मरणाने छळले होते…

मरणाने छळले होते…

संपादकीय

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर त्याबाबत होणारे गलिच्छ राजकारण उबग आणणारे आणि निराश करणारे आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आरोपाच्या पिंजर्‍यात चित्रपटसृष्टीतीली दिग्गजांना उभे केले गेले. यात रिया, महेश भट्ट, दिशा, अंकिता लोखंडे याशिवाय करण जोहर, यशराज फिल्म्स यांच्यावरही समाज माध्यमांवरून टीका करण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर हिंदी पडद्यावरील वशिलेबाजीचा विषयही पुन्हा समोर आला. वशिलेबाजीचं काय ती तर कुठल्याही क्षेत्रात असतेच की, त्यात काय एवढं. मात्र, हिंदी पडद्यावरील वशिलेबाजीलाही ग्लॅमरचं, गॉसिप्सचं वलय असतं. त्यामुळे माध्यमांमध्ये त्याला जास्त चवीनं वाचलं पाहिलं जातं. कुणाला कुणाच्या वशिल्याने कोणता सिनेमा मिळाला यावर चवीने चर्चा केली जाते. पहिल्या संधीला इथं लाँचिंग म्हटलं जातं. यातला पहिला सिनेमा बहुतेक होम प्रोडक्शनचाच असतो, चित्रपटक्षेत्रातील कुटुंबातील नव्या मुलामुलींना बॉलिवूडमध्ये प्रवेश दिल्याचा हा सोहळा असतो. इथं मेरीट किंवा गुणांकन अशा इतर भानगडी नसतात.

राजकारणातातील हमखास निवडून येणार्‍या काही सीट्स जशा नेत्यांच्या मुलांसाठी कायम राखीव असतात तशाच बॉलिवूडातही काही सिनेमांमधील मोक्याच्या जागा मोठे अभिनेते, आर्थिक आवाका मोठा असलेल्या निर्मात्यांच्या मुलांसाठी कायम राखीव असतात. याला बेकायदा आरक्षण किंवा संधी असं म्हणण्यापेक्षा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा हा प्रकार असतो. दिग्गज अभिनेते आणि नेते यांच्यातही याबाबत बर्‍याचदा साम्य असतं, इथं नेहमीच स्पर्धा, एकमेकांवरील कुरघोडी, संधी मिळवण्यासाठीचे राजकारण सुरू असतेच. अशा परिस्थितीत कुठलेही राजकीय किंवा बॉलिवूडमधील पाठबळ नसताना सुशांत सिंह सारख्या तरुण अभिनेत्याला अडचणी येणारच असतात. मात्र, त्याचा परिणाम त्याच्या अवेळी मृत्यूइतका भयंकर होणे दुर्दैवी असते. सुशांतचा मृत्यू झाल्यावरही त्याबाबतचे राजकारण संपत नाही. तो बॉलिवूडमधल्या निर्दयी राजकारणाचा बळी असतो, असं म्हटलं जात असतानाच त्याच्या मृत्यूवरून खर्‍याखुर्‍या राजकारणातही राजकारण सुरू होतं. त्यातून आपापले राजकारण साध्य करण्यासाठी बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रही एका समान अशा खालच्या पातळीवर येतात.

सुशांत सिंहचा मृत्यू झाल्याची बातमी माध्यमांमध्ये आल्यावर तेथून त्याच्या मृत्यूवरून आपले बॉलिवूडी राग, लोभ बाहेर काढण्याची संधी ट्विटकरांना मिळते, फेसबुकवर त्याला श्रद्धांजल्या वाहिल्या जातात. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर टीका करण्याची ही आयती संधी सोडता येण्यासारखी नसते, आपणही अशा परिस्थितीतून कसे गेलो, आपल्याही मनात आत्महत्येचे विचार कसे येत होते, आपल्यालाही बॉलिवूडमध्ये दिग्गजांकडून कसा त्रास होतो हे सांगताना आपण सुशांतपेक्षा कसे महान होतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. सुशांतच्या मृत्यूनंतर कुणाला त्याच्या अशा अवेळी निरोप घेण्याच्या घटनेत सिनेमाची निर्मिती दिसू लागते, तसे तो जाहीरही करतो, तर केवळ सवंग प्रसिद्धीला हपापलेल्या गटांकडून सुशांतच्या मृत्यूवरून मेनस्ट्रीम सिनेमाविरोधात दंड थोपटण्याची संधी मिळते. सुशांतच्या मृत्यूवरून कपूर, खान, कुमार अशा बॉलिवूडमधल्या मातब्बर घरांना दिग्गज घराण्यांना झोडण्याची दुर्मीळ संधी सोडता येणारी नसते. सुशांतचे जुने आणि नवे प्रेम, प्रेमात धोका, रिलेशन तुटण्याची कारणे, अशा बॉलिवूडी चवीच्या चर्चांनी छोट्या पडद्यांच्या प्राईम टाईमचे ओंगळवाणे चौकाने भरू लागतात. है चौकाने भरत असतानाच वर्तमानपत्रांचे रकानेही त्या स्पर्धेत कमी अधिक का होईना पण असतात.

