पाऊस निनादत होता…

पाऊस निनादत होता…

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला सहलीला म्हणून गेलो असता कोणाच्या तरी सांगण्यावरून माळीण या गावाला भेट द्यायचा प्रसंग आला. आम्ही माळीण गावी गेलो तेव्हा दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेचे पडसाद मनात ताजे होते. या दुर्घटनेचे साक्षीदार झालेले दोन-तीनजण भेटले. तेव्हा भेटले आणि त्यांनी त्यांच्या मनातली भळभळ मोकळी केली. पावसाळ्यात डोंगर कोसळून संपूर्ण गाव त्यात गाडले गेले. त्यांची ती व्यथा ऐकताना पहिल्यांदा पावसाचं हे रूप रौद्र वाटलं.

आतापर्यंत पाऊस म्हणजे मातीचा सुगंध, वाफाळलेला चहा त्याच्याबरोबर खाल्लेली कांदा भजी, मित्रांबरोबर भरपावसात रस्त्यावरून केलेली रपेट या सगळ्या गोष्टी समोर येतात. पण या माळीणच्या रहिवाशांना जरा जोराचा पाऊस पडू लागला तरी छातीत धडधडू लागतं. पावसाचा हा विचित्र अनुभव ऐकून पाऊस म्हणजे संकट, दुःखाचं प्रतीक वाटू लागतं.ज्योतिषशास्त्रात देखील स्वप्नात नदी, समुद्र किंवा तळ इतकेच काय तर पाऊस दिसला तर ते शुभशकून मानतात. पण माणसाच्या मनाची व्यथा समजून देण्यासाठी कित्येक वेळा पाऊस हे प्रतीक वापरल्याचं आपणास दिसून येईल. या पावसाचा असा विचार करताना ग्रेस यांची कविता आठवत राहते. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. कित्येक वर्षे माझी गाडीही या ‘ती’ भोवतीच अडकली होती. प्रथमता ग्रेस यांच्या कवितेतली ही ‘ती’ म्हणजे आपल्या आईच्या मृत्यू पश्चात तिच्या आठवणीत लिहिलेली कविता वाटते. पण पुढे सरकताना ही कवितेतली ही म्हणजे नक्कीच आई, पण पावसाचा संदर्भ मृत्यूशी न लावता मनातल्या द्विधा मनस्थितीला अधोरेखित करणारी ही कविता आहे. दु:खद प्रसंगाला शब्दरूप करणारी ही कविता.

ग्रेसच्या कवितेची मीमांसा न करता किंवा त्या कवितेतली ‘ती’ कोण याचा विचार न करता पावसाला किती वेगळ्या पद्धतीने बघता येऊ शकतं हे मात्र आपणाला समजू शकते. गेल्यावर्षी केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या तेव्हा पुराची ती दृश्ये पाहून पाऊस म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे यावर शिक्कामोर्तब झालं. पाऊस कधी उदासवाणा वाटतो तेव्हा मनाची ती अवस्था ही पावसातून व्यक्त झालेली असते. पण हा असा पाऊस आशादायी असतो. कोणाला तो पाऊस झेलावासा वाटतो तर कोणाला तो पाऊस नकोसा वाटतो. कदाचित म्हणूनच इंदिराअक्कांनी पावसाला विनंती केलेली आढळते.

‘ नको नको रे पावसा
असा धिंगाना अवेळी
घर माझे चन्द्रमौळी
आणि दारात सायली.

असा कोसळणारा पाऊस पडू लागला आणि पुराची परिस्थिती निर्माण होते, मग मला मधुभाई कर्णिकांची एक कथा आठवते. या कथेचा नायक म्हणजे सखाराम गवस. या सखाराम गवसाची पत्नी हे जग सोडून गेलेली असते. त्यामुळे त्याच्या दोन लहान मुलांची जबाबदारी त्याच्यावर असते. ही जबाबदारी सखाराम व्यवस्थित सांभाळत असतो. एक दिवस काही कामानिमित्त तो तालुक्याला गेलेला असतो. त्यावेळी बाजारहाट होईपर्यंत वेळ होऊन गेला. आणि अचानक धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यावरून मिळेल त्या वाटेने तो घराकडे मुलांच्या ओढीने चालत राहिला. भराभर पाऊले टाकत तो नदीपर्यंत आला. बघतो तर नदी तुडूंब भरून वाहत होती. नदी ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय त्याला आपल्या घरी जाता येणार नव्हते. नदी तर ओसंडून वाहत होती. सखारामच्या नशिबी काठावर बसून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

