स्मरणरंजनाचा हा घ्या पुरावा!

स्मरणरंजनाचा हा घ्या पुरावा!

vinyl record player

साठी पार केलेला माझा पत्रकार मित्र म्हणाला, तू स्मरणरंजनावर म्हणजे नॉस्टॅल्जियावर लिहितोस, आम्हाला ते आवडतं, पण हल्लीच्या तरुण मुलांना ते आवडत नाही. मी त्याचं म्हणणं अगदी निकालात काढलं नाही, पण त्याच्यावर विचार करता करता टीव्ही लावला. समोर ’सूर नवा, ध्यास नवा’ नावाचा संगीतावरचा रिअ‍ॅलिटी शो आला. दोन वेण्या घालणार्‍या वयातल्या पोरी आणि मिसरूडसुध्दा न फुटलेली पोरं त्यात गात होती. डोळे मिटून, सुरतालाच्या पोटात शिरून, स्वत:च्या धुनकीत, पण मन भरून ती पोरं गाणं गात होती. श्रीनिवास खळे, सुधीर फडके, यशवंत देव, ग.दि. माडगुळकर, मंगेश पाडगावकर अशा दिग्गजांची गाणी ही या पोराटोरांच्या गळ्यातून साकार होत होती. आता मनात विचार आला की हे सगळे दिग्गज आपला जो काळ गाजवून गेले तो काळ पंचवीस वर्षांपेक्षाही अधिक मागचा. म्हणजेच या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गाणार्‍या या पोराटोरांच्या जन्माच्याही खूप आधीचा. ह्या पोराटोरांनी कुठे पाहिलीत ही दिग्गज मंडळी! या दिग्गजांच्या संगीताच्या कारकिर्दीत ही पोरंटोरं कुठून असणार?…पण आज रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती गाताहेत कुणाची गाणी तर ह्या दिग्गजांचीच!…एका अर्थी ही कोवळी पोरं संगीतातलं हे स्मरणरंजन म्हणजे नॉस्टॅल्जिया जागवत नाहीत तर काय नव्या युगाचा महिमा गातात की काय?

नंतर मी पहात होतो तर त्या मुलांनी गायलेल्या गाण्यांपैकी ऐंशी टक्के गाणी ही जुन्या गाण्यांपैकी होती. आता माझ्या दृष्टीने जुनी असलेली ही गाणी त्यांच्या दृष्टीने तर ती साफ जुनाट असायला हवीत, पण तरीही ही तरणीताठी मुलं जर त्यांच्या काळातल्या नव्याकोर्‍या गाण्यांपेक्षा जुन्या काळातल्या गाण्यांना ऐशी टक्के प्राधान्य देत असतील तर नव्या क्षितिजावरल्या नव्या तार्‍यांना ते जुनाट अजुनही भुरळ घालत आहे, असाच त्याचा अर्थ होत नाही का? ह्याचाच अर्थ हे नवं क्षितिज जुनाटाच्याच प्रेमात पडून ’तुला पाहते रे’ गात आहे, अशा निष्कर्षाप्रत कुणी आलं तर त्यात चुकलं काय!

माझ्या मनात हे विचारचक्र सुरू असतानाच त्या रिअ‍ॅलिटी शोमधल्या एका चैतन्य देवळे नावाच्या मुलाने बोबडी गवळण सुरू केली. शब्द होते – जाय बा किस्ना आता गड्या मी येईना तुमच्या संगती ना बा! ही गवळण तर किती जुनी! पण त्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गात होता कोण तर तो अगदी कोवळा पोरगा…आणि त्या गाण्याचा तो इतका आनंद घेऊन आणि रंगात येऊन गात होता की गाणं संपल्यावर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

बरं, सगळंच्या सगळं स्मरणरंजन म्हणजे रद्दीत टाकलेली जुनी वर्तमानपत्रं नाही. काही स्मरणरंजन म्हणजे अजरामर कलाकृती ठरलेल्या आहेत. त्यांचं स्मरण म्हणजे एक अवीट गोडवा ठरलेला आहे. त्याचा आस्वाद घेत जगण्याची मजा घ्यायची नाही तर काय तात्कालिक ंठरणार्‍या नव्याकडून आयुष्याला नुसता पुसट स्पर्श करून घ्यायचा की काय!?

-सुशील सुर्वे
(लेखक संगीतविषयाचे अभ्यासक आहेत)

First Published on: December 9, 2018 4:35 AM
Exit mobile version