भाजप नेत्यांची सलगी हेच दुबेचं शक्तिस्थळ

भाजप नेत्यांची सलगी हेच दुबेचं शक्तिस्थळ

भाजपच्या अनेक राज्यातील सत्तेने कशी लोकं पाळलीयत हे विकास दुबे याच्या आजवरच्या कल्याणानंतर कळायला वेळ लागणार नाही. विकासच्या गाडीला अपघात झाला की त्याला पोलिसांनी यमसदनी धाडलं, हा आता एकच चर्चेचा विषय राहिलाय. भाजपचे काही बदमाश नेते, बसपाचे काही म्होरके आणि यांच्यासाठी विकासच्या ताटाखालची मांजरं झालेले पोलीस वगळता देशातील एकूणएक नागरिक विकासच्या एन्काऊंटरवर उघडपणे समाधान व्यक्त करत आहेत. भाजपातला हा एक विकास त्या पक्षाच्या एका राज्यमंत्र्याला त्याच्या कार्यालयात जाऊन ठार करतो तरी भाजपच्या नेत्यांना तो जवळचा वाटत असेल तर भाजपचे नेते काय तोडीचे असतील? मतांसाठी काहीही करण्याची पातळी गाठणार्‍या भाजपाच्या नेत्यांनी कंबरेचं कधीच सोडलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी असल्या घाणेरड्या राजकारणाला कधीच थारा दिला नाही. १३ दिवसांचं आपलं सरकार एका मताने पडत असूनही नैतिकतेशी जराही तडजोड न करणारे अटलजी कुठे आणि आजचे बाजारबुणगे भाजप नेते कुठे?

उत्तर प्रदेशात एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या आठ पोलिसांवर ज्या दुबेने थेट एके ४७ चालवली आणि मी यूपीका दबंग हू, असं खुलेआम सांगत फिरत होता तरी यूपीच्या पोलिसांना तो सापडत नव्हता. याचा आणखी काही अर्थ त्या सरकारने मागावा? ज्या मुख्यमंत्री योगींची त्याने साधलेली जवळकी, पक्षासाठी दिलेली पुंजी आणि जमिनी बळकावण्यासाठी त्याने हाती घेतलेलल्या ठोकण्याच्या मार्गाने तो भलताच पावरफूल बनला होता. इतका की अमित शहा आणि जेपी नड्डा त्याला घरचे वाटू लागले होते. मसलपावर आणि पैशाच्या जोरावर त्याने याआधी मायावतींना जवळ केलंच होतं. मायावतींची दबंगबाजांना जवळ ठेवण्याची खूबीच होती. काहीही करा सत्ता आणि मात्ताच त्यांच्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ होती. भाजपचा नवा अवतार असाच असल्याने विकासने त्यात हात धुवून घेतले. इतके की तो थेट पोलिसांनाच मारू लागला. एखाद्या चित्रपटात शोभतील अशी कथानके उभी करून त्याने मुख्यमंत्री योगींच्या साक्षीने आपला कारभार उभा केला. आता तो उत्तर प्रदेशात नव्हे तर मध्य प्रदेशमध्ये सापडावा हा योगायोग मुळीच नाही आणि आता तो मेल्याने तर त्याचे सगळे राजकीय सलगी प्रचंड खूश आहेत. त्याच्या या सालग्यांमुळेच ही घटना देशाभरातील लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

योगी सत्तेत आल्यापासून त्यांनी ज्या भावनेच्या तोर्‍यात कारभार सुरू केला त्याचा विकास सारख्या बदमाशांनी पद्धतशीर फायदा घेतला. उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोर्‍या वाजवला.

आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात एक नव्हे तर चक्क ६० गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न यांचीच संख्या अधिक आहे. अशाच एका खून प्रकरणात पोलीस विकास दुबेला अटक करायला गेले होते. दुबे आणि त्याच्या गुन्हेगारी जगताचा संबंध ३० वर्षांपूर्वीपासूनचा आहे. यातील वेगवेगळ्या प्रकरणात विकास दुबेला अटकही झाली. पण, एकाही प्रकरणात त्याला शिक्षा झाली नाही. २००१ साली विकास दुबे याच्यावर पोलीस ठाण्यात घुसून भाजपाचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप होता. संतोष शुक्ला यांची हत्या हायप्रोफाईल प्रकरण होतं. पण, एकही व्यक्ती या दुबेविरोधात साक्षी द्यायला पुढे आली नाही. सारी पोलीस यंत्रणाच दुबेचं पाणी भरण्यात तेव्हापासून व्यस्त असल्याने साक्षीसाठी पुढे येण्याची हिंमत कोण करेल? न्यायालयात कोणतेच पुरावे सादर न झाल्याने तो निर्दोष सुटला. एका मंत्र्याला जीवे मारूनही काहीच झालं नसल्याने विकास दुबेचा धीर अधिकच चेपला. लोहपुरुष म्हणून पक्षात गणले जाणारे मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनीच हात टेकले. यामुळे त्याचा वारू सुटतच गेला आणि तेव्हापासूनच तो गुन्ह्यांचा कर्दनकाळ ठरला.

