राम कदमांना पाडा!

राम कदमांना पाडा!

राम कदमांना महिला आयोगाकडून नोटीस

भाजपचे जगप्रसिद्ध आमदार राम कदम यांनी दहीहंडीत मुलींना उचलून आणण्याची जी काही भाषा वापरली ती पाहून कदमांची छी थू तर झालीच…पण सभ्यतेच्या नावाने कायम नाकाने कांदे सोलणार्‍या भाजपचाही माज उतरला. एरवी ग्रामपंचायत ते लोकसभा आणि भाजी मार्केट ते तेलाचे आंतरराष्ट्रीय राजकारण यावर हिरवे पेरू, गोड डाळींब खाऊन पोपटपंची करणारे भाजपचे पोपटरुपी प्रवक्ते गेले आठवडाभर गायब झाले होते. मुख्यमंत्र्यांनीही मिठाची गुळणी धरली होती. अखेर हे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच त्यांनी मागच्या दाराने कदमांना फोन करत माफी मागायला सांगितली. पण, कदम सरळ माफी मागतील तर त्यांचा माज कमी होणार नाही का? म्हणून त्यांनी टीवटीवाट करत माफी मागितली, मात्र अजूनही त्यांना आपली चूक मान्य नाही. विरोधकांनी आपल्या भाषणाचा विपर्यास केला, असे अजूनही ते वर तोंड करून सांगत आहेत.

पैसा आणि सत्ता याचा हा माज आहे. सोमवारी ही घटना घडल्यानंतर या भागातून काही मित्रांचे फोन आले. दहीहंडीत नट्या नाचवताना लाज शरम गुंडाळून ठेवणार्‍या आणि दहीहंडी पथकाला जाहीर केल्याप्रमाणे कधीही पैसे न देणार्‍या कदम यांचे खरे रूप या निमित्ताने दिसले… अशा लोकप्रतिनिधीचा माज उतरवला पाहिजे. मी म्हणालो म्हणजे आपण करायचे काय? त्यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांनी रान उठवले पाहिजे. त्यांची खरडपट्टी काढायला हवी… मग त्याने काय होणार? आठवडाभर त्याची चर्चा होईल आणि पुन्हा सगळे शांत होईल. मुख्य म्हणजे झाला प्रकार घाटकोपरला मतदान करणारे लोकच विसरतील. बाकीच्यांचे सोडा! सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने निवडणूक येईल तेव्हा रावणरूपी कदमांना ठरवून पाडायला पाहिजे, हे घाटकोपरमधील मतदार लक्षात ठेवणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. विचारवंत कायम चर्चा करत राहतील आणि आता जे मोठ्या आवाजाने कदम यांच्याविरोधात बोलत आहेत ते नवश्रीमंत निवडणुकीवेळी सुट्टी आहे म्हणून फिरायला जातील.

शेवटी १०० टक्के मतदान करणारा जो समाजातील शेवटचा घटक आहे तो त्या त्या वेळच्या प्रभाव पाडणार्‍या गोष्टींना भुलून पुन्हा कदमांनाच निवडून देईल. कारण आज पैसा आणि सत्ता कदमांकडे असून निवडणुका जिंकण्याची गणिते त्यांना माहीत आहेत. हजार पाचशेला, पावशेर नवटांकला आणि मटण सागोतीला मतदार भुलणार आणि त्या दिवशी आपल्यालाच मतदान करणार , हे माहीत असल्याने कदम यांच्यासारखे लोकप्रतिनिधी माजले आहेत. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत आहेत, त्याप्रमाणे कुठल्याच पक्षाने कदमांना उमेदवारी देता कामा नये. आपण स्वतः तसे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत, असे ते म्हणाले खरे, मात्र भाजप तसे करेल याची काहीच खात्री नाही. निवडणुकांची गणिते भल्याभल्यांना चक्रावून सोडतात, तिथे भाजप कसा काय वेगळा राहू शकतो…कारण सत्तेत आल्यानंतर ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुका कशा जिंकायच्या याची भाजपची गणिते आता ठरली आहेत. त्यांना आता कदम यांच्यासारखे जिंकण्याची क्षमता असणारे उमेदवार हवे आहेत. भले त्यांचा इतिहास आणि वर्तमान कसा काय असेना? कदम महाशय 2009 आधी फार माहीत नव्हते. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांची ओळख होती, एवढेच सांगितले जात होते. पण, भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी काही दिली नाही. मात्र त्यावेळी जोशात असलेल्या मनसेकडून त्यांनी तिकीट मिळवून ते जिंकून आले. कदम यांच्याकडे पैसा तर होताच, पण त्यांचे काय उद्योग आहेत, याचा या देशातील अन्य लोकप्रनिधींना जसे विचारले जात नाहीत तसे कदमांनाही विचारले गेलेले नाही.

निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचे आकडे उमेदवाराला भरून द्यावे लागतात. पण, त्यात खरे आकडे थोडे भरायचे असतात आणि तुम्ही चारित्र्यवान आहात का गुंड याचा हिशोबही अपेक्षित असताना तोसुद्धा नीट कागदावर दिसत नाही… सगळीच गंमत आहे. लोकशाही जिंदाबाद! वाजवा रे वाजवा दहीहंडीसम्राट कदमांच्या नावाने टाळ्या वाजवा… ह.भ.प. महाराज आणि भाजपचे अध्यात्म विभाग प्रमुख कदमांचा विजय असो! हजारो भगिनींकडून राख्या बांधून घेणार्‍या आणि मनगटापासून ते खांद्यापर्यंत आपल्या राख्या दिसल्या पाहिजेत, याचा झगमगाट करणार्‍या भाऊराया कदमांसाठी… दादा, भाऊ, ताई, माई, अक्का टाळ्या वाजवा. अहो, बघता काय, श्रावणबाळ कदमांना डोक्यावर घेऊन नाचा. घाटकोपर परिसरातील मातापित्यांना फुकट देवदर्शन घडवून आणणार्‍या आणि त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भर दहीहंडीत शाबासकी दिल्याने त्याच जागी आवडेल त्या मुलीचे हरण करण्याची घोषणा करणार्‍या कदमांसाठी टाळ्या वाजवा… दहीहंडीत जाहीर केलेली लाखोंची बक्षिसे ठरल्याप्रमाणे कधीही न देणार्‍या कदमांचा विजय असो! दहीहंडी स्टेजवर नट्या नाचवत त्यांच्याबरोबर स्वतःही ठुमके मारणार्‍या आणि महाराष्ट्राचा बिहार करणार्‍या कदमांसाठी टाळ्या वाजवा…२०१३  मध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनात पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करणार्‍या आणि या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कदमांच्या शूर पराक्रमासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत… अहो, तोंड उघडे ठेवून बघताय काय, २०१३  ला घाटकोपर येथे रेशनिंग कार्यलयातील अधिकारी महेश पाटील यांना मारहाण करणार्‍या आणि न्यायालयीन कोठडीची शिक्षा झालेल्या कदम यांच्या या महान कामाला टाळ्या वाजवा. 2014 साली श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थी आणल्याचा दावा करून अस्थींचे दर्शन घेण्यासाठी आपल्या घरी दलित बांधवांना बोलावण्याचा शो करणार्‍या कदमांसाठी जोरात टाळ्या झाल्याच पाहिजेत… आणि टाळ्या थांबवू नका. या शोचा जाब विचारायला गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या तीन तरुणांना जबर मारहाण करणार्‍या, त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कदमांसाठी टाळ्या वाजवत राहा!

