…तेव्हाची ती अंगाई!

…तेव्हाची ती अंगाई!

अंगाईच्या सूर आणि तालामध्ये ही जादू हटकून असते. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, खरं तर बाळाला त्याच्या इवल्या इवल्या वयात सूर म्हणजे काय ते माहीत नसतं. गाण्याच्या एकाद्या तालावर त्यालाही थिरकावंसं, डुलावंसं वाटतं म्हणजेच ताल त्याच्या परिचयाचा असतो. ह्याचाच अर्थ बाळाचा सुराआधी तालाचा परिचय झालेला असतो. पण तरीही अंगाईतले सूर लहानग्या बाळाच्या कानाचा आणि मनाचा वेध घेत असतात आणि त्याला ते मंत्रमुग्ध करत असतात. अंगाईमध्ये तसं पाहिलं तर तालाची आकर्षक आतषबाजी नसते. तिथे सगळा सुरांचा मामला असतो. बाळ त्या सुरात रमता रमता झोपी जातं आणि तिथूनच त्याची सुरांशी ओळख व्हायला सुरूवात होते.

आजची मम्मी अंगाई गाते की नाही ते माहीत नाही, पण काल जी कुणी आई नावाची बाई होती ती आपल्या बाळासाठी हमखास अंगाई गायची. बरं, अंगाई म्हणजे काय झोपेची गोळी नसते! पण अंगाई ऐकता ऐकता बाळाच्या पापण्या अलगद मिटल्या जातात हे खरं आहे. अंगाई म्हणजे नेमकं काय तर आईवडिलांचं आपल्या बाळावरच्या प्रेमाने, मायेने, ममतेने ओथंबलेलं गाणं.

हेच अंगाई नावाचं गाणं एका जमान्यात प्रसिध्द होतं ते ‘बा निज गडे, निज गडे लडिवाळा, निज रे निज माझ्या बाळा’ ह्या शब्दातलं. जुन्या जमान्यातली ही अंगाई अतिशय लोकप्रिय होती. जवळ जवळ अडीच ते तीन दशकं ह्या अंगाईचं अंगाईच्या प्रदेशात साम्राज्य होतं. त्याच सुमारास नंतर बर्‍याच काळाने ‘कुणीही पाय नका वाजवू, चाहूल देऊन नका कुणी हो चिमण्याला जागवू’ ही अंगाई आली आणि तिने एक काळ तेव्हाच्या त्या सात्विक समाजाला भारावून टाकलं. आज धडाम धडाम संगीताच्या जमान्यात अंगाई कुठेतरी हरवली आहे म्हणा किंवा लोप पावली आहे. पण तरीही आजही कोणत्याही भाषेतली अंगाई चुकून जरी कानावर पडली तरी आईचं मूर्तिमंत रूप डोळ्यासमोर येतं.

आशा भोसले स्वत:च्या नातवंडांना प्रत्यक्षात झोपवताना अंगाई गायच्या तीही ‘चंदामामा मेरे द्वार आना, ले के किरनों के हार आना’ म्हणत. आशाताई एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘नातीला पाठीवर घेऊन हलके हलके थोपटत हे गाणं म्हणताना त्या थोपटण्याचा नाद आणि त्या गाण्यातले लडिवाळ सूर ऐकताना ते बछडं कधी झोपी जायचं ते कळायचं नाही इतकी जादू त्या गाण्यात असायची.’

अंगाईच्या सूर आणि तालामध्ये ही जादू हटकून असते. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, खरं तर बाळाला त्याच्या इवल्या इवल्या वयात सूर म्हणजे काय ते माहीत नसतं. गाण्याच्या एकाद्या तालावर त्यालाही थिरकावंसं, डुलावंसं वाटतं म्हणजेच ताल त्याच्या परिचयाचा असतो. ह्याचाच अर्थ बाळाचा सुराआधी तालाचा परिचय झालेला असतो. पण तरीही अंगाईतले सूर लहानग्या बाळाच्या कानाचा आणि मनाचा वेध घेत असतात आणि त्याला ते मंत्रमुग्ध करत असतात. अंगाईमध्ये तसं पाहिलं तर तालाची आकर्षक आतषबाजी नसते. तिथे सगळा सुरांचा मामला असतो. बाळ त्या सुरात रमता रमता झोपी जातं आणि तिथूनच त्याची सुरांशी ओळख व्हायला सुरूवात होते.

