अशी घडली ‘कमला’

अशी घडली ‘कमला’

 कमला मालिका असो किंवा मग नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली कट्टी बट्टी मालिका. दोन्ही मालिकांनी मला अभिनेत्री म्हणून घडवल्याचं अश्विनी सांगते. त्यातही कमला ही मालिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ही माझी पहिलीच मालिका संपून बराच काळ लोटला. त्यानंतर माझ्या दुसर्‍या मालिकेने अर्थात कट्टी बट्टीनेही आता प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. पण लोक आजही ‘कमला’ला विसरले नाहीत. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ही खूप सुखावणारी बाब आहे. अर्थात कट्टी बट्टी मालिकेतील ‘पूर्वा’ या माझ्या पात्रावरही लोकांनी तितकंच प्रेम केलं. ग्रामीण भागात वाढलेली पण शिक्षणाची ओढ असलेली आणि पीएचडी पूर्ण करण्याचा ध्यास उराशी बाळगणारी पूर्वी (अप्पू) प्रेक्षकांना भावली. पूर्वा हे कॅरेक्टर माझ्या स्वत:च्याही तितकंच जवळचं आहे. पण जसा पहिला पाऊस, पहिली कविता, पहिलं प्रेम जास्त जवळचं असतं, त्याप्रमाणेच कमला ही माझ्या अधिक जवळची आहे.

अशी घडली कमला…

कमला हे मूळ नाटक ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी लिहीलं आहे. एवढ्या दिग्गज व्यक्तीचं लिखाण आपल्याला मालिकेत जिवंत करायचं आहे. त्यातही मध्यवर्ती पात्र साकारायचं आहे. ही भावनाच खूप वेगळी होती. आनंद तर होताच पण त्यासोबतच दडपणही तितकंच होतं. पहिलीच मालिका असल्यामुळे आपण हे करु शकू का? अशी भीती मनात होती. त्यातही कॅरेक्टर, कॅरेक्टरची भाषा, तिचा पेहराव सगळंच वेगळं. ‘कुणी काही म्हणा, पण प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की मी स्क्रीनवर ग्लॅमरस दिसावं, छान शिफॉनची साडी नेसून एखाद्या रोमँटिक हिरो सोबत बर्फिली वादीयोंमे गाणं शूट करावं…’ पण कमला हे या फँटसीच्या अत्यंत उलट पात्र होतं. छोट्याशा कुठल्या तरी गावामध्ये राहणारी, ऐरणी भाषा बोलणारी, साधासा पेहराव करणारी खेड्यातली मुलगी- कमला.

कमलाच्या ऑडिशनसाठी कॉल आला त्यावेळी मला खरं वटलं नव्हतं की मला अशाप्रकारची एखादी भूमिका मिळेल. कमलासाठी मी एकूण चार वेळा ऑडिशन दिलं. त्यानंतर माझ्या वेगवेगळ्या लूक टेस्ट झाल्या. ऑडिशन वेळी मला देण्यात आलेल्या स्क्रीप्टमधले संवाद अर्धे मराठी आणि अर्धे हिंदीत होते, त्यांना ऐरणी भाषेचा लहेजा होता. त्यावेळी मला ‘कमला’ नको कमलाच्या बहिणीचा किंवा तिच्या मैत्रिणीचा रोल द्या, अशी माझी मानसिक स्थिती झाली होती. मात्र, कमला सारखी ताकदीची आणि चॅलेंजिंग भूमिका साकारणं माझ्याच नशीबात होतं, त्यामुळे कमलासाठी माझं नाव नक्की करण्यात आलं.

‘कमला’ इतकी लोकप्रिय होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अनेक प्रेक्षकांचा तर मालिका संपेपर्यंत असाच समज होता की मी अभिनेत्री अश्विनी कासार नसून मूळातच एक खेड्यात राहणारी मुलगी आहे. या मुलीला खास या मालिकेसाठी शहरात आणलं आहे. कमला साकारण्यामागचं सगळं श्रेय मी माझ्या सहकलाकारांना आणि दिग्दर्शकांना देते. ज्याप्रमाणे मालिकेमध्ये कमलाचे मालक तिला सांभाळून घेतात. त्याचप्रमाणे अश्विनी कासारलाही सेटवर वेळोवेळी सांभाळून, समजून घेतलं जायचं. माझ्या सहकलाकारांनी आणि विशेषत: दिप्ती ताईने (अभिनेत्री दिप्ती समेळ) कमला साकारण्याच्या प्रवासात मला खूप मदत केली.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

