वर्‍हाडी भाताचे प्रकार

वर्‍हाडी भाताचे प्रकार

वर्‍हाड म्हणजे विदर्भ काही भातासाठी प्रसिद्ध नाही. तो गहू आणि ज्वारीचा प्रदेश, पण आंध्र प्रदेशाला लागून असल्याने म्हणा आणि भंडारा, चंद्रपूर भात पिकवणारे जिल्हे असल्याने म्हणा…तिथेही अगदी अभिनव प्रकारचे भात बनतात. माझा जन्म अस्सल विदर्भातला कारण आईवडील दोघेही तिथलेच. आमच्याकडे भाताचे खूप वेगवेगळे प्रकार बनतात. त्यातला अगदी साधा प्रकार म्हणजे… पूर्वी दुपारच्या वेळी पोरासोरांना भूक लागली की पेंड वरण आणि भात (किंवा पोळीही) देत असत. पेंड वरण म्हणजे तुरीच्या डाळीचं घट्ट वरण, त्यात कांदा चिरून किंवा खरे तर हाताने फोडून घालायचा, त्यात असली तर कोथिंबीर, मसाला, तिखट, मीठ आणि कच्चं जवसाचं किंवा शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि मग त्या वरणात कालवलेला रोजचाच साधा भात खाताना खाणार्‍याच्या चेहर्‍यावरची तृप्ती प्रत्येक घासागणिक अशी काही वाढत जाते की बस!

दुसरा भाताचा प्रकार म्हणजे…साधी डाळ आणि तांदळाची खिचडी. दिवसभर काम करून कंटाळा आला किंवा पटकन स्वैपाक उरकायचा असेल तर खिचडीचाच बेत हवा. साधे तांदूळ आणि तुरीची डाळ, चारास एक या प्रमाणात घ्यायचे. त्यात हळद आणि मीठ घालून मोकळी खिचडी पकवायची. खाताना त्या खिचडीवर कढवलेलं किंवा कच्चं तेल, संगतीला कोणतेही लोणचे, पापड, गव्हाच्या सालींचे सांडगे असले तरी रात्रीचे जेवण फक्कड जमते. अलिकडे अनेकजण कांदा, टोमॅटोची फोडणी करतात आणि तयार खिचडीत तिखट आणि मसाला घालतात आणि मग ती खिचडी त्या फोडणीत परततात. त्या खिचडीला मसाला खिचडी म्हणतात, पण हा मूळ खिचडीचा आधुनिक अपभ्रंश आहे. त्याचबरोबर ओले हरभरे, ओली तूर, मटार, किंवा पोपट्यासारख्या वाल घालूनही साधी किंवा मसाला खिचडी केली जाते.

या सगळ्या ‘खिचडी’ प्रकाराबरोबर जांभळ्या वांग्याची साधी किंवा भरलेली हिरवी भाजी आणि लाल किंवा हिरवा मिरच्यांचा वर्‍हाडी ठेचा असला म्हणजे…एक उत्तम स्वरमेळ जमलेली मैफल सजली आहे असे वाटते. नागपूर म्हटलं की जातीच्या खवैय्यांच्या डोळ्यासमोर ‘वडा भात’ येतो. मूळ पारंपारिक पध्दतीने केलेला ‘वडा भात’, सवय असल्याशिवाय खाता येणे शक्य नाही. मूग, थोडी मटकी, हरभरा, उडीद, धणे, जिरे, मेथी..असे एकत्र भिजवायचे आणि अगदीच भरभरीत वाटून त्यात आले, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घालून मोठे पसरट वडे थापून तळायचे. ते कटकटित वडे भातात कुस्करून वर फोडणीचे तेल आणि हिंगाचे पाणी घालून खायचे. वडाभाताबरोबर कढीही देतात. आता लोकांना आवडेल अशा प्रकारचे वडे करायची पध्दत आहे. हे नवे वडे अजिबात कटकटित नसतात आणि अनेकदा त्यात कांदा लसूणही घातलेले असते. वड्यांचा आकारही पूर्वीच्या मानाने बराच छोटा झालेला आहे.

