तिरंग्याखालचा अंधार!

तिरंग्याखालचा अंधार!

राष्ट्रध्वज

रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मुंबईतल्या रेल्वेच्या सगळ्या प्रश्नांवर एक जालीम उपाय शोधलेला आहे… देशभक्तीचा. त्यांनी आता रेल्वे स्टेशनांच्या परिसरात राष्ट्रध्वज फडकवायचा पण केला आहे… त्याने रेल्वेने प्रवास करणार्‍यांच्या मनात राष्ट्रभक्ती जागी होईल, अशी त्यांना खात्री आहे. जुन्या कॉमेडी हिंदी सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्लायमॅक्सच्या पळापळीत कोणीतरी एक माणूस उठून काहीतरी बोलायला लागतो किंवा काहीतरी करायला लागतो, तेव्हा नायक किंवा व्हिलन यांच्यापैकी कोणीतरी उठून त्याच्या तोंडावर, नाकावर क्लोरोफॉर्मचा बोळा दाबून धरतो… मग गरगरल्यासारखं होऊन तो मनुष्य कोसळतो… तो क्लोरोफॉर्मचा बोळा सध्या देशभक्तीच्या रूपाने फिरवला जातो आहे.

कोणालाही कसलेही जीवनविषयक प्रश्न पडायला लागले, ज्या विकासाच्या घोषणांना भुलून आपण मतं दिली, त्या विकासाचं काय झालं, काळ्या पैशाचं काय झालं, करदात्यांना मिळायलाच हव्यात त्या सुखसुविधांचं काय झालं, महंगाई की मार कमी होण्याऐवजी वाढली कशी, राफेलच्या विमानांचं नेमकं प्रकरण काय आहे, कोणा नेत्याच्या मुलाच्या कंपनीची 1600 पट भरभराट कशी झाली, महानगरांच्या वाढत्या बकालीला वेसण कधी घातली जाणार, असे अडचणीत आणणारे प्रश्न पडून माणूस चिरडीला आला, ते प्रश्न विचारू लागला की कोणी देशभक्तीचा क्लोरोफॉर्म हुंगवतो, कोणी राममंदिराचा, कोणी मराठी अस्मितेचा. कोणा एकाला आपल्या नावापासूनच नामांतराची सवय जडलेली आहे. काळच असा आहे की कोणीही गणागणपा स्वत:ला साधू, योगी, महाराज, गुरू, ट्रिपलश्री इतकंच काय तर ओसाडगावचा शंकराचार्यही म्हणवून घेऊ शकतो. त्यामुळे हे नामांतरपटू शहरांची नावं बदलत फिरतात. हा यांचा क्लोरोफॉर्म. आपण काहीतरी फार मोठा ऐतिहासिक पराक्रम केल्याचा आनंद मिळतो त्यांना त्यातून. यांचे फारसी आडनावाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजून यांच्या नजरेला पडलेले दिसत नाहीत. बर्फगोळेवाल्याच्या गाडीवर जसे एका गोळ्यावर तीन रंगांची, चवींची सरबतं ओतून दिली जातात, तसे काही लोक तिन्ही फ्लेवर घेऊन फिरतात क्लोरोफॉर्मचे. तुमच्या पसंतीचा फ्लेवर हुंगा आणि गप्प बसा!

तर आता मुंबईच्याही काही उपनगरी स्टेशनांमध्ये तिरंगा फडकणार आहे.
यात काही कायद्याने गैर आहे का?
अजिबातच नाही. राष्ट्रध्वजाविषयीचा नवा कायदा तो ठिकठिकाणी फडकवण्याची मुभा देतोच.
राष्ट्रध्वज उभारल्याने काही नुकसान आहे का?
नाही. अजिबातच नाही.
राष्ट्रध्वज पाहिल्यानंतर लोकांच्या मनात देशभक्ती दाटणार नाही का?
दाटेलच की! काहींची छाती तर छप्पन्न इंचाची होईल.
मग कुणी रेल्वे स्टेशनांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची कल्पना मांडली तर तिची थट्टा उडवण्याचं कारण काय?