आता ह्या पार्श्वभूमीवर अंगाईकडे पाहिलं की आजवर आपण ऐकलेली अंगाई बरंच काही सांगून जाते. ‘सदमा’ ह्या सिनेमातली ‘सुरमयी अ‍ॅखियों में, नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे’ ही अंगाई तर अंगावर शहारा आणते. त्यातली ‘रा री रा री ओ रा री रू’ ही सुरावट तर जीवाची पुरती घालमेल करते. इलियाराजांना त्यावेळी दक्षिणेतले हृदयनाथ मंगेशकर म्हटलं जायचं. त्यांनीच ‘सदमा’ला संगीत दिलं आहे. ही अंगाई करताना त्यांनी संगितातलं आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं होतं. मुळात ‘मुण्ड्रमपिराई’ ह्या तमिळ सिनेमासाठी जेव्हा इलियाराजांनी ही अंगाई केली तेव्हा ‘सुरमयी अंखियों में’ ह्या शब्दांच्या जागी ‘कन्ने कलाइमाने’ असे शब्द होते. तिथेही ही अंगाई त्यांनी येशू दासजींकडून गाऊन घेतली आणि ‘सदमा’तली अंगाई गातानाही त्यांनी येशू दासनाच बोलावलं. येशू दासनीही त्या अंगाईला अगदी काठोकाठ न्याय दिला आहे. खरंतर ‘सदमा’ हिंदीमध्ये करताना इलियाराजांना ह्या अंगाईसाठी एखाद्या बाईच्या आवाजात ती गाऊन घ्यावी असं सुचवण्यात आलं होतं. पण इलियाराजांना ती सूचना पसंत पडली नाही. त्यांनी अंगाई बाईच्याच आवाजात का? पुरूषाच्या आवाजातही होऊ शकते असं आपलं म्हणणं मांडलं. इतकंच नव्हे तर त्यांनी तमिळ भाषेत आपली ती अंगाई ज्या येशू दासजींकडून गाऊन घेतली त्या येशू दासजींकडूनच ‘सदमा’तलीही अंगाई गाण्यासाठी आग्रह धरला…आणि खरोखरच ‘सदमा’तली येशू दासजींच्या आवाजातली ती अंगाई लोकांची लाडकी झाली.

अंगाईचा हा सिलसिला तसा जुनाच आहे. ‘अलबेला’मधली ‘धीरे से आ जा रे अंखियन में, निदिया आ जा रे आजा’ ही अंगाईही तशी खूप जुनीच आहे, पण आजही त्या अंगाईतल्या करूण सुरांची मोहिनी कायम आहे. सी. रामचंद्रनी ही अंगाई करताना त्यातले ‘धीरे से’ हे पहिले दोन शब्द लक्षात घेतले आणि आपण सगळेच निद्रादेवीला हळूहळू शरण जातो हे लक्षण त्या शब्दांशी जुळवून पाहिलं…आणि त्याप्रमाणे ह्या गाण्याची चाल केली. त्या काळात तर ती अंगाई सर्वतोमुखी झालीच, पण त्यानंतर मधल्या एका काळात जेव्हा अचानक ‘अलबेला’ हा सिनेमा पुन्हा लोकांसमोर येऊन गाजला तेव्हाही ह्या अंगाईने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकलं.

मराठीमध्ये 1977 च्या सुमारास ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ हा सिनेमा आला तेव्हाच्या एका जनमानसाने तो कौटुंबिक सिनेमा प्रचंड डोक्यावर घेतला होता. त्यातली ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ ही अंगाई तर तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. एन. दत्तांचं संगीत त्याला लाभलं होतं. त्या सिनेमातली तशी एकूण सगळीच गाणी गाजली होती, पण त्यातली ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ ही अंगाई त्यावेळी जरा जास्तच भाव खाऊन गेली होती. ह्या अंगाईच्या मुखड्यातली ‘आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही’ ही दुसरी ओळ तर मनाला जास्तच स्पर्शून जाणारी होती.

तो काळ ध्वनिमुद्रिकांचा होता. नेमकी ह्याच सुमारास ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिमुद्रिका बाजारात आली. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या ह्या ध्वनिमुद्रिकेतही एक अतिशय हृदयस्पर्शी अंगाई होती. ‘गुणी बाळ असा जागशी का रे वाया, निज रे निज शिवराया’ असे त्या अंगाईचे शब्द होते. लता मंगेशकरांच्या बहराच्या काळात गायलेली ती अंगाई गाण्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या कित्येक रसिकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करून गेली होती. त्या अंगाईतली ‘ते आले रे तुजला बाळ धराया’ ही ओळ तर लतादीदी अशा काही गाऊन गेल्या आहेत की कुणाच्याही काळजात बारीकशी कळ उमटून जाते.

अशीच मराठीतली एक अंगाई आहे ती ‘निज माझ्या नंदलाला.’ लता मंगेशकरांच्या आवाजातली ही अंगाई तेव्हा भावगीतांवर प्रेम करणार्‍या संगीतरसिकांच्या कानामनाचा ठाव घेऊन गेली होती. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या ह्या अंगाईतली एक ओळ होती – ‘झोपल्या गोठ्यात गाई, साद वा पडसाद नाही.’ लता मंगेशकरांनी ही ओळ इतक्या आर्त सुरांत गायली आहे की नीरव शांततेतलं गावाकडलं ते गोठ्यातलं वातावरण आपल्या डोळ्यांसमोर हुबहू उभं राहतं.

अशीच एक अंगाई होती ती मुकेशजींच्या आवाजातली. त्याचे शब्द होते ‘ल ला ल ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्नी करे तमाशा.’ मुकेशदांच्या आधीच करूण आवाजातली ही अंगाई ऐकताना वातावरण अधिक करूण करून जायची. ही अंगाई फार काही गाजली नाही, पण आज जेव्हा कधी अंगाईचा विषय निघतो तेव्हा ही अंगाई आठवल्याशिवाय राहत नाही.

असो, त्या काळातली अंगाई गीतं आजही लोकांच्या कानामनात रुजून आहेत, फक्त प्रश्न इतकाच आहे की आजच्या संगीतकारांना, गीतकारांना आजच्या काळातली एखादी अंगाई का करावीशी वाटत नाही? त्यांच्या मुलाबाळांना ते अंगाई गाऊन झोपवत नाहीत का?

First Published on: February 17, 2019 4:05 AM
Exit mobile version