त्या धुवाँधार पावसाचं ते रौद्ररूप बघून आपण घरी जाऊ तेव्हा आपल्याला आपली चिमुरडी मुलं आता बघायला मिळणार नाहीत. या पावसात घरात पाणी भरलं तर मुलं या पुरात वाहून जातील असा विचार करून तो काठावर तसाच उभा राहिला. रात्र झाली. हळूहळू पावसाचा वेग कमी झाला. नदीचं पात्र हळूहळू मोकळं झालं, तसा सखाराम पाण्यात उतरला. आणि पलीकडे आला. पलीकडे आल्यावर जीवाच्या आकांताने त्याने घर गाठलं. दार उघडून बघतो तर सखारामची थोडी मोठी मुलगी आपल्या लहान भावाला घेऊन वरच्या लहान फळीवर निवांत झोपली होती. सखारामने सगळीकडे बघितलं घरात पाणीचपाणी झालं होतं. त्या पुरातदेखील देवाच्या पुढ्यात ठेवलेली बायकोच्या कुंकवाची कोयरी भिजली नव्हती.

या कथेत सखारामच्या मनातल्या जाणीवा दाखवताना मधुभाईंनी पावसाचं प्रतीक खूप सुंदर वापरलं आहे. या कथेतील पावसाचं प्रतीक ग्रेसच्या त्या कवितेइतकंच प्रभावी वाटतं. माणसाच्या मनातील दु:ख, संकट, त्यातून निर्माण होणारी व्यथा ही या माध्यमातून किती प्रभावीपणे व्यक्त होऊ शकते याचं ही कथा एक उदाहरण आहे. पाऊस जेवढा हवाहवासा वाटतो तितकाच तो नकोसा वाटू शकतो. हीच तर्‍हा उन्हाची आणि थंडीचीदेखील असू शकते. पण निसर्ग इतका प्रलयकारी होऊ शकतो यावर विश्वास बसत नाही.

वर्षभरापूर्वी जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्राचं प्रदर्शन बघायला गेलो असता एका चित्रकाराने कॅनव्हासवर पावसाच्या धारा धुवाँधार बरसताना दाखवल्या होत्या. त्या पावसात एक स्त्री उभी होती. हे चित्र बघून त्यातील चित्रकाराच्या भावना समजून घेताना त्या चित्रकाराच्या मदतीनेच त्या चित्राची उकल केली तेव्हा या पावसाच्या धारा म्हणजे केवळ त्या स्त्रीच्या भावना आहेत. त्या धारांमधून तिने भोगलेले दु:ख, व्यथा आणि मनाची द्विधा इथे दाखवली आहे. ज्योतिषशास्त्राच्या नेमकं उलट या कलावंतांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येईल.

या पावसाच्या बदलणार्‍या रूपाचा अनुभव कधीतरी आपणाला येत असतो तो अनुभव कथा, कवितेपुरता मर्यादित न राहता त्याचा संबंध वास्तवाशी लावता येऊ शकतो. मागे दोन वर्षांपूर्वी माझ्या चुलतभावाचा अठरा वर्षांचा मुलगा आजारी होता. हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर बरा होऊन घरी आला. घरातले सर्व आनंदात होते. हॉस्पिटलमधून आला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली. अतिशय धुवाँधार पाऊस पडत होता. पावसाचा वेग जसा वाढू लागला तशी का कोणास ठाऊक, पण मनाला कसली तरी रुखरुख लागू लागली. अचानक दुसर्‍या एका चुलतभावाचा फोन आला, म्हणाला, असशील तसा निघ आणि कुर्ल्याला अमूकअमूक हॉस्पिटलमध्ये ये. मी निघालो. पाऊस तर मी म्हणत होता. पाऊस वाढतोय. माझी रिक्षा हॉस्पिटलकडे जात होती; पण तो वेळ काढवत नव्हता.

रस्ता संपत नव्हता. पाऊस आता जोरात बरसायला लागला तेव्हा अचानक फोन वाजला तेव्हा कळलं, भावाचा मुलगा गेला. तो पाऊस हेच तर सांगत नव्हता? पाऊस बोलतो….पाऊस काही सांगायचा प्रयत्न करतो …..तो असंच काही सांगत तर नसावा …? अशावेळी ग्रेसची कविता आठवत राहते…
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता…….

प्रा. वैभव साटम

First Published on: June 30, 2019 4:21 AM
Exit mobile version