कानपूरच्या शिवली ठाणे हद्दीतील घटनाही अशीच दूबेची ‘ओळख’ देणारी होती. ताराचंद इंटर कॉलेजचे सहव्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. विकास दुबेचं नाव तिथेही नोंदलं गेलं. कोणीही पुढे आलं नाही. याच काळात दुबे याच्यावर रामबाबू यादव यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. २००४ मध्ये एका केबल व्यावसायिकाच्या हत्येमध्येही विकास दुबेच होता. यातील अनेक प्रकरणांमध्ये विकास दुबेला अटक झाली. पण, प्रत्येकवेळी तो जामिनावर सुटला. २०१३ मध्येही एका खून प्रकरणात विकास दुबेचं नाव पुढे आलं. २०१८ मध्ये चुलत भाऊ अनुराग यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्याचा आरोप दुबेवर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात अनुरागच्या पत्नीने विकास दुबेसह चार लोकांविरोधात तक्रार दिली होती. त्याचंही काहीही झालं नाही.

प्रेम भाजपवर असलं तरी इतर पक्षात त्याला कोणी दुर्लक्षित करत नव्हता. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, त्यावेळी विकास दुबेचा बराच दबदबा होता. त्या काळात विकास दुबेने गुन्हेगारी जगतात जम बसवत चांगलाच पैसा कमावला. जमिनींच्या व्यवहारात तर त्याने करोडो रुपये छापले, असा पोलीस अहवाल आता बोलू लागला आहे. या पैशासाठी मायावती यांनीही त्याला सातत्याने मोकळीक दिली. कानपूरजवळचं बिकरू हे त्याचं गाव. या गावामध्ये गेल्या १५ वर्षांपासून सरपंचाची बिनविरोध निवड होत आहे. त्याच्या कुटुंबातील लोकच गेल्या १५ वर्षांपासून पंचायत निवडणूक जिंकत आहेत. नावापुरती निवडणूक ही त्याची ख्याती. २००० मध्ये शिवलीचे तत्कालीन नगर पंचायत सभापती लल्लन वाजपेयी यांच्याशी त्याचा वाद झाला. तेव्हापासून त्याने ही दबंगगिरी सुरू केली. तो इतका क्रूर होता की समोरच्याला जीवे मारण्याच्या परिणामाची त्याला जराही फिकीर नव्हती. आठ पोलिसांना जीवे मारल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी दुबेने त्यांना अर्धमेल्यावस्थेत जिवंत जाळण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याचा योगी आणि कंपनीवर गाढा विश्वास होता. आठवडाभर तसे योगी शांतच होते, याचं हेच कारण होतं. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या हत्येचे पडसाद, पोलिसांच्या नातलगांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आदळू लागल्या. योगींबरोबरच पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, साध्वी प्रज्ञा, यांच्याबरोबर असलेले दुबेचे संबंध उघड झाले.

याने भाजपची इभ्रत रस्त्यावर येऊ लागल्यावर पक्षाच्या वाचाळ प्रवक्त्यांनी दुबेचे जुने फोटो पुढे करत इतर पक्षांनाही यात ओढण्याचा प्रयत्न केला. मग एटीएफची १०० पथकं त्याच्या मागे लावण्यात आली. जवळपास सर्वच जिल्ह्यांत ही पथके आठवडाभर तळ ठोकून होती. पण, पोलिसांमधलेच खबरे त्याचे रक्षणकर्ते बनले आणि तो यूपीच्या बाहेर सटकला. या हत्याकांडाचे बळी ठरलेले सुलतान सिंग यांचे वडील हरप्रसाद यांनी ज्या पोलीस निरीक्षकाने दुबेला पोसलं होतं त्यालाही अशीच अद्दल घडली पाहिजे असं म्हटलं आहे. तर केंद्रातील भाजप नेते, यूपी आणि मध्य प्रदेश भाजप सरकारमधील अनेकांचे दुबेशी असलेले संबंध उघड होऊ नयेत म्हणून हे फेक एन्काऊंटर रचलं गेल्याचा आरोप ज्येष्ठ नेते ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. दुबेच्या एकूणच कारनाम्याची चौकशी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या निगराणीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन व्हावी, अशी मागणी केली आहे. राहूल गांधी यांनी ‘काही उत्तरांपेक्षा त्यांच्या मौनानेच किती प्रश्नांची अभ्रू राखली’, असं म्हणत यूपी, मप्र सरकार आणि मोदी सरकारला पिंजर्‍यात पकडलं आहे. पण, दुबेचा आजवरचा राजकीय चढउतार आणि योगींच्या युपी आणि मध्य प्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारचे संबंध दाबून टाकणारे हे एन्काऊंटर ठरणार हे मात्र नक्की.ो

First Published on: July 10, 2020 5:31 PM
Exit mobile version