सुशांत की मौत का राज….क्या है…क्यू हुई सुशांत की मौत, सुशांत की मौत के पिछे कौन है व्हिलेन, असे ओरडून ओरडून छोट्या पडद्यावरील अँकरचा घसा बसेपर्यंत ही एखाद्याच्या मरणाच्या लोकप्रियतेची सवंग चर्चा सुरू असते. हा मरणाचा सोहळा इथेच संपत नाही. पुढे यावरून नातेसंंबंंधांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागतात. बॉलिवूडप्रमाणेच गायकीच्या क्षेत्रातही कशी वशिलेबाजी चालते यावर एकमेकांवर यथेच्छ चिखल उडवला जातो. सुशांतच्या मैत्रिणी कोण होत्या, त्याचे कुणासोबत तुटले, कुणासोबत नाव जोडले गेले. कोण त्याला सोडून गेले, कोणी त्याला दगा दिला याचे निर्णय देणारे सोशल मीडियावर आणि विविध चॅनल्सवरही दिसू लागतात. एव्हाना पोलीस तपास सुरू झालेला असतो. यातील सर्वच मंडळी खटला चालवून न्यायाधीश झालेली असतात. त्यात पोलीसही आरोपांच्या पिंजर्‍यात असतात, आता यातील मुंबई पोलिसांसह बिहार पोलिसांचे नावही आलेले असते. बिहारमधले पोलीस सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना आपल्या पोलीस अधिकार्‍याला चौकशीसाठी मुंबईला पाठवतात. मात्र, मुंबईत त्या अधिकार्‍याला क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे आता सुशांत प्रकरणाच्या तपासावरून राज्यातील राजकारणाला सुरुवात होते. यात पोलिसांचे दोन गट समोरासमोर असतात. विरोधकांकडून पोलिसांच्या एका गटाची बाजू उचलून धरली जाते, तर दुसर्‍या गटाकडून मुंबई पोलिसांचा तपास कसा योग्य दिशेने सुरू आहे. याचा निर्वाळा दिला जातो.

सुशांतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले वादळ इतक्यात शमणारे नसते, त्यात आता सुशांतची  मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी होते. रियाचे नाव आल्यावर एका मोठ्या चित्रपट दिग्दर्शकाचीही चौकशी होण्याची शक्यता निर्माण होते. त्यानंतर अनेक निर्माते, अभिनेतेही चौकशीच्या रांगेत असल्याचे स्पष्ट होते. आरोप प्रत्यारोपाचा अंक इथेही संपलेला नसतो. पोलिसांच्या चौकशीतून सुशांतच्या दिशा नावाच्या आणखी एका मैत्रिणीचा विषय समोर येतो. आता तपासाची दिशाच चुकल्याची टीका होऊ लागते. सुशांतच्या मृत्यू तपासावरून गलिच्छ राजकारणाची ही सुरुवात असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना टार्गेट करणे सोपे असते. कारण सुशांत सिंह, बॉलिवूड आणि तरुण कलाकार मंडळींच्या मित्र वर्तुळातील अनेकांच्या ओळखीत महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे नाव असू शकते. त्यामुळे त्याचा राजकीय लाभ उचलण्यासाठी अहमहमिका लागलेली असते.

हे सर्व असे सुरू असताना महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांवर आरोप केलेला असतो. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंब आणि निकटवर्तीयांपैकी कुणीही आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला नव्हता. तसेच कुणावर आरोपही केले नव्हते. मात्र, मागील काही दिवसांत मुंबई पोलिसांच्या तपासावर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राज्य शासनाकडून या विषयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार राज्य सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीला विरोध केलेला आहे. तसेच बिहार सरकारने या प्रकारणात केलेल्या टिप्पणीलाही आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. या प्रकरणी दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या तपासाची माहिती न्यायालयाकडून घेतली जाणार आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील हेवेदावे, राजकारण समोर आल्यानंतर हा मृत्यू हत्या की आत्महत्या असाही प्रश्न आता विचारला जात आहे. छोट्या मोठ्या माालिकांमधून हिंदी पडद्यावर आपले स्थान निर्माण करण्याची सुरुवात त्याने यशस्वी केली होती. त्याचा सहज अभिनय आणि निरागस चेहर्‍यामुळे मालिकांमधून हिंदी पडद्यावर दाखल झालेला तो शाहरुख खाननंतर दुसरा नायक ठरला होता. त्याचे अचानक जाणे वेदनादायी होतेचे. मात्र, त्याच्या मृत्यूचे होणारे हिडीस राजकारण जास्त वेदना देणारे आहे. हा सर्व प्रकार सुशांत जिथे कुठे असेल तिथून पाहत असेल तर त्याला नक्कीच या सर्वांचा त्रास होत असेल. त्याच्या दिल बेचारा या अखेरच्या चित्रपटातील आजाराच्या त्रासापेक्षाही हा त्रास मोठा असेल.

First Published on: August 10, 2020 8:30 PM
Exit mobile version