आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा

आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा

बिरसा मुंडा यांचा आज स्मृतिदिन. बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींकडून इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने केली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चरवण्याचे काम करायचे. तेही वडिलांसोबत रानात जावून धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. पुढे मुंडा प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.

वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळ्या धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा. बिरसा मुंडा यांनी १९०० मध्ये इंग्रजांविरूद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले ‘आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारत नाही.

जो इंग्रज आमच्याविरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली, बिरसा मुंडास पकडून देणार्‍यास त्या काळी ५०० रुपये बक्षीस जाहीर केले. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले. त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. अशा या महान क्रांतिकारकाचे ९ जून १९०० रोजी निधन झाले.

First Published on: June 9, 2022 5:25 AM
Exit mobile version