उत्तरार्ध: प्रदीप सैरभैर झालाय

उत्तरार्ध: प्रदीप सैरभैर झालाय

कालच्या लेखात आपण प्रदीपचा भक्त ते नागरिकत्व दुरुस्ती कायद्यापर्यंतचा प्रवास पाहिला. कालपासून मुंबईसह देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात उग्र आंदोलन सुरू आहे. मुंबई आणि दिल्ली वगळली तर इतर ठिकाणी फक्त मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले आहेत. ही सर्व हिंसक आंदोलनं पाहून प्रदीप व्यथित झाला. भारताची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलीये असं मोदी विरोधक ओरडतात. आता स्वतःच आंदोलनं करून मालमत्तेचं नुकसान कशासाठी? रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्ही तुकडे तुकडे गँगसोबत बोलणार नाही. हे आंदोलन सरकारविरोधात रोष वाढविण्यासाठीच पेटवलं जातंय, असं मोटा भाई ट्रेनमध्ये सांगत होते. खरंच असणार ते. मोटाभाईंकडे मीडियापेक्षाही पुढची खबर असते, तर मग या संभ्रमावस्थेत असतानाच प्रदीपने काल मुंबईत होत असलेल्या आंदोलनात कडंकडंनं सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ऑफिसला हाल्फ डे टाकून तो ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने निघाला.

हे वाचा – एका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तर, साकिब, हुमा कुरेशी, जावेद जाफरी असे सगळे त्याबाजूचे कलाकार आले होते. त्यामुळं हे त्यांचं आंदोलन आहे, असं सुरुवातीला प्रदीपची समजूत झाली. मात्र, सूर्य मावळतीला जाता जाता स्वरा भास्कर, माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, सावधान इंडियावाला सुशांत सिंह, रंग दे बसंतीचे दिग्दर्शक राकेश मेहरा देखील आंदोलनाला आले. आता झाली ना गोची. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि यांचं काय देणं घेणं, काय कळेना. मग अजून थोडा वेळ थांबून यांची भाषणं ऐकू असं ठरवलं. आंदोलक मोठ्या संख्येने येत होते. मुस्लीम समुदायासोबत इतरही दिसत होते आणि मग मधूनच ती जुनी हाक ऐकायला आली. ‘जय भीम कांबळे साहेब…’ प्रदीप थबकला. आवाज ओळखीचा वाटला आणि प्रदीप तात्काळ फ्लॅशबॅकमध्ये घुसला.

या गोष्टीत एक महत्त्वाची बाब सांगायची राहिली होती. प्रदीपचे आडनाव कांबळे होते. या आडनावामुळं त्याची खूप गोची व्हायची. ही गोची सेक्रेड गेम्सच्या त्या गोचीसारखी असती तर किती बरं झालं असतं, असाही विचार प्रदीपच्या मनात यायचा. असो. तर या आडनावामुळं प्रदीपला आयडेंटी क्रायसिसमधून वारंवार जावं लागायचं. कांबळे म्हटलं की बौद्ध किंवा जय भीमवाला, असं सर्रास लोक समजतात. कारण शितावरून भाताची आणि आडनावावरून जातीची ओळख होत असते, तर कांबळे आडनावामुळं बौद्ध त्याला आपले समजायचे तर इतर (म्हणजे इतर हा) त्याला त्यांचा समजायचे. यांचा, त्यांचा, आपला…यामध्ये प्रदीपचा मात्र जीव गुदमरायचा. मग तो बौद्ध मित्रांना सोयीस्कर टाळायचा. अन मग गणपती, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडव्याला सर्व कसर भरून काढायचा. मंडप टाकण्यापासून ते मिरवणुकीपर्यंत सगळ्या कामात प्रदीप हिरीरीने सहभागी व्हायचा. होय मी हिंदूच…हे ठासविण्यासाठी तो कष्ट उपसायचा. घरातल्या कामात फार उत्साह न दाखवणारा प्रदीप सार्वजनिक उत्सवात मात्र पुढे असायचा.

तर मग पुन्हा एकदा मूळ मुद्याकडे वळुयात. प्रदीपचा आयडेंटी क्रायसिस कसा सुरू झाला? आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे प्रदीपचं कुटुंब मराठवाड्यातून मुंबईत आलं होतं. विचारधारा, आयडेंटी यापेक्षा जगण्याचा मूळ प्रश्न होता. बौद्धांप्रमाणे भाकरीआधी बाबासाहेब ही प्राथमिकता नव्हती. प्रदीपच्या कुटुंबियांना आधी भाकरी महत्त्वाची होती. नंतर प्रदीप मुंबईत शिक्षण घेत असताना त्याला आपण अनुसूचित जातीमध्ये आहोत. बाबासाहेबांनी अनुसूचित जातीसाठी खूप काही केलेलं आहे. याची जाणीव अभ्यासातून होत गेली. शिवाय आजुबाजूला असलेले बौद्ध मित्र आपण समाजाचं देणं लागतो, ही आठवणही करून देत होते. मात्र, घरात असलेलं कर्मकांडांच वातावरण, गरिबीतून उठण्यासाठी देव-देवस्की करण्याच्या नादामुळं प्रदीपची वैचारीक जडणघडण धर्माभिमानी अशी होत चालली होती. त्यातच बौद्धेतर अनुसूचित जातीचे लोक तरी कुठं बाबासाहेब, बाबासाहेब करत होते, असंही चित्र त्याला समाजात दिसत होतं.