वडाभातानंतरचा लोकप्रिय भात म्हणजे ‘भजे भात’, वडा भातासारखाच. कोणत्याही प्रकारची म्हणजे कांदा, बटाटा, ओव्याची पाने, चोपडे दोडक े(घोसावळी), पोईंग (मायाळू)ची भजी करतात आणि भातात कुस्करून खातात. ‘गोळा तांदूळ’ हा आणखी एक भात प्रकार. मला स्वत:ला वडा किंवा भजे भातापेक्षा हा भात अधिक आवडतो. त्यासाठी तांदळात पाणी घालून थोडा वेळ भिजवतात. नंतर पाणी निथळून तांदूळ थोडे भाजून घेतात. कढईत पाणी उकळून त्यात थोडं तेल आणि मीठ घालतात. मग उकळी आली की त्यात भाजलेले तांदूळ वैरतात. काहीजण अगोदरच मोहरी, जिरे, हिंग अशी फोडणी घालून त्यात तांदूळ परतून घेतात. गोळ्यांसाठी बेसनात थोडेसे ज्वारीचे पीठ, तीळ, जिरे, ओवा, लसूण मिरची वाटून घालतात आणि भरपूर तेल घालून घट्ट भिजवतात. काहीजण हे पीठ आंबट दह्यानेही भिजवतात आणि त्याचे छोट्या लाडूएवढे पण चपटे गोळे बनवतात. भात शिजत आला की त्यावर गोळे ठेवतात. जेव्हा भात पूर्ण शिजतो तेव्हा गोळेही शिजलेले असतात. अलिकडे लोक कुकरमध्ये गोळे वेगळे शिजवून घेतात. त्यानंतर त्या गोळाभाताला खमंग फोडणी देतात.

गोळा भात खातानाही वरून गोडलिंब घालून केलेले फोडणीचे तेल घ्यावेच लागते. गोळा भाताबरोबर आमसूलाचे किंवा चिंचेचे सार करायची पध्दत आहे. हल्ली जिर्‍याची फोडणी घातलेले ताकही घेतात. विदर्भात बहुतेकांकडे शेती असते. घरच्या डाळी कांडून झाल्या की उरलेल्या कण्यांचा भरडा थोडा वेळ पाण्यात भिजवतात. तेलाची फोडणी घालून त्यात भरडा खमंग भाजून घेतात. त्यात तीळ, लसूण आणि मिरच्या, कोथिंबीर वाटून घालतात आणि भरडा शिजवतात.
हा शिजलेला भरडा आणि मोकळा शिजवलेला भात एकत्र मिसळून परत एक वाफ आणतात. अशाच प्रकारे बेसन भातही करतात. या अशा प्रकारच्या सर्व भातांवर फोडणीचे किंवा कच्चे तेल, निखार्‍यात भाजलेली किंवा तळलेली मिरची आणि हाताने फोडलेला कांदा हवाच.
हे दोन्ही भात प्रकार प्रवासाला नेण्यासाठी पण उपयुक्त असतात. विदर्भातल्या श्रीमंत मालगुजारांकडे ताकातल्या बटाट्याचा भात केला जातो. त्यासाठी बटाट्याला टोचे मारून ते ताकात भिजवतात. बटाटे मऊ झाले की तळतात. ते तळलेले बटाटे घालून मग नेहमीसारखाच मसालेभात करतात. चंद्रपूर आणि बल्लारशाकडे होणारा, लाल मिरची, चिंच आणि भाजलेले तीळकूट घातलेला मसालेभात..खायला..तिखट पचवायची जबरी रसना हवी. पण काहीही असले तरी वैदर्भीय भात प्रकार हे विदर्भातल्या माणसांसारखेच मोकळे ढाकळे असतात. आमच्याकडे आस्सट, मऊ भात फक्त लहान लेकरे किंवा आजार्‍यांसाठी बनतो.

घरी आलेल्या कोणालाही जेऊनच जा नं आता असं घरधन्याने बायकोला न सांगता परभारे निमंत्रण दिले तरी वैदर्भीय गृहिणी पाहुण्यांसाठी आनंदाने रांधते. मग पाहुणाही साधे खिचडीचे जेवणही मिटक्या मारत जेवतो…
विदर्भातली माणसं एकूणच अल्पसंतुष्ट, आणि म्हणूनच आनंदी असतात. खावं आणि खिलवावं हा त्यांचा बाणा..त्यांचे ते सगळे स्वभाव विशेष..त्यांच्या या सगळ्या भात प्रकारांतूनही व्यक्त होतात.


लेखिका – मंजुषा देशपांडे

First Published on: March 20, 2022 5:15 AM
Exit mobile version