आता पुढे कदमांच्या आवडत्या मुली उचलण्याच्या पराक्रमाबद्दल भाजपकडून त्यांचे प्रवक्तेपद तात्पुरते काढून घेतले असले तरी आणि दहीहंडी समन्वय समितीने कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असला तरी कदम यांच्या या बेताल आणि माजखोर वागण्याची एकच शिक्षा म्हणजे त्यांना भाजपने एक तर पुन्हा उमेदवारी देऊ नये आणि दिली तर शिवसेनेसकट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात एकच उमेदवार देत त्यांना पडायला हवे. मुख्य म्हणजे सर्व मतदारांनी ठरवून त्यांना पाडायला हवे. आपल्या हाती एवढेच आहे. भाजप कदम यांना उमेदवारी पुन्हा देईल की नाही, याबद्दल 99 टक्के शंका आहे. कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला पुन्हा सत्ता हवी आहे आणि यासाठी राम कदम जसे हवे आहेत तसेच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, हाजी अराफत, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक आणि छिंदमही हवेहवेसे. अन्यथा मुंबै बँकेत 300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दरेकर यांना पक्षात लाल पायघड्या घातल्या नसत्या आणि हे कमी म्हणून की काय त्यांना विधान परिषद आमदारकी तसेच राज्य उपाध्यक्षपदही बहाल करण्यात आले नसते! हे काँगेस किंवा राष्ट्रवादीने केले असते तर त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार भाजपवाल्यांनी केला असता. जेलमध्ये जाता का भाजपमध्ये येता, हा सत्ताधार्‍यांच्या जाळ्यात विरोधी पक्षातील नेते आपोआप सापडत आहेत. राष्ट्रवादीत असताना म्हाडा उपाध्यक्षपदाचे मलईदार पद उपभोगून झाल्यावर प्रसाद लाड महाशय आता भाजपवासीय झाले असून विधान परिषदनंतर आता त्यांना विधानसभा आमदार व्हायचे आहे. आणि त्यासाठी ते सध्या मतदारसंघ शोधत आहेत. नवी मुंबईतील एका हजारो कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात हात असल्याचा आरोप लाड यांच्यावर झाला आणि सोबत मुख्यमंत्र्यांचे नाव आल्याने एकच गदारोळ उडाला होता. फडणवीस यांना या प्रकरणी सारवासारव करत या जमीन प्रकरणाचे व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही आज फडणवीस यांचा आवडता माणूस म्हणून लाड ओळखले जातात… काय बरे गौडबंगाल आहे?

काँग्रेसचा इतिहास ठाकूर घराण्याच्या मागे असताना, पण सत्ता नसल्याने जीव खाली वर झालेल्या या घराण्यातील जेष्ठ सुपुत्र आणि आमदार प्रशांत ठाकूरांना सिडको महामंडळ मिळाले आहे. ठाकूर परिवाराची 900 कोटींची कामे सध्या सिडकोत सुरू आहेत. असे असताना त्यांची नियुक्ती कशी काय होऊ शकते, असा सवाल विचारात राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ठाकूर यांनी 2014 च्या निवडणूक लढवताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ठाकूर ब्रदर्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत ते मालक असल्याचे सांगितले आहे. याशिवाय नवी मुंबई एअरपोर्टची त्यांच्या याच कंपनीची हजारो कोटींची कामे सुरू आहेत. याशिवाय नवी मुंबईत इतर मोठे कोटी कोटींचे प्रकल्प सुरू होत असून प्रशांत ठाकूरांनाच ते मिळतील आणि त्याला फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने ठाकूर यांचे विमान हवेत आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले आहे.मनसे, शिवसेना असा प्रवास करणारे हाजी अराफत हे कपडे बदल्यासारखे पक्ष बदलतात. अल्पसंख्याक महामंडळ शिवसेनेच्या कोट्यामधून पदरात पाडून घेतले आणि ज्या दिवशी जाहीर झाले त्याच दिवशी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून हे महाशय वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपवासी झाले… हे सगळे आधीच ठरले होते. आहे की नाही लोकशाही महान! दोन टाळ्या हाजी अराफत आणि फडणवीस यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत! राष्ट्रवादीची 6 वर्षांची विधान परिषद आमदारकी उपभोगून झाल्यावर आता पुढे काय? असा जणू अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भाजपच्या दारात उभ्या राहिलेल्या नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देऊन त्यांची गरिबी दूर करण्यात आली. जवानांच्या पत्नींबद्दल अतिशय वाईट भाषेत बोलणारे आमदार प्रशांत पारिचारिक आणि शिवाजी महाराजांविषयी नको ते बोलून तोंडावर आपटलेले माजी नगराध्यक्ष छिंदम हे सारे भाजपने पावन करून घेतलेले… या सार्‍या लोकशाही व्यवस्थेचे तीन तेरा वाजवणार्‍या लोकांना भाजपमध्ये मानाचे स्थान असेल तर पार्टी विथ डिफरन्स नव्हे तर लोकांनी ओवाळून टाकलेल्या नेत्यांच्या पुनर्वसनाची भाजप ही पार्टी आहे, असेच म्हणावे लागेल…!

First Published on: September 9, 2018 4:00 AM
Exit mobile version