मी संयुक्त कुटुंबात अर्थात जॉईंट फॅमिलीमध्ये लहानाची मोठी झाले. आजही आम्ही सगळेजण एकत्र एका घरामध्ये राहतो. मात्र, मोठ्या कुटुंबातही मला अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी कधीच कोणी विरोध केला नाही. माझं ‘एलएलबी’चं (वकिलीचं) शिक्षण पूर्ण झालं आहे. मात्र, तरीही अभिनय क्षेत्रात न जाता तू वकिलीच कर अशी सक्ती मला कुणीच केली नाही. उलट तुला अभिनय क्षेत्राची आवड असेल तर त्यातच करिअर कर, असा पाठिंबा कायम घरातून मिळाला. त्यातही विशेष नातं होतं आजीशी. आज आजी नाही, पण जुन्या पिढीची असूनही तिने मला कायम खंबीर पाठिंबा दिला. माझे आजोबी ऐरणी भाषेतील नाटकं लिहायचे. त्यामुळे आपल्या घरातील कलेचा वारसा, आपली नात पुढे चालवते आहे. याचा तिला खूप अभिमान होता. मी भरतनाट्यममध्ये विशारद पदवी प्राप्त केल्याचंही आजीला कौतुक होतं. माझ्या घरच्यांचं नेहमी एकच म्हणणं असतं, कामासाठी किंवा शूटसाठी जिथे जायचंय जा…पण वेळेवर आणि पोटभर जेवून जा. कामामुळे माझ्या जेवणाची हेळसांड होऊ नये, याकडे त्यांचं नेहमी लक्ष असतं.

‘कट्टीबट्टी’मुळे इच्छा पूर्ण झाली

एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तसंच दिल दोस्ती दुनियादारी, रुद्रम अशा एकाहून एक लोकप्रिय आणि दर्जेदार मालिका देणारे दिग्दर्शक- विनोद लव्हेकर, यांच्यासोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती. कट्टी बट्टी मालिकेमुळे विनोद सरांसोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. विनोद लव्हेकरांसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. कट्टी-बट्टीतील गावाकडची पूर्वा साकारताना तो अभिनय वाटायला नको, हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. मालिकेच्या सेटवरील सगळ्यांची आणि विशेषत: विनोद लव्हेकरांची या प्रवासात खूप साथ मिळाली. कट्टी बट्टी मालिकेदरम्यानचा एक प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. मालिकेतील अप्पांसोबत माझा पहिला सीन होता. पूर्वा अप्पांची माफी मागते आहे. असा सीन होता. एक डिसेंबरचा दिवस होता. भावनिक सीन असल्यामुळे आम्ही त्याचा सराव करत होतो. त्याचवेळी माझे आजोबा वारल्याचं मला समजलं. त्यानंतर मला रडूच आवरेना. सुरुवातीला मी कॅरेक्टरमध्येच घुसले आहे. असंच सर्वांना वाटलं पण ज्यावेळी सत्य समजलं त्यावेळी सर्वांनी मला घरच्यांप्रमाणे सांभाळून घेतलं. या मालिकेने मला खूप काही शिकवलं. कट्टी-बट्टीमुळे एक अभिनेत्री म्हणून माझी माझ्याशी नव्याने ओळख झाली.

‘नाटक’ कायमच पहिली निवड

मी दोन मालिकांमधून अभिनय केला आहे. शिवाय शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे. मात्र माझी सुरुवात नाटकापासूनच झाली आहे. नाटक हे कायमच माझं पहिलं प्रेम आणि पहिली आवड राहिली आहे. आजही असे असंख्य मराठी प्रेक्षक आहेत, जे पदरचे पैसे खर्च करुन नाटक पाहायला येतात. एखादं नाटक चालत नसेल तरी त्याचा विषय समजून घेण्यासाठी, त्यातील कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी अनेकजण आवर्जून नाट्यगृहात येतात. अशा प्रेक्षकांकडून तुम्हाला तुमच्या अभिनयासाठी मिळालेली दाद ही एखाद्या पुरस्काराइतकीच महत्वाची असते. नाटकात काम करणं हा खूप सुंदर अनुभव असतो. नाटक हे कलाकाराला खर्‍या अर्थाने घडवत असतं. मी अजून एवढी मोठी कलाकार झालेली नाही, की जिथे मला नाटक, सिरिअल आणि सिनेमा या तीन पर्यायांपैकी काहीतरी एक निवडावं लागेल. मात्र, मी खात्रीने आणि अभिमानाने सांगते की ज्यादिवशी मी ती उंची गाठेन, त्या दिवशी मी नाटकालाच प्राधान्य देईन. नाटकावरचं माझं प्रेम कधाही कमी होणार नाही.

First Published on: September 30, 2018 12:46 AM
Exit mobile version