मन करा रे सक्षम…होई कोरोनावरी मात !

मन करा रे सक्षम…होई कोरोनावरी मात !

महिन्याभरापूर्वी आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील तीनजणांनी थोड्या फार दिवसांच्या फरकाने अचानक ग्रुप लेफ्ट केला. कुठलाही वादविवाद नसताना. यामुळे सगळाचं ग्रुप बुचकळ्यात पडला.

प्रत्येकजण ग्रुपवर रिअ‍ॅक्ट होऊ लागला. पण नक्की काय झालं ते काही कोणाला कळत नव्हतं. कारण इतर ग्रुपमध्ये जशा काही हॅपी गो लकी व्यक्ती असतात. नेहमी खेळीमेळीच्या वातावरणात ग्रुपबरोबर कनेक्ट असतात. तसेच हे तिघेही होते. कोरोनाचा सुरुवातीचा काळ आणि लॉकडाऊन यात या तिघांनी सकारात्मक मेसेज टाकून खरं तर ग्रुपमधील प्रत्येकाला धीर देण्याचेच काम केले होते. यामुळे त्यांच्या अशा लेफ्ट होण्यामुळे ग्रुप कोमात गेला. नंतर बर्‍याच काथ्याकुटीनंतर हे तिघेजण प्रॉब्लेम फेस करत असल्याचे समोर आले. एकीला कंपनीने दुसरी नोकरी शोधण्याचा अल्टीमेटम दिला होता. तर दुसर्‍याला कोरोना झाला व तो बराही झालाय. तर तिसर्‍याच्या कंपनीत नोकर कपात सुरू

झाल्याने तो प्रचंड अस्वस्थ होता. कोणाशीही बोलण्याची त्यांची इच्छा नव्हती. कोरोना संकटात मित्रांना धीर देणारे हे तीन स्तंभ स्वत:ला एकाकी समजू लागले होते.

कोरोनामुळे आमचे तीन बडीज आमच्यापासून लांब जाऊ पाहात होते. तर त्यांना परत नॉर्मल ट्रॅकवर आणण्यासाठी आमची धडपड सुरू होती व आहे.

सगळ्यांनीच आपआपल्या परीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण यातील मैत्रीणीचा फोन स्विच ऑफ तर दुसरा नॉट रिचेबल आणि तिसरा फोन उचलत नव्हता.

शेवटी काहीजणांनी थेट त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सगळेच वेळात वेळ काढून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणाच्या इमारतीत बाहेरच्यांना प्रवेश नव्हता, तर दुसर्‍याने तोंडावरच दरवाजा आपटत भेटण्यास बोलण्यास नकार दिला. तर तिसरीने मात्र मला स्पेस द्या अशी हात जोडून विनंती करत दरवाजातूनच मित्रांना परतवून लावले होते.

त्यानंतर मात्र मैत्रीतील ही स्पेस वाढत गेली. आज या मैत्रीणीवर मानसिक उपचार सुरु असून ती स्टेबल असल्याचे, पण तिला जगावेसेच वाटत नसल्याचे तिच्या नवर्‍याकडून कळलं.

हे ऐकलं आणि तिची मनोव्यथा आमची झाली. कोरोनाच्या संकटात दुसर्‍यांना ताकदीने व हिमतीने उभे राहण्याचा दिवसरात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून डोस पाजणारे हे तिघे आज नैराश्याचा सामना करत असल्याचे कळालंय. पण हे तिघेच नाही तर या कोरोनाकाळात देशातील 15 कोटी नागरिकांनी मानसिक आजाराचा सामना केला व काही जण अजूनही करत असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे. जी चिंताजनक असून आजच्या तारखेला 18 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींना नैराश्याने गाठले आहे. यामुळे संबंधित मानसिक आरोग्य संस्थेच्या हेल्पलाईनवर या व्यक्ती मदत मागत आहेत. याअंतर्गत समोर आलेल्या माहितीत एक धक्कादायक बाबही समोर आली आहे. त्यानुसार 42 टक्के भारतीयांची जगण्याची उमेद संपली असून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोंघावत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

तर 35 टक्के व्यक्तींनी स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्नही केल्याचे सांगितले आहे. यामुळे कोरोनावरील उपचारांबरोबरच नागरिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे दुहेरी आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. आमचे तिन्ही मित्र सध्या याच संकटाचा सामना करत आहेत.

कोरोना व लॉकडाऊन या काळात अनेक उद्योगधंदे बुडाले, यामुळे लाखो नागरिक बेरोजगार झाले आहेत. देशाची आर्थिक घडीही विस्कळीत झाली आहे. यामुळे कोरोना होऊन मरण्यापेक्षा लोकांना जगणं अधिक कठीण वाटू लागलं आहे. यातूनच मग नोकरी गमावल्याची किंवा गमावण्याची भीती, कोरोना झाल्यानंतर विलगीकरणात कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने येणारा मानसिक ताण, त्यामुळे निर्माण झालेला एकलकोंडेपणा, पैसे संपत असल्याचे विचार प्रत्येकाला अस्वस्थ करत आहेत.

