारलं दामू काय बोललेला का तुला?
तेव्हा ती म्हणाली, होय. दोन दिवसामागे म्हणालेले माका आखाड्यावर उभो र्‍हवान कोणतरी बोलावता. त्यावर मी बोललंय ,कोण बोलावता तर जावा ….

काय बाई हसं तू ! तुका म्हायती हा तो बोलावणारो दुसरो तिसरो गो कोण नाय. तो देवचार आसतलो.त्या माणसाचं हे बोलणं ऐकून दामूच्या बायकोने भोकाड पसरलं. दोन हातांनी उर बडवू लागली.माझ्यामुळे माझो घोव गेलो ..गो तुझ्यामुळे नाय गो, एकदा देवचराचा बोलावना ईला की काय इलाज नाय. त्याच्या मागसून जावचाच लागता.त्यानंतर दामू कधीच घरी आला नाही. कुठे गेला त्याचा अजून पत्ता नाही. पण दामू गेला तो कायमचा ……

काकांच्या या लोककथेतील दामू असू दे किंवा जयवंत दळवी यांच्या अधांतरी कादंबरीतील अम्मा असो की सावित्री असू दे तसेच आमच्या कॉलेजमधील तो विद्यार्थी असो. या तिन्ही गोष्टीतील सारांश एकच- प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा चकवा येऊनच जातो. कधीतरी चकवा संपतो आणि माणसाला मार्ग मिळतो. तर कधी तो चकवा संपत नाही. आयुष्यभर त्याची पाठशवन चालूच राहते.चकव्याची गोष्ट असू दे किंवा काकांचा देवचार असू दे. इथल्या माणसांनी जपलेली ती लोकसंचितं ही मौखिक माध्यमाने एका पिढीने दुसर्‍या पिढीकडे सोपवली आहेत. प्रत्येक पिढीत ती या ना त्या मार्गाने जनमानसात रूढ झालेली आहेत, हे नक्की….

वैभव साटम

First Published on: May 19, 2019 4:23 AM
Exit mobile version