नातं राखीशी

नातं राखीशी

प्रातिनिधिक चित्र

रक्षाबंधन हे भावाबहिणीचं अतूट नातं. बहीण भावाचं नातं अगदीच वेगळं. त्यात आदर तर असतोच पण आदराबरोबर येतात त्या खोड्या. एकमेकांविषयी असूयाही असते आणि तितकंच प्रेम आणि काळजी. वयात कितीही अंतर असो हा गोडवा कधीच कमी होत नसतो. या बंधनासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही सण कमीच पडतील असं म्हटलं तर वावगं नक्कीच ठरणार नाही. अर्थात नक्की आपल्या राखीशी नातं कसं असतं? मुळात ही प्रथा तरी कशी सुरू झाली?
राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणार्‍या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह आणि परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. दरम्यान काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना राखी बांधते.

आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच या मागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. त्यानंतर सर्व ठिकाणी बहीण आपल्या भावांना राखी बांधून ते प्रेम बंधनात बांधून ठेऊ लागल्या. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने भगवान विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा पडली, असे पूर्वानुपार सांगितले जाते. दरम्यान, अशा अनेक आख्यायिका आहेत. पण नेमकं हे राखीचं नातं जपण्याचा सण केव्हापासून सुरु झाला याची ठोस माहिती मात्र नाही. पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम आणि सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणी असावाच ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते. ती कृष्णाचे रूप आपल्या भावात पाहत असते. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेशही राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते.

“राखी’ या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. त्यालाच राखीचं नातं असं म्हटलं जातं. अर्थात हे नातं केवळ बहीण आणि भावापुरतं मर्यादित मानलं जातं. पण तसं नाही. कितीतरी असे लोक आहेत जे एकमेकांचं रक्षण आणि सांभाळ करत असतात. खर्‍या अर्थाने त्यांना राखी बांधून हे नाते साजरे करता येते. इतकंच नाही तर कितीतरी अशा बहिणी आहेत, ज्यांचे भाऊ त्यांच्यापेक्षा बर्‍याच वर्षांनी लहान असतात. त्यामुळे बर्‍याचदा भावाने त्यांचे रक्षण करण्याऐवजी त्यांनाच मोठे होऊन आपल्या भावाचा सगळ्या गोष्टींपासून सांभाळ करावा लागतो. त्यावेळी जर भावाने आपल्या बहिणीला राखी बांधली तर त्यातंही काहीच वावगं नाही. राखी या नात्याचा अर्थ रक्षण करणे. जर एखादी बहीण आपल्या भावाचे रक्षण करत असेल तर तो त्याच्यासाठी अभिमानाचाच भाग आहे. त्यामुळे हे नाते जपण्यासाठी केवळ समाज काय म्हणतो आहे हे न पाहता नक्की तुमच्या राखीचे तुमच्याशी काय नाते आहे हे पाहणं जास्त गरजेचे आहे.

स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहीण असोत किंवा मानलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र आणि खरी असते. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते आणि त्याला ओवाळते. इतकेच नाही प्रत्येक आई आपल्या मुलाला लहानपणी चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. हे मानले तर एक बंधन आहे आणि तेही हवेहवेसे वाटणारे बंधन. सहसा माणसाला बंधने नको असतात. पण राखी हे असे एक नाते आहे ज्याचे बंधन प्रत्येक भावा – बहिणीला मनापासून हवेसे असते. भाऊ कितीही लहान असो वा बहीण कितीही मोठी असो. एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरुपी उभे असण्याची ग्वाही अर्थातच हे नातं राखीशी.

First Published on: August 22, 2018 12:00 AM
Exit mobile version