त्यातून घरात पती-पत्नीमध्ये होणारे वाद व त्यातून जन्माला येणारा घरगुती हिंसाचार मानसिक स्वास्थ नष्ट करत आहे. यामुळे एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे लोक मानसिक व्याधींनाही बळी पडत असल्याचे बंगळुरू येथील सुसाईड प्रिव्हेंशन इंडिया फाऊंडेशनच्या संशोधनात आढळले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जास्त असणारे हे प्रमाण त्यावेळच्या तुलनेने कमी असले तरी नक्कीच चिंताजनक आहे.

कारण अद्यापही कोरोनावरील लस शोधण्यास संशोधकांना यश मिळालेले नाही. यामुळे अजून किती महिने कोरोना जमिनीवर राहणार हे सांगणे कठिण आहे.

याच पार्श्वभूमीवर महिन्याभरापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने एड्सच्या विषाणूप्रमाणेच कोरोनाही पृथ्वीवर राहील असे सूचक विधान केले होते.जे आता सत्यात उतरत असल्याने ही परिस्थिती कधीच बदलणार नाही, असा ठाम विश्वास लोकांच्या मनात घर करत आहे. यातूनच आजच्या तारखेला पुन्हा लॉकडाऊन तर होणार नाही ना, कंपनी बंद तर होणार नाही ना, कोरोनाचा संसर्ग होऊन मी पण मरणार नाही ना, असे प्रश्न लोकांच्या मेंदूवर सतत आक्रमण करत आहेत. परिणामी इतर देशांच्या तुलनेत आज भारतात आपल्या आजूबाजूला अगदी शेजारी व घरातील व्यक्तींना कळत नकळत मानसिक व्याधी जडत असल्याचे दिसत आहे. त्यातही या व्याधीमध्येही पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात सैरभैर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांमध्ये असलेल्या अतिविचार करण्याच्या वृत्तीने कोरोनाकाळात त्यांना मानसिकदृष्ठ्या दुबळे केले आहे. त्यामुळे कोरोनाकाळात महिलांमध्ये मानसिक विकार जडण्याचे प्रमाणही वाढत आहे. आमच्या कॉलेज ग्रुपमधील मैत्रिणीलाही अतिविचाराने नैराश्यात ढकलले असून तिने स्वत:ला निराशेच्या कोषातच गुंडाळून टाकले आहे. कोरोना कधीही जाणार नाही. या अविचाराने तिच्या मनाचा ताबा घेतला आहे.

परिणामी कोरोनाआधी कामात हुशार असलेल्या मैत्रिणीचे वर्क फ्रॉम होमदरम्यान कामावरूनच लक्ष उडाले. त्यामुळे कामात अनेक चुका झाल्या, ज्याची गंभीर दखल घेत कंपनीने तिला अल्टीमेटम दिले. तर दुसर्‍याला कोरोनाची लागण झाली. त्यात त्याची प्रकृती खालावली. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण जीव वाचल्यापेक्षा आपल्याला व्हेंटिलेटवर कसे ठेवण्यात आले, त्यावेळी झालेला त्रास, याच विचाराला तो कोरोनामुक्त झाल्यानंतरही प्राथमिकता देतोय. पुन्हा त्याच जीवघेण्या आठवणी व अनुभवात रमतोय.

परिणामी त्याची मानसिक अवस्था ढासळली. चांगला पगार असूनही तो मानसिक अस्वास्थामुळे कामावर जाऊ शकत नाहीये. त्याच्या या अवस्थेचा परिणाम कुटुंबावर होत आहे.

तर तिसर्‍या मित्राची नोकरी अजूनही शाबूत आहे. पण नोकर कपातीमध्ये कंपनीने त्याच्या सहकार्‍यांना कामावरून कमी केले. यामुळे आज ना उद्या आपलीही नोकरी जाणार या भीतीने त्याला ग्रस्त केलंय. खरंतर कोरोनाच्या या काळात दिलासादायक गोष्टी कमी व वेदना देणार्‍याच अधिक असल्याचं या वाढत्या मानसिक आजारावरून समोर येत आहे.

जोपर्यंत कोरोनावरची लस सापडत नाही तोपर्यंत आज ना उद्या आपल्या प्रत्येकाला या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. पण त्यासाठी मन सज्ज करायला हवे.

कारण जवळजवळ 80 टक्के आजार हे मनातील विचारांवरच अवलंबून असतात. मनाचा शरीरावर परिणाम होतोच. यामुळे कोरोनाबरोबर लढायचं असेल तर फक्त शरीरच नाही तर मनही मजबूत करायला हवं.

First Published on: September 20, 2020 6:30 PM
Exit mobile version