राष्ट्रध्वज फडकावण्यावर तावातावाने बोलून गावाला देशभक्ती शिकवणार्‍यांच्या वैचारिक पितृसंस्थेचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग शून्य होता. त्यांच्या स्वप्नातला अखंड भारत मिळेपर्यंत हे स्वातंत्र्य विखंडित आहे, असं म्हणून त्यांनी तिरंगा फडकावणंही टाळलं. हे राष्ट्र एका धर्माच्या प्राबल्याचंच राष्ट्र आहे आणि त्याचा ध्वज हाच खरा ‘राष्ट्रध्वज’ आहे, ही त्यामागची भावना होती आणि आहे. असे लोक देशभक्ती शिकवतायत, हे आपण एकवेळ सोडून देऊ. त्यांना जनता खूप काळाने संधी देते आणि खूप लवकर विटते. त्यामुळे त्यांना सगळीच घाई लागलेली असते, ते स्वाभाविक आहे.

आपल्यासाठी कळीचा प्रश्न काय आहे? स्टेशनात राष्ट्रध्वज दिसला, देशभक्तीने छाती फुलून आली, म्हणून पुढे काय काय घडणार आहे?

आपल्या मागणीसाठी गर्दीच्या वेळी लोकांची अडवणूक करून संप केला, तर देशाचं केवढं नुकसान होतं, याचं भान ठेवून मोटरमन संप करायचे बंद होणार आहेत. कुठल्यातरी फुटकळ विषयावरून आंदोलन करण्याच्या नावाखाली लोकल अडवून त्यांच्यासमोर उभे राहून फोटो काढून घेणारे पुढारी आणि कार्यकर्ते आपल्या देशबांधवांची अडवणूक थांबवणार आहेत? स्टेशनांचा परिसर हा प्रवाशांच्या येण्याजाण्यासाठी आहे. तिथे आपण धंदा लावून कोंडी करू नये, असं वाटून फेरीवाले आपणहून उठणार आहेत? आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी भ्रष्टाचार बंद केला पाहिजे, असं वाटून रेल्वेचे आणि बाहेरचे पोलिस फेरीवाल्यांकडून हप्ता घेणं बंद करणार आहेत? आपल्या देशबांधवांना कसं लुटायचं म्हणून पाकीटमार पाकीट मारायचे थांबणार आहेत, मोबाइल चोरायचे थांबणार आहेत? ट्रेन पकडण्यासाठी बाहेर उभे असलेले लोक हे माझे देशबांधव आहेत, त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे, असं वाटून लोकलचं गेट अडवून उभे राहिलेले हवाखाऊ प्रेमाने आत यायला जागा देणार आहेत? अपंगांच्या डब्यातून धडधाकट मंडळी निलाजर्‍यासारखी प्रवास करणं थांबवणार आहेत? येताजाता पचापच थुंकणारे लाळीव लोक्स पिकदाणी सोबत घेऊन फिरणार आहेत की गुटखा खाणं बंद करणार आहेत? हायफाय ट्रेनमधून प्रवास करणारे लोक ब्लँकेटांपासून हेडफोनपर्यंतच्या वस्तू चोरायचे थांबणार आहेत? उलट यांच्यातला प्रत्येकजण स्टेशनातल्या तिरंग्याला कडकडीत सलाम ठोकून नंतर दुप्पट जोमाने आपल्या देशाची वाट लावण्याच्या, इभ्रत घालवण्याच्या धंद्याला लागेल. त्यांना देवळात घंटा वाजवून किंवा देवापुढे दोन थोबाडीत मारून घेऊन दिवसभराच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि नवी पापं करण्याची शक्ती मिळते. प्रत्यक्ष देवालाही ते लाच देऊन गप्प करतात, तिथे देशाची काय कथा! मग त्या तिरंग्याला सलाम ठोकून उपयोग काय?

हे सगळं केल्याने आपल्या समाजाची, देशाची अब्रू जाते, असा देश, किंवा खरंतर त्यातले काही मोजके भाग्यवंत लोक गडगंज श्रीमंत झाले, तरी देश काही कधीही खर्‍या अर्थाने प्रगत होत नाही. महासत्ता वगैरे तर फारच दूर.

जिथे लोकांमध्ये इतकी वरवरची दिखाऊ देशभक्ती जागवायलाही जिथे तिथे राष्ट्रध्वज फडकवावे लागतात, तिथे रेल्वे स्टेशनांवर किंवा इतर ठिकाणी तिरंगे फडकवून उजेड पडण्याऐवजी त्यांच्याखालचा अंधारच गडद होणार, यात शंका काय?

-मुकेश माचकर

First Published on: November 18, 2018 5:27 AM
Exit mobile version