संपादकीय : माती आणि माणसातला माणूस!

संपादकीय : माती आणि माणसातला माणूस!

संपादकीय

लेखक, दिग्दर्शक, विचारवंत आणि अभिनेते असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले गिरीश कर्नाड आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. दीर्घ आजाराने त्यांचे बंगळुरूमध्ये निधन झाले. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत कर्नाड यांच्यासारखा समाजाशी घट्ट नाळ असलेला माणूस आपल्या पाठीशी असणे खूप आवश्यक असते, पण घरातील आज कर्तासवरता मागे उभा नाही, ही पोकळी अस्वस्थ करून जाणारी आहे. मराठी साहित्य, संस्कृती, नाटक आणि मराठी माती तसेच येथील माणसे यांच्याविषयी कन्नड माणसांइतकी त्यांना आपुलकी होती. याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म आणि शिक्षण हे महाराष्ट्रात झाले. माथेरान येथे कोकणी कुटुंबात जन्म झालेल्या कर्नाड यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. मराठी मातीतीत संस्कार शेवटपर्यंत ते विसरले नाहीत. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट आणि सांस्कृतिक जगतात होणार्‍या प्रयोगाविषयी त्यांना सतत आस्था असे आणि ते प्रयोग त्यांनी कर्नाटकात करण्याचा कायम प्रयत्न केलाच, पण त्याहीपेक्षा आणखी काही सकस देण्याची त्यांची धडपड होती. यामुळेच त्यांच्या हातून कायम दर्जेदार काम होत राहिले. मग ते नाटक, चित्रपट असो की साहित्य. विजया मेहता, विजय तेंडुलकर, जब्बार पटेल, अमोल पालेकर आणि पुरोगामी विचारांशी बांधिल असलेल्या सर्व परिवाराशी त्यांचे आपलेपणाचे नाते होते. म्हणूनच सत्तरी आणि त्यानंतरच्या दशकात मराठी जगतात मोठे बदल होत असताना त्यांनी ही पुरोगामी पताका कर्नाटकात सतत फडकावत ठेवली. प्रतिभावान कर्नाड यांच्या चौफेर प्रवासाची दखल घेत अहमदनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. कर्नाड यांच्या कन्नड भाषेतील आत्मचरित्राचे शीर्षक आहे ‘आडाडाता आयुष्य’. म्हणजे खेळता खेळता आयुष्य. त्याचे मराठी भाषांतर उमा कुलकर्णी यांनी केले आहे. २०१३ मध्ये मराठी भाषांतराच्या प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम पुण्यात झाला होता. स्वतः कर्नाड तेथे आले होते. कार्नाड यांच्या काही कन्नड चित्रपटांचा महोत्सवदेखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या भाषणांमध्ये आत्मचरित्रात नमूद केलेले त्यांचे काही बोल्ड अनुभव हा चर्चेचा, उत्सुकतेचा विषय ठरला होता. त्यांचे आडनाव कर्नाड नसून कार्नाड आहे हे त्यावेळी सगळ्यांना समजले. कार्नाड जरी नाटककार म्हणून सुपरिचित असले तरी, ते वैचारिक लेखन करणारे, विचार आणि मत प्रदर्शन करणारे म्हणून माहिती आहेत. या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या ४३-४५ वर्षांपर्यंतचा लेखाजोखा मांडला आहे. तसे पाहिले तर अजून अर्धे अधिक त्यांचे आयुष्य आत्मचरित्र स्वरूपात यायचे आहे. यातून त्यांची एकूण जडणघडण कशी झाली हे वाचकांना बर्‍यापैकी समजू शकते. इन मीन १०-११ प्रकरणातून, साधारण ३०० पानांच्या या चरित्रात सुरुवातीला अर्थातच त्यांनी स्वतःच्या जन्माची कथा, आई, वडील यांच्याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या आईविषयी वाचून तर धक्काच बसतो, काळाच्या पुढचे आचार-विचार. हेच आचार विचार पुढे त्यांच्या साहित्यामधून आणि नाटकांमधून दिसले. याच पुस्तकात त्यांच्या मुंबईतील अनुभवांचा कोलाजही मोठा रंजक आहे. मुंबई विद्यापीठातून शिकत असताना, माहीमला सारस्वत मंडळींच्या कंपूत राहतानाचे अनुभव ते मांडतात. मुंबई विद्यापीठाच्या आसपासचा परिसर ज्यात पुस्तकाची दुकाने, प्रदर्शने, नाटकं, सिनेमे, हॉटेल्स, त्यातच इराणी हॉटेल्सचे वातावरण, या सर्वांमुळे विविध अनुभव घेत ते मोठे होत गेले. भारतीय नाटकांच्या दृष्टीने तो संक्रमणाचा काळ होता आणि पुढे जाऊन त्यांच्या नाटकांवर प्रभाव पाडणारा ठरला. खरेतर त्यांना साहित्य आणि संस्कृतीविषयी आवड असूनही त्यांना भाषा या विषयावर ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. शेवटी गणित विषयात प्रवेश घेऊनही त्यांनी अव्वल श्रेणी मिळवली. हा अनुभव त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितला होता. ज्ञानपीठ पुरस्कार कर्नाड यांनी या मातीतील माणसांची माणूस होऊन कहाणी सांगितली. त्यांच्या चित्रपट, नाटक आणि साहित्यामधून ती कायम दिसली. माणसाची मुळे मातीशी घट्ट असली की त्यामधून किती कालातीत निर्मिती होते त्याचे कर्नाड हे जितेजागते उदाहरण ठरले. त्यांनी या निर्मितीतून सामान्य माणसांना त्यांचा आवाज दिला. अभिव्यक्ती मुक्तीचा आवाज त्यांच्या लिखाणातून दिसला, तसाच तो त्यांच्या निर्भय बोलण्यातूनही दिसला. राज्यकर्त्यांना ते सतत प्रश्न विचारते झाले. आज प्रश्न विचारणारी माणसे कमी कमी होत असताना कर्नाड यांची उणीव मोठी पोकळी जाणवणारी ठरणार आहे. गेली पाच दशके समाजभान घडवणार्‍या कर्नाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

First Published on: June 11, 2019 5:00 AM
Exit mobile version