प्रदीप महाविद्यालयात असताना त्याची शिंदे, गायकवाड या मित्रांशी गट्टी जमली. ते दोघं याला एपी (आपल्यापैकी) समजत होते, तर हा फक्त मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहायचा. मग ओघाने आंबेडकर, चळवळ, आरक्षण, फुले-शाहू-अण्णा भाऊ साठे, समानता, संविधान वगैरे वगैरे शब्द त्याच्या डोक्यावर आदळू लागले. एक वेगळंच जग. तर या गायकवाड आणि शिंद्याने प्रदीपला बाबासाहेब समजून सांगण्याचा घाट घातला. तुम्ही-आम्ही आणि अर्थातच आपण सगळे बहुजन कसे एक आहोत, हे समजवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला. मग आर्य-अनार्य, द्रविड संस्कृती, आ.ह. साळुंख्यांचे बळीवंश ते बाबासाहेबांचे जातीव्यवस्थेचे उच्चाटन अशा अनेक थिअरी रोज प्रदीपला ऐकायला मिळायच्या. मात्र, भाकर पहिली हे गणित डोक्यात फिट्ट बसलेल्या प्रदीपला यातलं काहीच कळायचं नाही. त्यात गायकवाड आणि शिंदे विचारधारा आणि वर्तमान समस्या आणि त्यावरचं उत्तर? याचा मेळ घालताना गडबड करायचे. त्यामुळं प्रदीप सारखा जेमतेम बुद्धीमत्ता असलेल्या माणसाला चळवळ वळवळ वाटायची आणि धर्म ही अफूची गोळी आहे, या कार्ल मार्क्सच्या विचाराप्रमाणे तो धर्माची गोळी घेत राहायचा.

जय भीम कांबळे साहेब…पुन्हा एकदा हाक ऐकू आली आणि प्रदीप फ्लॅशबॅकच्या ब्लॅक अँड चित्रातून पुन्हा रंगीत चित्रात आला. गायकवाड आणि शिंदे, ‘आला आला आपला माणूस आला’ या आनंदात स्मित हास्याने प्रदीपकडे बघत होते. आता झाली ना पुन्हा गोची. काय सांगायचं? आपण तर आंदोलनाची रेकी करायला आलो होतो. प्रदीप काही सांगणार एवढ्यात गायकवाड, शिंद्याने प्रदीपला सीएए आणि एनआरसी कसा जुलमी कायदा आहे, ते सांगायला सुरुवात केली. या दोन्ही कायद्यामुळं घटनेतील समानतेच्या हक्कांचे, मूलभूत अधिकाराचे हनन होत असल्याचं सांगितलं. तरीही प्रदीपच्या डोक्यात काही घुसत नव्हतं. अधिकाराचे हनन होणार म्हणजे नक्की काय होणार? अन सर्वांच्याच अधिकारावर गदा येत असेल तर आंदोलन फक्त ‘हे आणि ते’ का करतायत? सकाळी ट्रेनमध्ये तर मोटा भाई म्हणाले सब नौटंकी है…मग मोटा भाई तसं का म्हणतोय? अशा प्रश्नांचे काहूर प्रदीपच्या डोक्यात माजू लागलं.

कोण बरोबर, काय बरोबर? असा प्रश्न पडला. मग गायकवाड-शिंदेंनी त्याला अखेरचा कानमंत्र दिला. आम्ही हे आंदोलन करतोय कारण संविधान अबाधित राहिलं पाहिजे. हजारो वर्षांच्या गुलामीनंतर आपल्या रक्षणासाठी ही ढाल आपल्याला मिळाली. या ढालीला जर तडा गेला तर आपल्या हातातला मोबाईल जाऊन पुन्हा झाडू येण्याचे चान्सेस आहेत. आज मुस्लिमांचा नंबर आहे, उद्या आदिवासी, बौद्ध आणि मग सर्व शेड्यूल्ड कास्टचा असेल…जीवाभावाच्या मित्रांचा सल्ला आणि दुसर्‍या बाजूला मोदी प्रेम या कचाट्यात आता प्रदीप पुरता सैरभैर झालाय..

First Published on: December 21, 2019 5:25 AM
Exit mobile version