व्हेलेंटाईन डे का साजरा करतात ?

व्हेलेंटाईन डे का साजरा करतात ?

दरवर्षी जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगुलांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देऊन काहीजण आपल्या भावना जोडीदाराप्रती व्यक्त करतात. प्रेम, मैत्री आणि जवळीकता यांचा सुंदर मिलाप असलेल्या या दिवसाला ऐतिहासिक महत्व आहे. पण हा दिवस जरी प्रेमी युगुल साजरा करत असले तरी हा दिवस तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणींबरोबरही सेलिब्रेट करू शकता असे का हे जाणून घेण्यासाठी व्हेलेंटाईन डे बद्दल जाणून घेऊया.

तिसऱ्या शतकात रोममध्ये एक संत व्यक्ती होती. व्हेलेंनटाईन असे त्यांचे नाव. त्यांच्या नावावरूनच १४ फेब्रुवारीला व्हेलेंनटाईन डे हे नाव देण्यात आले आहे. व्हेलेंनटाईन हे कॅथलिक धर्मगुरू होते. त्यांच्या काळात अनेक रोमन व्यक्तींचे धर्मांतरण करण्यात आले व त्यांना ख्रिस्ती बनवण्यात येत होते. पण सम्राट क्लॉडीयस २ यांना हे मान्य नव्हते. यामुळे त्यांनी कठोर नियमावली जारी केली. रोमन सैनिक हे देशभक्त असावेत असा त्यांचा हट्ट होता. विवाहामुळे त्यांचे ध्येयापासून लक्ष विचलित होईल अशी भीति सम्राट यांना होती. त्यामुळे त्यांनी सैनिकांना लग्न करण्यास मज्जाव केला. यामुळे सैनिक नाराज झाले होते. यावर संत व्हेलेंटाईन यांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी सैनिकांचे त्यांना आवडणाऱ्या तरुणींबरोबर ख्रिश्चन पद्धतीने गुपचुप लग्न लावून देण्यास सुरुवात केली. यामुळे रोमन समाजात प्रेमाचे वारे वाहू लागले.

सम्राट क्लॉडियस यांच्या विरोधात संत व्हेलेंनटाईनने सुरू केलेल्या या बंडामुळे सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर क्लॉडियस यांच्या हुकुमावरून व्हेलेनटाईनला तुरुंगात टाकण्यात आले. पण व्हेलेंनटाईन यांनी तेथेही प्रेमाचा प्रचार सुरू केला. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने तुरुंगाधिकाऱ्याच्या अंध मुलीला दृष्टी मिळवून दिली. तसेच त्यांच्या सोबत शिक्षा भोगणाऱ्या इतर कैद्यांचीही व्हेलेंनटाईन यांनी शुश्रुषा केली. यामुळे तुरुंगाबाहेरही व्हेलेंनटाईन याची ख्याती पसरली. व्हेलेनटाईन यांची ही कृती म्हणजे क्लॉडीयस यांच्याविरोधातील बंड आहे असे सगळीकडे पसरवण्यात आले आणि सम्राटाविरोधात बंड करण्याची शिक्षा म्हणून व्हेलेंनटाईन यांना १४ फेब्रुवारी २७० साली मृत्यूदंड ठोठावण्यात आला. त्यानंतर जगभरात १४ फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

.

First Published on: February 12, 2020 8:00 AM
Exit mobile version